Wednesday, June 5, 2019

आनंदवन

मानव निर्मित खूप मोठं खूप प्रचंड बघण्याचा पहिला अनुभव मला आयफेल tower बघितला तेव्हा आला , म्हणजे माणूस इतका अफाट इतका मोठा विचार करू शकतो ? दुसरा अनुभव बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पांना भेट दिली तेव्हा आला . म्हणजे साधारण माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडील आहे सगळं .  दोघान मधला एक मोठा फरक म्हणजे, एक कृत्रिम आहे आणि त्याचा आकार तेवढाच राहील आणि दुसरा माणसांनी जोडलेला बांधलेला आणि वाढतच जाणारा अविरत ... 

नुसतं पाहिलं कि  भारावून जातो आणि मग तिथली माणसं आपल्याला काही माहिती देतात फिरवून आणतात तेव्हा तर बाबा आमटे ह्या उत्तुंग माणसाच्या कामाचं खर स्वरूप दिसत, कळत . तिथली सगळीच माणस  इतकी शांत आणि प्रेमळ आहेत तस पाहायला गेल तर हल्ली रोज  एक ग्रुप तिथे येतो, पण सगळीकडे त्या कार्यकर्त्यांनी त्याच जोमाने अनु उत्साहाने सगळं सांगितलं आणि अस ते अनेक वर्ष करत आहेत  आणि करत राहतील . employee satisfaction वगैरे म्हणेज हेच असेल. 

आनंदवन :  मला आनंदवन नक्की कुठे आहे हे ठाऊकच न्हवत, आमटे कुटुंबा, बद्दल आनंदवन बद्दल तस  खूप माहिती होत पण आहे कुठे? नागपूर जवळ हे एवढच , मग जंगलात आहे का?आजूबाजूला काही असेल का? वगैरे सगळे स्वप्न रंजीत संकल्पना मी डोक्यात बांधल्या , नेट वर शोधल तेव्हा असं लक्षात आलं कि गाईडेड टूर्स असतात , इथून नागपूर मग तिथून त्यांची गाडी दोन तासावर आनंदवन मग तिथून हेमलकसा आणि सोमनाथ मग परत नागपूर. पण मला हे टुरिस्ट सारखं करायच न्हवत म्हणून चार लोकांना चार वेळा (दिवसातून ) फोन करून माझा मी आलो .  तर आनंदवन च्या सगळ्यात जवळच स्टेशन म्हणजे वरोरा इथे तुम्ही नागपूर हून बस ने किव्हा गाडी करून येऊ शकता . म्हणजे नागपूर ला दुरोन्तो ने उतरून मग तिथून गाडी करून पुढे, किव्हा सेवाग्राम ने थेट वरोरा ला  उतरून येऊ शकता फार तर एक किलोमीटर अंतर असेल वरोरा पासून  . फक्त सेवाग्राम दुपारी ३ ला सुटते आणि दुरोन्तो रात्री ८. सेवाग्राम खूप ग्रामांची सेवा करते त्या मुळे रटाळ होत, पण नागपूर ते वरोरा चा खर्च वाचतो.  आनंदवनात राहायची सोय झाली नाही तर दोन चार हॉटेल्स ही आहेत जवळ पास.

बुधवारी आनंदवन बंद असतं म्हणजे वरोरा बंद, त्या मुळे आतले सगळे उद्योग बंद असतात .... काय काय उद्योग करतात ते आम्हाला आत फिरल्यावर समजलं . खूप मोठा परिसर आहे, सगळं स्वच्छ , झाड लोट करताना माणसं सुद्धा फार दिसत नाहीत पण शिस्त आणि स्वच्छता अंगवळणी पडलं आहे इथल्या रहिवाश्यांच्या. साधारण लोकांची कल्पना अशी असते कि आनंदवन म्हणजे सगळे कुष्ठरोगी इथे तिथे फिरत असतील , तर असं अजिबात नाहीये, ज्यांना ट्रीटमेंट ची गरज आहे ती दवाखान्यात असतात त्यांच्या कुटुंबाला राहायची सोय आहे . बरेचदा नातेवाईकांनी म्हणजे अगदीच सख्यांनी टाकलं असत , ते बरे होई पर्यंत इथेच असतात आणि नंतर इथेच काम सुद्धा करतात . बरे झालेले  रुग्ण अगदी ताठ मानेने इथे फिरत असतात . आपल्या संकल्पना सगळ्या उधळवून लावत ती लोक आपल्या डोळ्यात डोळे घालून नमस्कार करतात, हसतात , बाहेरच्या जगात ही लोक अगदीच दिन वगैर दिसतात पण आनंदवनात खूप वेगळं चित्र आहे , इतका सम्मान मिळालेला दिसतो कि खरंच अस वाटतं कि आपण एका माणसाला जरी पायावर उभं करू शकलो तरी किती केलं असं होईल, इथे तर शेकडो माणस  आपल्या पायावर पुन्हा उभी झाली , पडलेल्या माणसाला उभ करणं खूप कठीण, इथे तर पिढ्याच्या पिढ्या परत उभ्या केल्या आहेत.

बाहेरच्या लोकांची जेवायची उत्तम सोया आहे आणि एक म्हणजे आपणच आपलं ताट वाट्या धून लागतात, कुणी  मोठं नाही कि लहान नाही सगळे सेम. सगळ्यांना एक चक्कर मारून आणली आनंदवनाची, नाव सार्थक करणारी लोक तिथे आहेत, सगळेच आनंदी दिसतात किव्हा आपण ज्याला इंग्रजीत "content" तशी आहेत लोक, आपल्या मुंबईत सगळी लोक ट्राफिक मुळे , गाडीतल्या गर्दी मुळे म्हणा, एकूणच फार कवलेली दिसतात, पण इथे सगळी लोक आनंदीच  दिसतात.

गुरुवारी आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा तिथे एक फिल्म दाखवत होते, म्हणजे जनरल असं, माहितीपट. ती फिल्म बघून बाहेर आलो आणि बाजूला असलेल्या ग्राम उद्योगाच्या दालनात शिरलो. सगळं काम हाताने केलेलं, ग्रीटिंग कार्ड्स होते चित्र होती. दुसरी कडे गेलो तर तिथे कोरीव काम केलेल्या वस्तू होत्या. जुन्या टाकाऊ वस्तूं पासून सुद्धा किती गोष्टी केल्या होत्या. काय कलाकारी, आपण थक्क होतो. तिथे पु लंनी (पु ल देशपांडे) लावलेले एक झाड आहे , आता वटवृक्ष झालाय म्हणा (होणारच, त्यांनी हात लावलेलं प्रत्येक पण फुलतंच), आणि  विकास आमटे म्हणाले कि पु ल न चुकता दर वर्षी येऊन जायचे, म्हणजे त्यांना झेपत होत तो पर्यंत, शेवटची चार पाच वर्ष सोडून आणि मदतीचा हात कायम पुढे, तरी पु लंच्या एकाही लिखाणात त्यांच्या मदतीचा उल्लेख आहे का? देणार्याने देत राहावे .... त्या दोघा दोस्तांचे फोटो आहेत खूप, मी साष्टांग नमस्कार घालणार होतो, पण मोह टाळला.  इतकी मोठी माणसं आपल्याच राज्यात असल्याचा अभिमान वाटला, नकळत छाती फुगली आणि डोळे आपोप भरून आले...दिपलेच म्हणा.   बाबांना माणूस म्हणायचं कारण म्हणजे ते देव, दैवत ह्या पासून दूर राहिले, कोणत्या माणसाला जात बघून ट्रीटमेंट नसते इथे, आणि बर झाल्यावर धर्माच बंधन नाही. इथे धर्मशाळा आहे का? अस कुणीतरी विचारलं तेव्हा विकास आमटे म्हणाले कि इथे धर्मच नाही धर्म शाळा कशी असणार? इथे या आणि राहा, मदत करा ... आनंदवन हेमलकसा, सोमनाथ, कुठेहि देऊळ नाही कि देव नाही ... देव पणा सुद्धा नाही.. आपण देव शोधतो माणूस शोधायला हवा ..  लगेच सापडेल.

पुढे मग हातमागाचे काम चालू होती. सतरंज्या चादरी, गालिचे, सगळंच. तिथे पाठीच बाबा आमटे आणि साधना ताई ह्यांची समाधी आहे, छान झाड आहेत. मला जाळताना झाड नका कापू म्हणाले, काय बोलायचं? आणि साधना ताईंची समाधी तिथेच शेजारी. पाठी राखीण म्हणजे काय? ह्याचा उत्तम उधाहरण हि सगळीच आमटे फॅमिली, म्हणजे इतक्या उत्तुंग माणसाला जपणं त्यांच्या कार्यात बरोबरीने आणि काही वेळा जास्त सहभाग देणं हि खूप कठीण गोष्ट असते, एखाद्या माणसाला एका गोष्टीचा ध्यास लागतो, पण त्यांच्या साथीदाराने फक्त त्या माणसाचा ध्यास असून वाट्टेल ते पणाला लाऊन  नवराच्या यशा मध्ये समाधान मानणं हे असामान्य आहे. तिथे समाधी वर मात्र मी आणि सगळ्यांनीच डोकं टेकलं, नतमस्तक होण्या सारखंच आहे ते ..

तिथे त्या रहिवाश्यांचं कॅन्टीन आहे, म्हणजे जिथे लोक जेवतात, आम्हाला ते पाहायला घेऊन गेले. स्वच्छ, नीट नेटकं , खूप प्रमाणात पोळ्या भाकऱ्या केल्या जातात, भाजी असते , आमटी , कोशिंबीर सगळं. भाज्या इथल्याच काही धान्य लागलं तरच बाहेरून. भाज्या चिरल्या कि त्याच साल म्हणा , टरफल म्हणा सगळं ते प्रोसेस करून बायो गॅस, आधी सांगितल्या प्रमाणे बुधवार सगळं बंद असत, तेव्हा इथे बाजार भरतो. तो सगळा ओला कचरा आणून बायो गॅस केला जातो, सोलार पॅनल आहेत .... १०० टक्के उपयोग, स्वावलमभन,  स्वाभिमान , सम्मान..

त्यांच्या सगळ्या वस्तू आहेत ते विकायला दुकान आहे इथे, छान आहे, कष्ट करून पैसा कमवा, साधं सोपं सरळ. मग समोर आपल्या साठी जेवणाची जागा आहे, तुम्ही ताट वाट्या घ्या, अन्न वाढून घ्या, परत घासून जागेवर ठेवा. साधा सोपं करून ठेवलय, आपण फॉरेन मध्ये बघतो तस आहे सगळ, सगळ्यांना सेम वागणूक, काम वाटून दिलेली सगळी जण सगळी काम करतात.

आम्ही मग जेऊन हेमलकसा चा प्रवास सुरु केला ... अजून एक दिवस तरी थांबायला हवं असं वाटत होत .. काय नवल आहे, आपण रिसॉर्ट ला सुद्धा कंटाळतो, इथे तस करमणूकी साठी काही नसताना माणूस रमतो .. धन्य आहे सगळ बाबा  ....

अमेरिका १२- universal studios १

मी ज्या देशात जातो त्या देशात जमलं तर सगळ्या प्रकारच्या   transportation चा उपयोग करायचा प्रयत्न करतो. अमेरिकेत बहुदा सगळेच गाड्या घेऊन फिरतात. फार काही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीचे. मोठ्या शहरात आहेत पण बाकीच्या ठिकाणी मेट्रो, ट्रेन्स नाहीत, साधी बस सुद्धा नाहीये. मी आपला उबर झिंदाबाद होतो. पण, कॅलिफोर्निया मध्ये मी अमेरिकन मेट्रो ने पण प्रवास केला आणि  ट्रेन ने पण (आपल्या सारखीच आहे, मला वाटलं अमेरिकन म्हणजे वेगळी असेल) . 

युनिव्हर्सल स्टुडिओ. 

माझी मावस बहीण स्वाती जिथे राहते तिथून लॉस अँजेलिस साधारण तास भाराच्या अंतरावर आहे, काही कारणाने ती येऊ शकत न्हवती म्हणून मी ट्रेन ने LA ला जायचं ठरवलं. सकाळी दोन आणि संध्याकाळी परत त्याच दोन एवढ्याच फक्त गाड्या आहेत, तिच्या घरापासून च्या जवळच्या स्टेशन वरून जाणाऱ्या. सकाळी सात ची गाडी होती आणि सवई प्रमाणे (आम्ही भाऊ बहीण सेम ना म्हणून) मी साडे सहा ला स्टेशनात, स्वातीनेच सोडल स्टेशन पर्यंत. (त्या दिवशी गाडी दहा मिंट लेट होती).  स्टेशनवर एक किऑस्क होत त्यातनं टीकेत घेतलं (मग ते दिवसभर जीवापाड जपलं) आणि प्लॅटफॉर्म वर गेलो. त्या स्टेटशनात एकच प्लॅटफॉर्म, तुरळक माणसं. मग प्रश्न पडला, कि ह्या बाजूची ट्रेन का त्या बाजूची? सगळंच उलट ना हो? आपण डावीकडून गाडी चालवतो, हि लोक उजवीकडून, म्हणजे बघा माटुंगा स्टेशन जर उदहारण घेतलं तर डावी कडे जाणारी गाडी बोरिवली आणि उजवीकडली चर्चगेट, म्हणजे मेन स्टेशन, पण इथे कस असणार? हे कळत न्हवत , मग माला एक साठ पासष्ट ची रेल्वे चा युनिफॉर्म घातलेली बाई दिसली, तिला विचारलं, ती म्हणाली थांब ह्याच्या आधी एक गाडी येईल मग तुझी गाडी उजवीकडे, म्हंटल बर, दहा मिनिटाने एक गाडी आली, ती बाई लांबून मला हातवारे करून ..नाही हि नाही .... त्या अमेरिकेत पण काळजी घेणारी लोक आहेत हे कळलं, मग ती गाडी गेल्यावर शेजारीच येऊन उभी राहिली, कुठे जातोयस? म्हंटल युनिव्हर्सल ला,  "मजा कर" मग  मला म्हणाली कि इथे amtrak नावाची गाडी पण असते, पण ती इथे थांबत नाही, लॉस अँजेल्स वरून येताना ती गाडी घायची नाही, आता गाडी येईल तुझी,  त्यात बस आणि शेवटच्या स्टॉप ला उतर, मी येस थँक यु असं म्हंटल, नो प्रॉब्लेम म्हणाली आणि परत एकदा विचारल, amtrak  पकडायची? मग मी "नाही" अस म्हणालो, तर काय गोड हसली म्हातारी. तेवढ्यात गाडी येताना दिसली, तुझी गाडी  "have a nice time"  .... मी गाडीत चढलो, रिकामी होती, सुट्टीचा दिवस म्हणून रिकामी असेल . दोन चारच  लोक होती , मग मी एका खिडकीत बसलो आणि मग पाच मिनिटाने दुसऱ्या मग तिसऱ्या , रिकामी गाडी बघायची सवयच नाही ना, म्हणून भिरभिरलो ....

तासाभरात गाडी LA Central ला पोचली, एकदम भारी वाटलं, दादर सारखं ब्रिज चढायला गर्दी, मी खुश. इथे escalators आहेत आणि लोक उगाच धक्का बुक्की करत नाही. त्या मुळे चीड चीड नसते आणि त्यात वातावरण थंड. गाडीतून उतरल्यावर रुमाल काढून घाम पुसायचा न्हवता. वर जाऊन कळल कि तिथे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि मी चालून मुख्य स्टेशनात आलो. म्हणजे आपलं चर्चगेट बघा कस आहे? किव्हा CSMT? सगळ्या प्लॅटफॉर्म वरून आपण मुख्य ठिकाणी येतो आणि मग तिथे हॉटेल्स आहे तिकीट खिडकी सौचालय आहेत, तसेच. फक्त आपण सरळ जातो, इथे आपण खालून वरती येतो. वरती आल्यावर तुम्ही डावी कडे जाता किव्हा उजवीकडे, पण दोन टोक. म्हणजे चर्चगेट ला उतरून तुम्ही त्या  c रोड कडे निघालं किव्हा सरळ इरॉस नाहीतर पाठी आयकर, मी थोडा गोंधळलो, कारण  म्हंटल जर मला NCPA  ला जायचं असेल आणि मी जर पाठून आयकर ला गेलो तर फार लांब पडेल. म्हणून बाहेर जाऊन एका पोलीस ला विचारल कि मला युनिव्हर्सल ला जायचंय तर उबर कुठून करू? इथून का त्या बाजूने? (मेक्सिकन होता तो, म्हणजे इथे मेक्सिकन लोक पण खूप आहेत, ते स्पॅनिश बोलतात जास्त ) कुठे जायच आहे नक्की? म्हंटल युनिव्हर्सल बघायलाच, कुठून आलास? कसा आलास? चायला पोलीस म्हणजे काय  असे प्रश्न विचारात सुटायचं काय? (मी म्हंटल, मानत) त्याला गप गुमान  ट्रेन म्हंटल, तसाच सरळ परत जा .. आ? मला काही कळेना, हसला तो, म्हणाला अरे आत गेलास कि डावीकडे स्टार बक्स आहे (स्टेशन, विमान तळ, बोट रस्ता मॉल , सगळीकडेच आहे म्हणा) तिथून खाली उत्तर, तुला मेट्रो मिळेल ती थेट युनिव्हर्सल ला जाईल चार डॉलर, उगाच कशाला उबर (चांगला होता पोलीस असून) ? बर आहे म्हंटल उबेर २२ डॉलर सांगत होता, हे फारच सोपं होत, मला ट्रेन आवडते (मुंबईत तुम्हाला आवडावीच लागते), लगेच आत गेलो तर डावीकडे एक मोठी वेडी बाई होती, तिथेच स्टेशनात खाली प्लास्टिक ची पिशवी घेऊन बसली होती आणि मोठं मोठ्याने बोलत होती... माझ्याच कडे बघून ओरडत होती (असा भास झाला मला), मी धूम ठोकून खाली गेलो तर खूप मशिन्स, तिथे फुल डे तिकीट ७ डॉलर कुठून हि कुठे, तेच काढलं, उगाच दोनदा का काढा म्हणून? ते काढून कुठची गाडी पकडायची म्हणून वळलो तर एक भिकारी बाई (ती पण मोठी आणि काळी) मला मदत करशील का एक डॉलर? थोडा पुढे एक माणूस खाली बसून एक टक आढ्या कडे बघत होता, खाली भीक द्या अशी पाटी होती. मी तसाच खाली गेलो तर दोन प्लॅट फॉर्म, एकात गाडी एकात न्हवती, नशिबाने एक माणूस तीथे एक स्टाफ साठी केबिन केली तिथे होता, त्याला विचारल कि युनिव्हर्सल ला कोणती जाते गाडी? तर स्पॅनिश मध्ये बोलला, मी म्हणालो अरे इंग्लिश बोल, ती गाडी आहे उभी तीच शेवटून दुसरं स्टेशन, चढ सुटेल आता, मी चढलो गाडी भरली होती, पण एका बाकावर टेकलो तेच दार बंद झालं आणि गाडी सुटली. आजू अबाजुची माणसं बघत होतो, थोडी गरीब टाईप्स होती सगळी, आणि एकदम कुणी तरी गुड मॉर्निंगssssssss असं ओरडलं कुठून आवाज येतोय हे बघायला मन वळवली तर एक अर्ध नग्न वेडी बाई मोठ्याने हसायला लागली आणि मधेच गुड मॉर्निंग अस ओरडायची, काही खर नाही म्हणून दार बघूया आणि उतरू असं मनात आणे पर्यंत माझाबाजूला बसलेला माणूस पण मोठ्याने हसायला लागला, मी शेपटीला लवंगी लावल्या सारखा उडालो आणि डायरेक्ट दारात, नशिबाने लगेच गाडी स्टेशनात आली होती (चर्चगेट ते मारिन लाईन्स, जेवढं अंतर तेवढच असेल ) आणि वायूवेगात उतरून एक डबा सोडून दार अगदी बंद होयच्या आत, दुसऱ्या डब्यात घुसलो आणि सगळ्यांनी कपडे घातलेत का? वेड्या सारखं कुणी आहे का हे बघितलं आणि पुढल्या स्टेशनात गाडी येई पर्यंतदारा जवळ उभं राहून काही धोका नाही ना? हे पाहून मग दारा जवळची एकटी असलेली सीट पकडली.

मला वेड्यांची फार भीती वाटते (अशी तर मला खूप  गोष्टींची भीती वाटते पण ह्या लोकांची जास्त), राग नाही येत, पण त्यांच्या actions  वर त्यांचा ताबा नसतो, म्हणून भीती, ती कुठे बघतात हेच काळत नाही त्यांचा राग कुणावर असतो हे माहित नाही  कुणावर काढतील हे सांगता येत नाही आणि अमेरिकेत ही माणसं एक तर आड दांड आणि त्यात ती निग्रो तर अणिकच. मोठ्या शहरात मला नेहमी वेडी माणस दिसतात, का माणस मोठ्या शहरात येऊन वेडी होतात? का शहर त्यांना वेड करत? का वेडीच माणस शहरात राहतात का वेडच वाहायला इथे येतात? मी असं का वेड्या सारखा विचार करतोय? इथली वेडी माणस ऍक्टर वाहायला तर आली नसतील ? काय वेड्या सारखच आहे सगळ ..... 

असाच सारखा वेड्या सारखा विचार करून मी शेवटी त्या युनिव्हर्सल स्टेशन ला उतरलो, पण गाडीतली माणस सगळी बेताच्या परिस्तिथी असलेली वाटली, त्या मनानें मी स्वाती कडून इथे आलो ती माणस सगळी सुख वस्तू वाटली. स्टेशन नेहमी सारखं खाली भुयारात, वर आलो तर सगळं विश्वच निराळं, म्हणजे एकदम मशीद बंदर ते डायरेक्ट कफ परेड ... सगळंच भारी, परत गोंधळ .. युनिव्हर्सल स्टुडिओ तर कुठे दिसत न्हवता, परत एक पोलीस  (माणूस नाहीच कि हो), त्याला म्हंटल कि मला ... युनिव्हर्सल साठी तो ब्रिज चढा आणि उतरल्यावर त्यांची गाडी तुम्हाला (फुकटं) त्या स्टुडिओत घेऊन जाईल असं तो पोलीस म्हणाला, मला  वाटलं मन कवडाच आहे, पण माझ्या पाठी चार लोकांना त्यांनी हेच आधीच सांगितलं, कारण त्या स्टेशनात दुसरं काही नाहीच कि ओह ...

मग मी तो ब्रिज उतरलो आणि पाच दहा लोंकान बरोबर त्या बस ची वाट पाहत थांबलो. एक पाच मिनटात एक मोठी टुमदार लहान मुलांना आवडेल अशी चार डब्यांची बस हळू हळू येताना दिसली, त्यात आम्ही लोक बसलो आणि मग ती बस युनिव्हर्सल कडे निघाली, त्या बस मध्ये स्पीकर होते ते सगळं सांगत होतेच, कि इथे बघा तिथे बघा, एकदम पॉश सगळं, मग तुम्ही आता युनिव्हर्सल जात आहात, अस म्हणत ती बस एक ५०० मीटर जाऊन थांबली, मग ती बाई म्हणाली कि सरळ जा, तिकीट काढा म्हणजे थेट युनिव्हर्सल .. मी आधी उतरून बाथरूम शोधलं , म्हंटल आत असेल नसेल काय ठाऊक, मला जायला मिळेल न मिळेल, लगेच समोर दिसलं, आत गेल्यावर नव्वद टक्के भारतीय, सगळेच हा माझ्या सारखा विचार करून आले असावेत. तिथे लॉकर होते, तुमचं सामान ठेवायला, फार महाग न्हवत, पण सामान पण न्हवत माझ्या कडे. पण सोय चांगली होती.

तिकिटाच्या आधी मोठी रांग, security करतात... माझ्या कडे फक्त एक छोटी गळ्यात अडकवायला बॅग होती म्ह्णून मला पण security चेक करायला लागल, पण खूप गेट्स आणि शिस्थ ह्या मुळे सगळं दाहा मिनटात झालं, आदल्या रात्री मी online तिकीट काढलं होत म्हणून डायरेक्ट आत गेलो, म्हणजे त्या माणसाने ते चेक केलं आणि मी एकदम universal ... स्वप्नात पण मी इथे येईन असं वाटलं न्हवत, पण मी आलो ह्याच श्रेय स्वाती ला आहेसच, ती नसती तर मी कॅलिफोर्निया ला आलोच नसतो, पण अमित, म्हणजे अंजली माझी मैत्रीण तिचा नवरा, आता तो पण मित्र आहेच त्याने मला आग्रह करून सांगितलं होत कि अरे तू अमेरिकेत आलाच आहेस तर universal  ला जाच , असं अगदी बजावून सांगितलं म्हणून मी म्हंटल ठीके बघू जमलं तर आणि हे असताना स्वपना मला म्हणाली कि अमेरिकेत गेलास आणि आता कॅलिफोर्नियात तर युनिव्हर्सल ला जाच जा म्हणजे जाच, आता हि दोघे एवढे म्हणाले म्हणून मी खरा तर जाऊ म्हंटल, पण जाता क्षणीच, मी आलो ते फारच बेस्ट केल ह्याची मला खात्री पटलीच, पण एकदम एवढं भव्य बघून भारावून गेलो ....


क्रमशः





















Monday, June 3, 2019

घुलामी 2 -- फिनिक्स अरेझोना अमेरिका

इथे हर्ड मुसीयम मध्ये हे मला पाहायला मिळणार म्हणून मी आलो .... इथे दोन भाग आहे, एक म्हणजे इथला इतिहास आणि इथली (म्हणजे इंडियन्स ची)संस्कृती .. इतिहास गोऱ्या साहेबानी लिहिलाय आणि संस्कृती तोच गोरा साहेब दाखवतो आपण यातून बोध घायचा ... .. 

v

अमेरिकेत एक चांगलंय म्हणजे लोक तोंड भरून तुमचं स्वागत करतात, खर खोट  असं काही नसतंच, मी जेव्हा त्या हर्ड म्युसियम ला गेलो तेव्हा त्या तिकीट कॉउंटरच्या बाईने तोंडभरून स्वागत केलं (टिचून १२६० रुपये घेतलेत, न करायला   काय जातय?). माझ्या दोन्ही बॅग (फुकट)लॉकर मध्ये ठेऊन घेतल्या तिथे, ते बरं झाल त्या मुळे मी मोकळा झालो. 



आधी सांगितल्या प्रमाणे इथे दोन भाग आहेत, एक म्हणजे इतिहास आणि दुसरा म्हणजे कला संस्कृती. एक बरं म्हणजे इथे फुकट टूर्स होत्या , दोन. एक ह्या भागाची आणि एक त्या. मी नेहमी गाईड करतो, माझा (भारताचा ) इतिहास जरा बरा असला तरी लोकल माणसा कडून तो ऐकण्यात मजा असते म्हणून मी गाईड करतो. (जयपूर ला गेलात तर त्या जंतर मंतर ला नक्की गाईड करा एरवी ते ५ मिनटात बघून होईल पण गाईड तुमहाला तास भर फिरवेल आणि जन्म भराची माहिती सांगेल). आणि इथे मला अजिबात इतिहास आणि भूगोल माहित नाही, परत २५ डॉलर (२००० रुपये) खाली काही नाही इथे , त्या मुळे फुकट म्हणून मला फार आवडलं.  

इतिहास च्या भागात आहे तो आधी होता, सुरवातीला त्या गाईड ने आम्हाला थोडी कलाकृती दाखवली, कुणी एक जर्मन माणूस होता तो आणि त्याची बायको मेक्सिको ला जाऊन आले आणि मग त्याने प्रभावित होऊन खूप चित्र काढली वगैरे, थोडच नक्षी काम होत फार नाही. आपण भारतात फार जास्त नक्षी काम पाहतो म्हणून मला फार काय त्यात कौतुक नाही वाटलं, पण त्या माणसाने चित्र मात्र छान काढलं होत. मग तो आम्हला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला आणि एकदम वेगळच चित्र डोळ्या पुढे आलं. हा गोरा साहेब किती क्रूर आणि दुष्ट होता हे त्याने स्वः सांगितलं आणि तिथे तस दाखवलं आहे. इथे आधी साहेब आला मग सगळेच आले जर्मन, फ्रेंच, डच आणि सगळेच  (स्पॅनिश मेक्सिको मध्ये गेले किव्हा दक्षिण अमेरिका आणि त्यांना वाईट ओरबाडले आणि गुलाम केले, इतके कि ते स्वतःची भाषा विसरून स्पॅनिश बोलतात आणि तीच मूळ भाषा समजतात ) . पण सगळ्यात जास्त दुष्ट पणाचा मान हा साहेबाचा, हिटलर पण भुरटा चोर वाटेल इतका अत्याचार ह्या साहेबाने केला. मी नेहमी म्हणल्या प्रमाणे हा देश इतका मोठा आहे कि भारता पेक्षा अडीच पट, म्हणजे लोक जास्त जाती जास्त गाव जास्त, म्हणून इथे ते कबिले वेगळे, भाषा वेगळ्या रीती वेगळ्या, कपडे वेगळे ... फक्त एक मेकांना शत्रू मानणे ह्या एका गुणावर ते जोडले गेले होते ... साहेबाने ह्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांची कत्तल करायला सुरुवात केली. भारतात इतकी माणसं ह्यांनी मारली, हा देश तर आपल्याहून अडीच पट  मोठा, म्हणजे किती माणस मारली असतील? आपण तरी बऱ्यापैकी जोडलेले  होतो, म्हणजे काश्मीर असो वा कन्याकुमारीमहाराष्ट्र  असो का बंगाल लग्न करायची पद्धत एकच श्लोक सगळे संस्कृत, संस्कृती एकच. इथे ह्याचा अभाव, म्हणून एक एक कबिला धरून त्यांना घुलाम करुन मारून टाकणं फार सोपं गेलं. मग  एका सुपीक (आणि क्रूर) डोक्याच्या माणसाला एक आयडिया आली, ती म्हणजे लहान मुलांना पकडा, त्यांचं घर तोडा, जात ख्रिश्चन करा , भाषा इंग्रजी करा, शिक्षण पाश्चात्य करा आणि इतिहास आपलाच शिकवा .....म्हणजे हाच माणूस त्यांच्याच माणसांना मारेल आणि आपलीच भाषा बोलेल म्हणजे आपलं काम सोपं .  ह्याच कारण म्हणजे खर्च कमी होईल, खर्च कमी होईल? मारताना गोळ्या वगैरे लागतात आणि साहेब पण एखादा मारू शकतो, उगाच का गोळ्या वाया घालवा कष्ट करा . दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे पुढची पिढी घुलाम होईल . आपल्या कडे फक्त इंग्रजी बोलणारे लोक हे घुलाम आहेत हे मला पटल. मातृ भाषा हि आलीच पाहिजे, इंग्रजी महत्वाची आहेसच, पण मातृ भाषा येणं हे जास्त महत्वाचं.मिशनरी शाळेने ही काम चोख बजावलीत (अगदी भारतात सुद्धा). 



पाच सहा वर्षाचं पोर, त्याचे आई बाप लांब करा घर थोडा, मोकळ्या जागेतून बंद खोलीत आणा, धर्म बदला भाषा तोडा, उपाशी ठेवा आणि जे साहेबांचं उरेल ते त्या लाहानग्या पोरांना द्या.वाढत्या वयातली पोर असतील त्यांना उपाशी मारा, एखाद्या चिमुकल्याला आई भरवत असेल तर त्याला बेचव जेवण ताटात वाढा लाड नाही, फक्त मार आणि शिस्त. एका विशिष्ट प्रकारची शिटी मारली कि मूल उठायची , दुसऱ्या प्रकारची मारली कि मुलं जेवायची , अश्या शिट्यांने त्यांचं आयुष्य बांधलं गेले होते.... आई बापाला भेटू द्यायचे नाही,  ती    माउली दुःखाने मरत असेल. त्या बोर्डिंग शाळेत एका खोलीत चिकटून अनेक मूल झोपायची, रोगाने कित्तेक मारायचीत. आणि त्यांना तिथेच पुरले जायचे आणि त्यांच्या पालकांना एक पत्र, ज्यात असं लिहिलं असायची कि छान आणि शांत त्रास न होता शूरवीर मरण आलय. 

हे सगळ दाखवणारे अनेक फोटो होते  आणि तो गाईड पण पोट तिडकीने सगळं सांगत होता, खूप सुन्न करणार होत, तूर संपल्यावर मी ते परत सगळ पहायला आलो. दोन चार गोष्टी परत वाचल्या त्यातल एक वाक्य मनात राहील "Erase and Replace" . म्हणजे त्या लहान मुलांचं आधीचा इतिहास पुसून टाका आणि नवीन इतिहास डोक्यात भरा.... आधी त्या मुलाच नाव बदला मग त्याचे केस कापा, इथे सुद्धा आई बाप गेल्यावर केस कापायचे असा नियम होता, म्हणजे त्या लहान मुलांच्या मनावर मोठा आघात , मग त्यांचा धर्म बदला आणि मग भाषा शिकवा. एक माणूस घुलाम म्हणजे पुढची पिढी घुलाम साहेबाने हे सगळीकडेच केलं,. 

भारतात खूप दिसत असं ... जुना इतिहास नाहीच आणि नवीन कसा खरा हे लोक पटवून देत लोक फिरतात .... इतिहास फक्त गेली १०० वर्ष आधीच सगळं खोट ... म्हणजे नुसतं इंग्रजी बोलता आलं म्हणजे जी लोक स्वतःला उचभ्रु समजतात ती घुलाम असतात का? 

मग मी बाकीचा मुसियम बघितला आणि यात मग लोकल handicraft होते, इथे खूप लोकांना बंदिस्त करून ठेवलं होत अगदी १९३० पर्यंत तायतलाच एक माणूस पुढे मूर्तिकार झाला मग याची मूल पण मूर्तिकार. मग तो मुसियम कुणी बांधला हा इतिहास. हर्ड नावाच्या कुटुंबाने तो बांधला आहे , अति श्रीमंत माणूस होता त्याची बायको आणि त्याने बांधलाय. म्हणजे बाई श्रीमंत होती आणि ह्या माणूस तिच्या वडिलांकडे नोकरी करायचा मग त्या बाईशी लग्न करून श्रीमंत झाला वगैरे..... पण त्याच्या इतिहासात मला रस न्हवता. त्या लोकल लोकांच्या हातमागाचे काही काम ठेवले होते , मग चित्र कला आणि काय काय ... 

हे सगळं झाल्यावर मग मी दुसरा भाग पाहायला गेलो तसच तास भर, पण ती सगळी कलाकृती ते आधी कसे राहायचे भांडी कुंडी स्वयंपाक कसे करायचेत वगैरे .... मी कंटाळलो थोडा , कारण तिथे खूप ववीवीध प्रकारचे लोक काबिले त्यांचे कपडे राहणी वगैरे तेच तेच होत .. एक गमतीचा भाग म्हणजे त्या आदिवासी बायकांना कपडे घालायची सवय न्हवती, म्ह्णून इंग्रजाने त्यांना सांगितलं कि बाजारपेठेत येताना पान लावून या... मग त्या बायका बाजारपेठेत कपडे घालायच्या आणि वाटेत जाताना ते लगेच काढून टाकायच्या . साहेब कपडे घाला म्हणून सांगत होता ... हे ऐकून गम्मत वाटली, आता ह्यांना कपडे घालायची फार जाण नाहीये, म्हणजे कपडे काढण्याची सवय ह्या गोऱ्यांना त्या दिवासींनी लावली म्हणायची ... 

दोन अडीच तास फिरून दमलो होतो , जरा टेकलो नि निघालो परत. पण घुलामी बद्दल बराच ज्ञानी झालो, आपलं नशीब चांगलं आहे कि आपण अजून मराठी बोलतो , लिहितोय वाचतोय .. स्वतःच अस्तित्व टिकवून आहोत ... 

फार इंग्रजी इंग्रजी करू नका आपण काही गोरे नाहीत, त्या मुळे आपण इंग्रजीचा हट्ट धरण म्हणजे घुलामी चा हट्ट करण्या सारखं आहे . 










Monday, May 20, 2019

घुलामी 1 -- फिनिक्स अरेझोना अमेरिका

घुलामी :

मी सवयीचा गुलाम आहे, कुठे जायचं असलं कि रात्री झोप नाही, गजराच्या आधी दोन तास उठायचं आणि गजर वाजे पर्यंत कुशी बदलत जागायचं. आता खरं तर मी हल्ली दर आठवड्याला दर बदल करत असतो, पण तरीही ९ च्या विमानाला ७ ला एअरपोर्ट गाठायचा हि सवय आणि त्यामुळे चार ला उठायचं. तर आज मी असाच साडे सातला निघायचं म्हणून मध्य रात्री पासून जागा राहून एअरपोर्ट ला पोहोचलो आणि मला कळलं कि विमान रद्द आणि कहर म्हणजे मला जी फ्लाईट दिली ते रात्री ११. म्हणजे सकाळी सात ला विमान आहे म्हणून नीघालेला मी आता १४ तास करू काय ह्या संभ्रमात पडलो . जरा गाव हिंडून यावं म्हंटल आणि उबर शोधायला मोबाईल बघितला तर मला साडे पाच ला sms होता, विमानाची वेळ बदलल्याचा. पण इथे अमेरिकेत नवीन नंबर त्या मुळे sms कोण बघतोय आपण whatsapp चे गुलाम . 

अर्धा तास चीड चीड करून (स्वतः वरच, इथे कोण विचारतय मला?) मी शेवटी त्या बाईला विचारलं कि कुठे फिरू शकतो का? ती म्हणाली कि ह्या विमान तळावरच्या शटल नी जा म्हणजे बाहेर तुला मेट्रो मिळेल, चार डॉलर मध्ये दिवस भाराचा पास मिळतो. मग मी चार मजली escalatar चढून गेलो तर नुसती ह्या टर्मिनल पासून त्या टरमीनल ला जाणारी शटल. आता शटल म्हणजे खर तर मेट्रोच आहे. मी गोंधळलो, शेवटी एका माणसाला विचारलं (माझा अजून माणसा वरच जास्त विश्वास आहे) कि अरे गावात जायचंय (गाव म्हणजे शहर) कस जायचं? त्यांनी एकदम सविस्तर सांगितलं, आधी हि विमानतळावरची मेट्रो घे दोन स्टॉप जा , मग उत्तर, एक दोन माजली escalator लागेल ते उत्तर, मग समोर एक मोठा ब्रिज दिसेल तो पार कर, तो संपला कि खाली उत्तर, ते स्टेशन त्या मेट्रो च ..... (हे सगळं गूगल बाई नाही सांगत, इथे तर head north west take second exit असं म्हणते मला डावीकडे उजवीकडे कळत ईशान्य , नयऋत्य म्हणलं कि भोवळ येते) तर मी तसाच गेलो आणि बरोबर उतरलो. पण मला काय ते टीकेत मशीन टीकेत देईच ना, म्हणजे माझं कार्ड ते घेतच न्हवत आणि माझ्या कडे चार डॉलर सुट्टे न्हवते , तेवढ्यात तिथून एक मुलगी आली, ती त्या मेट्रो मधेच काम करणारी होती, तिने पण प्रयत्न केले, पण नाही , अजिबात ते मशीन कार्ड घेत न्हवत , मग तिने शांत पणे दोन नाणी खिशातून काढून मला तिकिट दिल, मी म्हण्टलं अरे असं काय, असू दे म्हणाली, मी म्हंटल थांब मी बघतो थोडे सुट्टे आहेत का , तर दोन नोटा मिळाल्या एक डॉलर च्या मी बळेच तिले दिले, ती नाहीच म्हणत होती, शेवटी घेतले आणि म्हणाली कि वचन दे कि तू पण अशीच मदत कुणाला तरी करशील. pass on the kindness :). सगळं अजब आहे इथे, एरवी कुणी तुम्हाला विचारात पण नाही आणि इथे हे असं, म्हणूनच हा देश तरलाय, तरलाय कसला? चांगलाच बहरलाय ..त्या दिवशी जेम्स आणि आज हि ...तेजस नी सांगितल्या पासून सारखेच एंजेल भेटायला मला :). 

मग तीच मुलगी मला इथे जा तिथे जा सांगत होती, पण माझ्या कडे भली मोठी बॅग होती (केबिन बॅग पण कपडे होते त्यात दोन आठवड्याचे), कुठे फिरू म्हंटल, मुसियम वगैरे आहेत ना? खूप आहेत सायन्स आर्टस् कल्चर इतिहास सगळेच . बघून ये म्हणाली दोन चार आणि दोन चार ठिकाणची नाव सांगितली .  मी बघतो म्हणालो. मग सवयी प्रमाणे एक स्टेशन आधी उतरलो, पुढच्या गाडी करता थांबलो आणि मग करेक्ट ठिकाणी गेलो. ही मेट्रो म्हणजे ट्राम सारखी आहे, रस्त्याच्या मधून असते, रूळ असतात, पण रस्त्यातून जाते, म्ह्णून जिने चढा उतरा असा प्रकार नाही. माझ्या कडे बॅग होती त्या मुळे  मी हर्ड मुसीयम मध्ये जायचं ठरवलं , दोन कारण, एक म्हणजे इथे आधी राहायचे त्या लोकांचा इतिहास, ज्यांना ही लोक इंडियन म्हणतात ते त्यांचा इतिहास आणि त्यांची कलाकृती इथे होती आणि दुसरं म्हणजे ते मुसियम स्टेशन जवळ होत, त्या मुळे मी माझी बॅग सहज ओढत नेऊ शकत होतो (बाकीचे सायन्स ची ठिकाण होती आणि मी सायन्स पेक्षा कला आणि इतिहासात रमणारा आहे, हे तिसरं कारण, थोडं जास्त खर). 

इथे आल्यापासून मला एक मोठी उत्सुकता होती कि इतक्या मोठ्या जागेत राहायचं तरी कोण? म्हणजे जिथे एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत ३ ते ४ तास (विमानाने) जायला लागतात तिथे कोण राहायच? निर्मनुष्य तर नक्कीच नसणार, भाषा तरी काय होती? ही लोक इंडियन म्हणतात पण आपण इथे न्हवतो..कधीच ...  मग? तो कोलंबस इंडिया शोधायला गेला आणि तो इथे आला आणि इथल्या लोकांना इंडियन म्हणाला म्हणून हे इंडिअन? फक्त केस काळे आणि गोरे नाहीत म्हणून इंडियन? मेक्सिको मध्ये सगळे स्पॅनिश बोलतात कारण स्पेन ने इथे इसवीसन १६०० ते १८५२ पर्यंत राज्य केले आणि ह्यांना ओरबाडून नागवे केले, तरी ते स्पॅनिश बोलतात मूळ भाषाच नाही. पण ते खाली होते इथे थंडीत बर्फात कोण होतं? इथे वाळवंट पण आहे तिथे कोण होत? जंगलात कोण होत? दर्या आहेत डोंगर आहेत मोठी माळ रान आहेत (होती) तिथे कोण होत ? खूप प्रश्न होते आणि मला नकळत इथे थोड्या प्रश्नाचा उलगडा झाला. 

हे हेर्ड मुसीयम म्हणजे तथाकथित इंडियन लोंकाची संस्कृती आणि इतिहास दाखवणार एक मुसीयम, दहा बारा हजार स्केयेर फुटात दहा बारा शतकांचा इतिहास दाखवण्याचा (केविलवाणा) प्रयत्न आहे ... आपण खूप बरे.  आपण इतके आघात , आक्रमण सहन करून संस्कृत जपलं, कितीही लोकांना खोटं वाटलं तरी रामायण, महाभारत जपलं पुराण, जपली, वेद बहुरू दिलेत नवीन कल्पना स्वीकारल्या सगळ्या भाषा जपल्या आता जलद गतीने गुलाम गिरी कडे चाललोय ते सोडा, पण आपण अजून १४ अधिकृत भाषा बोलतो त्यांच्या पोट जाती १४०० त्यांची स्वरूप १४०० ते सगळं जपलय,  खूप जपलं, इथे येऊन त्या आधीच्या जे कुणी असेल त्यांचा इतिहास नेस्तनाबुत झालेला पाहून वाटत कि आपले पूर्वज खरच महान होते .... जितक विज्ञान पुढे जायला महत्वाचं तितकाच मुळांना बळकट करायला इतिहास गरजेचा .. इंग्रजी शिकण्याकरता मराठी विसरायचं कारण नाही हे इतिहास शिकवत.  आईची ममा झाली तरी माया हि आईची असते हे तीथे ममा चा हग (काय पण शब्द निवडलाय) कमी पडतो ... असो  

इथे हर्ड मुसीयम मध्ये हे मला पाहायला मिळणार म्हणून मी आलो .... इथे दोन भाग आहे, एक म्हणजे इथला इतिहास आणि इथली (म्हणजे इंडियन्स ची)संस्कृती .. इतिहास गोऱ्या साहेबानी लिहिलाय आणि संस्कृती तोच गोरा साहेब दाखवतो आपण यातून बोध घायचा ... .. 

क्रमशः





Thursday, February 28, 2019

अमेरिका ११

अमेरिका ११

कॅलिफोर्निया -लॉस अँजेलिस -बेव्हर्ली हिल्स -  हॉलिवूड - कोडॅक थेटर - युनिव्हर्सल स्टुडिओ ......हे सगळं माझं बघून झालं , म्हणजे थोडं (फार नाही) जे पाहायचं असत ते म्या पाहिलं ना लेको ....

६ च विमान पकडून साडेचार तास (विमानाने) प्रवास करून साडे सातला LA , म्हणजे लॉस अँजेल्स ला आलो , साडे तीन तासाचा फरक असल्या मुळे हा कारनामा , परत जाताना आखा दिवस गेला कारण तेच सडे तीन तास उलटे झाले. 

एअरपोर्ट वरून आम्ही आधी बेव्हर्ली हिल्स ला गेलो, तिथे जाताना अशी गरिबीशी अमेरिका दिसली, बांद्रा ईस्ट ते वेस्ट कसा असेल प्रवास? म्हणजे अगदीच ईस्ट इतकं नाही पण थोडं गरीब . तर तो एकदम गरीब एरिया आणि लगेच पाच मिनटात एकदम पॉश टकाटक, जिथे अति श्रीमंती तिथे अति गरिबी असतेच का? देश बदलला खंड बदलला तरी तेच , काहीतरी प्रॉब्लेम आहेसच .... 

खूप पिक्चर मधून मी ते हॉलिवूड पाहिलं होत ..आहे. त्या मुळे तिथे बाहेर गाडीतून बघताना मला खूप नवीन असं काही वाटलं नाही, पण  स्वाती आणि मी गाडीतून उतरलो आणि एकदम ते वार  अंगात गेलं , एक मोठा फरक म्हणजे इथे , (इथे म्हणजे हॉलवूड ला) खूप थंडी नसते आणि मी आलो होतो -३ डिग्री मधून त्या मुळे तिथे अंगावर चार पाच कपडे घालूनच फिरायचो , हॉलिवूड ला फक्त शर्ट आणि वरती हुडी, त्या मुळे अक्षरशः वार अंगात भिनल .... पण काय ते वातावरण राव , खूप लोक, हसणं खिदळण, त्यात रस्त्यात काही लोक स्पायडर मॅन,  सुपर मॅन , हल्क अशी निरनीराळ्या पात्रांचे कपडे घालून वावरत होती  नुसतं भिर भिर नजर, एक म्हणजे इथे गर्दीत सुद्धा शिस्त आणि स्वच्छता हे दोन्ही असत,  त्या मुळे चालायला बर वाटत, त्यात हवामान थंड आजूबाजूला जरा बरे चेहरे, वातावरण आनंदी. गाडीतून उतरल्यावर एवढा मोठा बदल जाणवत असतानाच पाया खाली एकदम मायकल जॅक्सन आला ... त्या रस्त्यात फूटपाथ वर सगळ्या नट , नट्यांची नाव कोरलेले अनेक दगडं लावली आहेत, म्हणून स्वाती म्हणाली, "अरे खाली बघ काय"? तर सगळे हॉलिवूड स्टार, मला काय खूप लोकांना ओळखता नाही आलं, माफक आठ दहा नट नट्या ओळखीचे . त्यांना ओलांडून आम्ही कोडॅक थिएटर, म्हणजे डॉल्बी थेटरात गेलो, इथेच ते ऑस्कर अवॉर्ड्स होतात. तो मोठा जिना पहिला (तिथे मी फोटो पण काढले ), त्या वरून मी चालत गेलो (थिएटर बंद असत) आणि मग आपल्या मॉल  तसंच . फूड कोर्ट आणि दुकान असं लागत आणि तिथून वरच्या मजल्यावरून ,  समोर तो फेमस हॉलीवूड असं लहिलेला बोर्ड दिसतो डोंगरातला .   त्या डोंगरात पण जात येत पण तिथे काही गेलो नाही मी कारण तो डोंगर आहे आणि त्यात काही नाही असं मला सांगितलं आणि जवळून बोर्ड पण दिसत नाही . दुरून डोंगर साजरे हि म्हण इथेच जन्माला आली असणार.

मग आम्ही नको त्या वस्त्तु नक्को त्या भावात घेतल्या, म्हणजे ते फ्रिज ला लावायचा लोह चुंबक, छोटे ग्लास ज्यावर हॉलिवूड लिहिलं होत असं अनेक. ... आणि आम्ही बेव्हर्ली हिल्स फिरलो (गाडीतून), पण काय सांगू एकदम पॉश दिसायलाच श्रीमंत ... म्हणजे एकेका घराची किंमत कैक लक्ष डॉलर्स असेल, पण दिसायला पण छान होती घर, नुसतं पॉश असं नाही. श्रीमंती अशी वाहत होती ..तिथेच त्या ब्रॅनजेलिनाच घर आहे म्हणे, आता अँजेलिना राहते म्हणा त्या ब्रॅड ला पिटा ळला ... असो आपल्याला काय करायचंय? पण ते वार शिरलं ना मगाशी, म्हणून आपल थोडं गॉसिप , बाकी काही नाही . तिथे आम्ही उगीच गिरी गिरी फिरलो (मजा आली पण ) सगळी श्रीमंती बघत आणि मग ग्रिफिथ observatory ला गेलो ताऱ्या तुन तारे बघायला . म्हणजे जागा पण काय निवडली बघा .. observatory म्हणजे जिथे तारे बघतो ते आणि बॉलिवूड जिथे तारे राहतात ते अगदी एक मैलावर वर .... मैला वरून आठवलं , इथे किलोमीटर नाही, म्हणजे किलोमीटर आहे हो, पण अंतर , गती, हे सगळं मैलांनी मोजतात आणि आपण मुंबईत वेळेने अंतर मोजतो, म्हणजे सकाळी ९ वाजता बोरिवली ते अंधेरी २ तास, दुपारी एक आणि पहाटे पंधरा मिंट. तिथे शहाणी आहेत लोक, मैल म्हणजे वेळ असं एकच समीकरण ठेवतात .

मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत, हॉटेलात आलो, तेव्हा वाण सामान आणायला बाहेर पडलो आणि त्या रिसेप्शन  वरच्या माणसाला विचारलं, कि वॉलमार्ट किती लांब आहे? पाच मिंट म्हणाला, म्हंटलं अरे वाह फारच छान, कुठच्या दिषेला? असा सरळ जाऊ का? त्यानी एक भुवई उंच करून विचारलं? कसा जाणार? म्हंटल पाई , तिथे सगळेच गाडी घेऊन फिरतात (पट्टेवाला सुद्धा), ५ मैल आहे म्हणाला , गाडीने पाच मिंट (बोरिवली ते अंधेरी जवळ पास तेवढंच आहे अंतर , एक दोन मेल जास्त फार तर ) चालत नाही असं म्हणाला. 

तर सांगायचा मुद्दा असा कि तारे आणि चांद तारे हे हाकेच्या अंतरावर आहेत इथे हॉलीवूडला.

ती ग्रिफिथ observatory अजब आहे. एका टेकडी च्या कड्यावर आहे, डोंगर म्हंटलं असत पण एवढा उंचीवर नाही पण अगदी पर्वती इतकं जवळ पण नाही, पण वर गेलं फार वरती  वाटतं कारण एकी कडे थोडी दरी टाईप्स आहे (आणि इथून पण तो फेमस हॉलिवूड चा डोंगर दिसतोच) आणि बाकीकडे बघितलं तर लॉस अँजेल्स शहर  दिसत , उन्हाळल्यात छान दिसत म्हणे, पण थोडे ढग होते मी गेलो तेव्हा म्हणून नीटस नाही दिसलं. पण तरीही एरवी छान दृश्य असेल ह्याचा अंदाज आला . अमेरिकन सैन्य , (म्हणजे कुणी एके काळी ब्रिटिशच असलेली  लोक)असे डोंगर दर्या दिसल्या कि जाऊन त्यावर ताबा घायचे. असं करत करत अक्खा देश काबीज केला. त्यातला  हा एक डोंगर. थोडा इतिहास सांगायचा तर युरोप वरून आलेला साहेब आधी पूर अमेरिकेत शिरला अटलांटीक ओशियन मधून, मग आहे पश्चिमेला आला. तसे फ्रेंच, स्पॅनिश आणि डच पण आले होते, पण इंग्रज वरचढ निघाला आणि अक्खी अमेरिका घेऊन बसला. तर हा डोंगर कमावणारा माणूस, म्हणजे कुणी मेजर जनरल असेल तो त्याच नाव ग्रिफिथ. त्याला एके दिवशी दुर्बिणीचा शोध लागला आणि मग तारे बघायचा छंद लागला (हॉलिवूड नंतर आला इथे ) . मग त्याने हा डोंगर लोकल मुनिसिपालिटी ला दान दिला हि observatory बांधायला, एक अट होती , ती म्हणजे नाव त्याचं द्यायला  लागेल. मुनिसिपालिटीच ती इथली काय आणि तिथली काय? खूप वर्ष थांबून, मग ते हो म्हणले. असं राज रोज पणे फुकट घायची सवय नसते बहुतेक मुनिसिपालिटी ला, टेबला खालून दिल असत तर लगेच घेतलं असत.

तर इथे ते सूर्यवरच घड्याळ आहे, म्हणेज सावली वरून वेळ कळते ते (जे आपल्या जयपूरच्या जंतर मंतर मध्ये आहे आणि ते ह्यांच्या खूप आधी बांधलेल) आहे आणि आपली सोलर सिस्टिम मस्त जमिनीवर आखलेली आहे. खूप छान मनोरंजक बांधून काढलंय. आत पण बरीच चित्र देखावे दुर्बिणीतून दिसणारे तारे आहेत. म्हणजे एक भिंत केली आहे आपल्या सिनेमा हॉलचा पडदा असतो ना? तशी आणि बालकनीत दुर्बिणी , त्यातून बघितलं कि तुम्हाला कळत कि त्या पडद्यावर टिम्ब टीम्ब नसून, आपली गॅलॅक्सि आहे. म्हणजे आकाशात बघितलं कि तुमहाला जस दिसेल तस महाल दुर्बिणीत दिसत. दोन तीन माजले आहेत, वर गच्चीत एक मोठी दुर्बीण आहे, खूप जुनी जिथून तो गिल्बर्ट सगळं आकाश बघायचा ती. ती नेमकी बंद होती (बंदच असणार, नशीब, दुसरं काय?) अजून कार्यरत आहे ती.

खाली दुकान आहे त्यात तुम्ही पुस्तक किव्हा वस्तू घेऊ शकता ज्यात तुम्हालgravity , galaxy सगळे ग्रह ह्यांची माहिती मिळते. वेगळं आहे. तिथेच एक हॉटेल आहे (ते टुकार आहे). दोन छोटी थिएटर आहेत, त्यात ते छान माहिती पट दाखवतात. आम्ही एक शो पहिला त्यात सगळ्या observatory ची माहिती आहे म्हणजे तुम्ही काय पाहायचं? ते सांगतात (आम्ही ते शेवटी बघितल म्हणा जाऊदे) आणि हे सगळं तो स्टार ट्रेक मधला मिस्टर स्पॉक सांगतो , जुन्या स्टार ट्रेक मधला लिओनार्ड निमॉय. मस्त आहे अजून, मला काय सगळ्यांचाच आवडता होता. ते सगळ पाहून दमलो मी. अजून काही बाही असेल पण इतके तारे बघून पोट भरलं , म्हणून आम्ही निघालो. खूप ट्रफिक होता , पण आमची गाडी आम्ही टेकडी खाली उभी केली होती म्हणून बर झालं.

दमून बघून मग मी स्वातीच्या घरी, म्हणजे ६० मैल (तरी सुद्धा साठच मिंट ) जायला निघालो. वाटेत थोडं ट्रफिक लागलं कारण ख्रिसमसची सुट्टी होती, म्हणून सगळेच घरा बाहेर पडले होते. पण तरी निवांत आलो....


Saturday, December 22, 2018

अमेरिका १०

अमेरिका १०

दिसला रे बाबा डोंगर एकदाचा, मी ओक्लहोमा हुन LA ला येत होतो, म्हणजे लॉस अँजेल्स, काय नशीब आहे बघा, केदार राहतो इस्ट कोस्ट  आणि स्वाती वेस्ट, (जावं लेको मजा करा, मटार उसळ खा शिकरण खा).  आता पर्यंत मी अर्धाच भाग पहिला होता अमेरिकेचा. आता एक रेष पूर्ण करून पलीकडे आलो, म्हणजे एका रेषेत आलो पुढे, अजून खाली वर, आजू बाजू , अशी बरीच आहे, म्हणजे कलकत्ता केलं थोडं मध्य प्रदेश आणि आता मुंबई .... आणि हा देश आपल्या पेक्षा दहा पट मोठा आहे.

तर आज LA जवळ आलं तेव्हा थोडं उजाडलं होत, सकाळी ६ ची फ्लाईट होती, इथे आली सौवा नऊला पण वाजले होते सौवा सात . म्हणजे प्रवास केला ३ तास, पण मी गेलो दीड तासात , कारण २ तास घड्याळ पाठी जातं. आणि इथे येता येता थोडी सकाळ होत होती आणि एकदम चार आठ डोंगर दिसले, एकदम हायस झालं आणि दोन एक दिवसात समुद्र पण दिसेल कि एकदम बर वाटेल. छान होते डोगर बोडके होते, खूप भले मोठे न्हवते पण होते कॅरी ते ओक्लोहोमा आणि कॅन्सस सगळं सरळ प्रदेश डोंगर नाहीत , इथे आहेत. मस्त वाटलं थोडं ऊन . पण अजून माझ्या डोळ्यात त्या आल्प्स च्या वरती दिसलेला बर्फ आणि मधेच डोकावणारा सूर्य , टूमदार घर , मस्त ढग ... पण दिसला डोंगर ते बर झालं . 

इथे विमानात काही देत नाहीत खायला ,फक्त  जूस आणि चहा आणि दारू , लांबची फ्लाईट होती म्हणून आधी मी जूस घेतला आणि उतरायच्या आधी चहा (तास भर झोप झाली होती), पण खूप लोकांनी दारू घेतली शेजारी मध्यम वयाच्या जोडप्याने दोनदा स्क्रू ड्राइव्हर आणि पाठच्या माणसाने जॅक डॅनिएल्स घेतली. संजय मला एकदा म्हणाला होता, कि तो गोव्याला एका ठिकाणी राहिला होता तिथे सगळे PHD होते, म्हणजे सकाळी चहा आणि व्हिस्की एकदम, आम्ही दुपारी बिअर वाले, इतक्या पहाटे दारू? असहि विमानात मी अजिबात दारू पीत नाही, फार तर भारतात उतरायच्या आधी एखादी बिअर. त्या दिवशी तर बर्फ पडला रविवारी म्हणून माझी फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून मी थंडीत एक पेग मारला जेवताना आणि गुडूप झोपलो तर मला इतकं गिल्ट आलं दुपारी प्यायलो म्हणून ... आणि इथे सटासट सकाळी दारू काम सुरु होत, गोव्याला सुट्टीला गेल्यावर सकाळी दारू पिणं वेगळं आणि प्रवासात जाताना वेगळं नाही का? म्हणजे माझ्या करता ... 

हा एअरपोर्ट तसा बराच मोठा आहे, म्हणजे मोठ्याहून मोठा, आठ टर्मिनल्स ... पण सुबक नाही वाटला (इथे सुबकतेचा अभाव आहे, प्रचंड मोठे भारदस्त आहे, सुबक दिसलं नाही मला अजून), आपला छान आहे , म्युनिक झुरिक पण मस्त आहेत, मोठे झाले कि कुरूप होतात का ? कुणास ठाऊक? पण झुरिक पण मोठा आहे तसा .. असो आता दोन दिवस इथे फिरतो आणि सांगतो काय गंमत आहे इथे 


अमेरिका ९

अमेरिका ९

इथली विमान तळ मी आधी सांगितल्या प्रमाणे खूप मोठी आहेत (आता खूप मोठं खूप मोठं हे सांगून पण खूप दमलो) आणि इथून तिथे जाईला बहुतेक करून विमान बदलावं लागत , म्हणजे पळापळ नुसती. गेल्या आठवड्यात मी जेव्हा ओक्लाहोमा ला कॅरी हून आलो तेव्हा कॅरीला बर्फ होता आणि सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल. दुसऱ्या दिवशी थोडा (अधिक)गोंधळ होताच, माझी फ्लाईट २ तास डीले , त्या मुळे पुढली फ्लाईट चुकली आणि मला विमानात चढायच्या आधी पुढली फ्लाईट बदल्याच कळलं, म्हणजे त्यांनीच मेसेज केला. 

उतरलो तर कळलं कि पुढली फ्लाईट १५ मिनटात सुटणार दार बंद होयला पाच मिनटं होती आणि इथे,  माणसं नसतात ना हो विचारायला , मग तो बोर्ड बघा तुमचं विमान कुठल्या गेट वरून सुटणार ते पहा .... (त्या होम अलोन मध्ये नाही का तो मुलगा भलतीकडेच जातो? ते अगदी खरंय....  ) आणि पळा .... (रोज नॅशनल पार्क ला धावण्याचा हा एक फायदा नक्की झाला ) , माझ्या नशिबाने दुसरं विमान अगदी जवळूनच सुटणार होत, आपल्याला इथे एवढी कल्पना येत नाही, पण इथे बहुतेक विमान तळांवर ६० ते ७० गेट परत टर्मिनल अनेक, मी धावत माझ् विमान पकडायला गेलो आणि त्या बाईला (जी बाई तुमचा बोर्डिंग पास बघून विमानात सोडते आणि अगदीच विमानाच्या तोंडापाशी असते तिला ) सांगितलं कि माझं विमान वाटेत बदलल.... तिला कळलंच नाही ...एक तर मी असाही खूप फास्ट बोलतो त्यात धावत आलो होतो त्यात विमान सुटेल हि भीती त्या मुळे आणिक धड धड.  .. विमान बद्दल म्हणजे? तिने विचारलं मी त्या वेळेला जितकं शांत पणे सांगता येईल तितक्या शांत पणे, सगळं सांगितलं कि काल बर्फ .... फ्लाईट कॅन्सल .. आज उशीर .... वाटेत मेसेज कि कनेक्टिंग फ्लाईट वेगळी .... ए शिवराम गोविंद नाव सांग .... असं ओर्डेरली च्या थाटात त्या कॉम्पुटर कडे बघून म्हणाली, मला परत नाव विचारायचं तास कारण न्हवत कारण तिथे दोनच माणस फ्लाईट पकडायची बाकी असल्याचा दाखवत होती, एक जेम्स का जिम आणि दुसरा सागर सुधाकर कुलकर्णी असं ठळक दिसत होत ... माझ्या पाठी जिम का जेम्स (शांत पणे ) उभा होता  , म्हणजे सागर कुलकर्णी हाच,  हे डोनाल्ड ट्रम्प पण सांगू शकला असता ... असो . तर तिला म्हंटल मला बोर्डिंग पास घेता आला नाही कारण मी पळत इथे आलो कारण विमान सुटणार होत. खिडकी क्रमांक ३ वर जा असं तत्सम काही तरी बोलली, मी म्हंटल कुठे आहे ती खिडकी? , आता जातो बोर्डिंग पास छापतो आणि देतो लगेच आणून तुला. ते विमान जरा थांबून ठेव, कारण त्या खिडकी समोर दहा माणसं होती ... थांब म्हणाली मी फोन करते तिकडे,  आणि  तिनेच परवानगी काढून मला जा असाच म्हणाली बोर्डिंग पास शिवाय. त्या सौथवेस्ट मध्ये सीट नंबर नसतो कुठेही बसा असत, त्या मुळे मला फावल .... मी बसलो आणि पाच मिनटात विमान आणि मी सुटके श्वास सोडला... 

तर सांगायचं असं कि इतकी विमान इतकी विमान तळ इतके गेट्स इतके प्रवासी .... सगळं नीट सुरळीत . पण मला प्रश्न पडतो कि अशी धावपळ करायला म्हाताऱ्या माणसांना कस जमणार? पण इथे म्हातारी माणसं खूप फिरतात त्यांना आधी चढायला वगैरे मिळत आणि व्हील चेर असते, पण जे थोडे असतील म्हातारे ते? ते काय करत असतील? म्हणजे ज्यांना व्हील चेर लागत नसेल तसे बरे असतील पण धावू न शकणारे , ते काय करत असतील? हा प्रश्न मला फार पडतो. पण फिरतात बाबा, खूप आजी आजोबा दिसतात , तसे तब्येत राखून असतात , बरं वाटत बघून, आनंदी दिसतात आणि बहुतेक करून जोडीने असतात . म्हातारी माणस इथे खूप ऍक्टिव्ह असतात , म्हणजे मी जिथे आलो आहे तिथे ती बाई ६६ वर्षांची आहे CFO आहे आणि रोज २०० किलोमीटर प्रवास करते स्वतः गाडी चालवते .  नऊ नातवंड आहेत , एकदम चपळ, छोटीशी आहे पाच फूट पण नसेल आणि एकदम कडक.   म्हणजे कडक नाही रे, कडक मास्तर सारखी.  मालक तेवढाच असेल (कडक आणि म्हातारा ).  सगळेच म्हातारे , रिटायर कुणीच होत नाही वाटत. 

काल उबर केली तर एक साठीची बाई होती, मी बसल्यावर उबर बंद केलं, नातवाला पिकअप करायचं म्हणाली सुनेला ख्रिसमस पार्टीला जायचं आहे, मुलाला उशीर होणारे, मग तुला ड्रॉप करेन आणि घरी, मग वाटलं तर परत अँप चालू. ती म्हणाली कि म्हणून तिला उबर आवडत , हवं तेव्हा काम करा , नाहीतर बंद ... म्हणजे आजी च्या वयाच्या बायका पण सर्रास काम करतात आणि आनंदी असतात , म्हणूनच  असतील म्हणा . 

आज पण उबर वाला थोडा वयस्कर होता , बिटकॉइन बद्दल बोलला , माझ्याकडे करोड नाहीत, पण पै पै करून कसे करोड होतील ते बघायला हवं. असं म्हणून बरेच इंटरेस्टिंग बोलत होता. चाइनीस , अमेरिकन आणि भारतीय ह्या बद्दल बरच ज्ञान होत , वयाने जास्त असल्या मुळे अनुभव पण असेल .... 

थोडं विषयांतर झालं विमान आणि एकदम म्हातारी माणसं , पण एकदोनदा म्हातारी ऐरहोस्टेस पण होती आणि ह्या खेपेस नेहमी सारखी म्हातारी माणस पण दिसली विमानतळावर आणि उबर ला पण चार वेळा थोडी वयस्क माणस होती परत मी जिथे जातोय तिथे पण अशीच ६० उलटलेली दिसली म्हणून असेल , हा देश नवीन आहे तसा,  पण माणसं म्हातारी दिसतात .... काय कनेक्शन ठाऊक नाही पण लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं 



Wednesday, December 19, 2018

अमेरिका ८

अमेरिका ८ 

तेजाब मध्ये अनिल कपूर एक डायलॉक मारतो कि नासिक हो या मुंबई लडकी पटाने का फॉर्मुला एक हि होता हय तारिका  अलग .... असा काय सस ..... मी खूप वेळा म्हणालोय कि आपण खूप वेगळे आहोत ...आज असं म्हणतो कि आपण वेगळे आहोत पण तरी थोडे शेम टू शेम आहोत 


त्यांच्या बातम्या शेम आपल्यागत , एकदम बडा चढाके, त्यांचे बुद्धी जीवी पण तसेच, येऊ द्या बाहेरच्यांना येऊ द्या, (म्ह्णून तो ट्रम्प झिंकला).  TV वर ads जास्त ... पण तरी आपण खूप वेगळे ..... ही लोक ९०% मांसाहारी आपण दाखवायला ९०% शाकाहारी (आणि उरलेले सरकार नाही म्हणत म्हणून गाय खाणारी) .......  ही लोक माश्याला अन अंड्याला मांसाहार समजत नाहीत म्हणजे सगळं कोकण शाकाहार . मला कुणीतरी विचारलं कि तू व्हेज आहेस का? मी म्हंटल मला चिकन , टर्की आवडत नाही मासे आवडतात अंडी रोज खातोय इथे, अजून तरी एक प्लेट गायची ऑर्डर नाही दिलीये. तर you are veg म्हणाला. इथे मिळेल तेव्हा मासा खातो पण ताजा नाहीच .... असो मी पणा आला फार .... गुण नाही पण वाण आला ह्यांचा ....वाण कसली येते त्यांच्या एका बुटात आपलं शु रॅक येईल.

तर मला आत्त्ता कळलं कि आपण यूरोप च्या जवळ असून अमेरिकन का? मला स्वतःला यूरोप फार आवडतं एक तर माझी पहिली फेरी तिथली आणि थोडा अधिक फिरलोय म्हणून ...  इथे आपल्या सारखंच (मुंबई सोडल्यास) बशी किव्हा ट्रेन नाहीत स्वतःची गाडी हवी .... फरक म्हणजे इथे नियम पाळतात ...... दुसरं असं कि स्वतःच्या खूप प्रेमात,  सगळेच शाह रुख एकदम कॉन्फिडन्ट आगाऊ , आपण एक कवच पांघरून फिरतो आतून सगळेच शाहरुख आगाऊ ..लोक येडे वगैरे ... पण एक महत्वाचा फरक यूरोप मध्ये आणि इथे असा कि यूरोपात लोक सुट्ट्या घेतात इथे लोक खूप राबतात , म्हणजे की जिथे गेलो तिथे लोक खूप रजा घेताना नाही पाहिली ...मी आत्ता ओक्लाहोमा ला आहे तिथे शनिवार अर्धा दिवस हापिस चालू , आता बोला .

ओक्लाहोमा वरून आठवलं ... केदार म्हणाला होता you can't pay me enough to shift to oklahama त्यांना इतिहासाचं नाही ... आज मी ज्या ठिकाणी आलो त्या मालकाने  (मी ज्या कंपनीत कन्सल्टन्सी करता आलो आहे ते, माणूस खूप श्रीमंत आहे  )मला सोडताना एक थोडं ह्या सिटी बद्दल सांगितलं , (इथे राज्य पण ओक्लाहोमा आणि शहर पण तेच नाव सगळंच ते....)हे शहर १८८९ साली जन्माला आलं  आणि केए दिवशी एक तोफ उडवून जावं मजा करो असं म्हणून जी जागा घेता येईल ती तुमची असं म्हणून दहा हजार लोकांनीं हे शहर घेतलं.  आधी इथे खूप अराज्य  होत पण आता सगळं नीट आहे, तरी अमेरिकेत बंदूक पोसायला आणि बाळगायला परवानगी आहे म्ह्णून लोकांकडे बंदुका आहेत. आणि माथे फिरूंची संख्या इथे आपल्याहून अधिक.

ह्यांचा इतिहास फार तर २०० वर्ष जुना, पण ह्या ओक्लाहोमा चा १०० वर्ष इतकाच , इथे इंडियन्स लोक होती, म्हणजे आपण नाही इथले नेटिव्ह , मेक्सिकन .. हापशी , त्यांना ह्या इंग्रजानी मारून मुटकून सरळ केलं. मी त्यात फार खोलात जात नाही, पण सगळं एका सरकार खाली . मला खूप नवल वाटत ह्या गोष्टीच, कि इतका मोठा इतका मोठा ... म्हणजे लहान मुलांना विचारलं कि किती मोठा हवाय खाऊ ? कि इवले इवले हात असे फुलवून इतका शगला मोत्ता असं करतात ना? तस  ........ तर आपला मोत्ता हा एवढाच.  ह्यांचा म्हणजे इतका मोठा कि जमिनीचा समुद्र वाटतो,  संपतच नाही न संपणारा  ..... म्हणजे मी आता दोनचार राज्य फिरलो एकातून दुसरी कडे जायला दोन तीन तास लागतात किमान आणि तरी मी अर्ध्या वर पण नाही गेलोय अमेरिकेच्या .... आणि सगळी सपाट जमीन , डोंगर दर्या नाहीच.... म्हणजे अमेरिकेत आहेत, पण मी जेवढं पाहिलं तिथे नाहीच , भारता एवढा अमेरिका मी पाहिलाय म्हणजे, क्षेत्र फळ ... एरिया केवढा असेल आपला? तेव्हढा . तरीही अजून १/३ पण नाही झाला फिरून  .... इतका मोठा देश आहे . म्हणून कौतुक कि ही लोक एकत्र अमेरिकन म्हणून राहतात, आपल्या कडे सगळ्यांना वेगळं राज्य तर सोडाच देशच वेगळा हवाय असं वाटत.

पण सांगायचा मुद्दा असा कि २०० वर्षान पूर्वी हे सगळं कस जमलं असेल? ज्या ठिकाणी जायला विमान ६ तास घेत, ते सगळं एका झेंड्या खाली एका नियमा खाली कस काय धरून ठेवल असेल? हे नवल आहे, वेळ काढून ह्यांचा इतिहास नीट आइकेन कुणाला तरी पकडून, वाचण्यात येईल ते येईल, पण ऐकणाची मजा वेगळी असते. ह्यांना खूप अभिमान आहे देशाचा , पण आपल्या सारखं लोकांना पटवून पण देत नाहीत  कि बघा मला किती आहे देशाचं आणि दुस्वास पण नाही करत आपल्या सारखा .... काही महान लोक सैनिकांना काय मान देता, त्यांना पैसा मिळतो त्या करता करतात असे म्हणणार महाबाग इथे नाही हे ह्यांच नशीब किव्हा शिकवण असेल


आपल्याला (म्हणजे मला )फक्त न्यू यॉर्क किव्हा हॉलीवूड माहित असत, नाही म्हणायला वेगास कारण तिथे कॅसिनो आहेत , पण टेक्सास हे सगळ्यात मोठं राज्य आहे ...(होत, आता अलास्का आहे).  जवळ पास २ लाख ७० हजार मैल इतका एरिया आहे, ते पण एका राज्याचा आणि असे ५२ राज्य आहेत ... आता बोला ...काय बोलणार? बोलतीच बंद केली मी . फक्त कल्पना करा एकाच राज्यात विमान दोन तास घेईल इथून तिथे जायला आणि आपण दिल्लीत जातो , ते पण ३ राज्य ओलांडून.  तरी भारत सहावा जगात मोठा देश आहे .... म्ह्णून अबब होईला होत इथे .

माझ्या मते ह्यांना भाषा आणि धर्म जोडतो , जोडून ठेवतो , सगळे इंग्रजी बोलतात (कसले बोलतात यार काहीच काळात नाही ) म्हणजे सगळेच इंग्रजीच बोलतात , आपल्याकडे शेजारचा माणूस हिंदी बोलतो (आपण मराठी) कशी राहणार एकी, सगळेच ख्रिसचन .... म्हणजे आत मध्ये बॅप्टिस्ट , कॅथलिक , प्रोटेस्टंट ह्याव आणि त्याव असतीलच, पण वरून शेम आणि कायदे पण शेम , खाण एक पिणं एक , म्हणजे अनेक आहेत , (अरे कसले अनेक त्या दिवशी आपल्या बिग बाजार एवढं मोठं दारूचं दुकान पाहिलं अबबब ...)पण पितात,  वर्ज नाही खर तर वर्ज काहीच नाही , पण मान समान आहे, आपली माणसं देव देव केलं तरी मूर्ख म्हणतात नाही केलं कि पागल आणि दोघंही एक मेकांच्या उरावर ... ते स्वातंत्र्य इथे आहे, म्हणून इतका मोठा देश, तसा पहिला तर सुखी आहे, म्हणजे दुःख असतीलच, पण स्कॉच पिऊन मग  मोठ्या गाडीतून (गाडया पण मोठ्या अबबब )आणि मोठ्या घरात जाऊन दुखी होणं केव्हाही चांगलं.


दुसरं कारण म्हणजे (तिसरं खर तर), इथली थंडी, गुरगुट करून लोक आपापल्या घरी बसतात , -१ डिग्री मध्ये तुम्ही काय टवाळक्या करणार? किती वेळ करणार? या मुळे नुसते उपद्व्याप, भांडण बंद ... चुपचाप घरमे बैठो नाहीतर गाडीमे , कशाला मारायला भांडं भांडी होतेय? नाही पटल जा दुसरी कडे, खूप जागा खूप जमीन .
 पुढच्या वेळेस संत्रा एवढ लिंबू आणि क्रिकेट बॉल इतका मोठा कांदा ह्या बद्दल लिहेन .... 

Monday, December 17, 2018

अमेरिका ७ अमेरिकन सिनेमा .....

अमेरिका ७

अमेरिकन सिनेमा ..... 

इथे हल्ली खूप थंडी आहे आणि यूरोप सारखं इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये  , उबर करून फिरावं लागत आणि ते फार महाग पडत, म्हणजे वॉलमार्ट मधून ८ डॉलर च सामान आणि १८ डॉलर च उबर ... उबर कसलं अमेरिकन कुबेर आहे, म्हणून आपण त्याला भारतात उबेर म्हणतो ते अगदी बरोबर आहे. काल साधं ६ डॉलरच जेवण मागवलं तर डिलेव्हरी ८ डॉलर आणि त्यात वर हक्काची  २ डॉलर टीप, (विचारू नका, सांगेन नंतर हक्काची का म्हंटल ते)पण करणार काय? गाडी शिवाय अन्नान होतो आपण,  तरी आता उबेर ने कृपा केली म्हणायची. 

पण सांगायचा मुद्दा असा कि मला हाऊस अरेस्ट केलय, काम किती करणार ... म्हणून सहज टीव्ही वर एक पिक्चर लागला तो पाहत होतो, तर काय सांगू? इतका अप्रतिम पिक्चर , एक तर ह्यांचे पिक्चर तसे बरे असतात तरी सुद्धा आपल्याकडे न आलेले कित्ती असतील. म्हणजे इथे फक्त करण जोहर चे आणि शाहरुख चे पिक्चर पाहिलेला एखादा जर आपल्याकडे येऊन , श्वास म्हणा , किल्ला म्हणा किव्हा हल्ली आलेला अंधाधुंनद म्हणा असे पिक्चर पाहून गेला तर काय म्हणेल? तस झालं मला . आपल्याकडे फार कमी येतात पिक्चर ह्यांचे, फक्त मोठ्या प्रोडक्शन हाऊसेस चे, छोटे किती असतील?

एकात तर ती अंजेलिना अगदी आहे तशी (कुरूप, अस म्हणायचं होत, पण ते माझ मतआहे तशी )दिसत होती, ब्लॅक अँड व्हाईट टाईप, १९३० सालची गोष्ट , हिरो नाही.   पण अप्रतिम .... तिने खरंच अभिनय खूप छान केलाय, म्हणेज जवळ पास दहा मिंट लागली मला ओळखायला कि हीच ती म्ह्णून . असे अनेक पहिले मी, रोज एक असेल,  शनिवार रविवार २ . एक तर हिरो वगैरे कन्सेप्ट नाहीये इथे, हल्ली मराठी मध्ये आणि थोड्या प्रमाणात हिंदीतपण दिसत आपल्याला , पण बहुतेक तसेच सगळे आणि जवळ पास ८०% पिक्चर मध्ये गाणी आणि संगीत, म्हणजे आपल्या सारखी नाही, पण गाणी आणि संगीत सुसंगत पिक्चर ला धरून उगाच पेरलेली नाही, सुरेख गद्य आणि पद्य यांची गुंफण , मी पण एकदा नाचलो त्या कलाकारानं बरोबर, म्हणजे दोन माणसं बोलत असतात आणि अचानक दोघे गाण्यात बोलतात आणि पाठचा एक माणूस त्यांच्यात मिसळून नाचतो,  म्हणून मी पण उठून त्यांना साथ दिली... इतकं नकळत त्यांनी मला त्या प्रसंगात ओढला ...  एक तर फ्रेंच होता ... लहान मुलगी आणि तिची मौशी ,दीड एक तासाचा, खूप छान गोष्ट आटोपशीर, एक  त्या टेक्सस मधला,  घोडे , मोठं शेत, बंदुका, हिरोईन पण नाही .... खूप छान गोष्ट आणि एक तर खूप व्हॉयलेन्ट , तरीही खिळवून ठेवणारा मग कळलं तो टारंटिनो चा होता , पण काय पिक्चर होते ...वाह 

मला असाही खूप छंद आहे चित्रपट, नाटक आणि संगीत आणि करमणूक ह्या सगळ्या गोष्टीं मध्ये .  ह्या गोष्टींची  एकूण मला ती प्रोसेस खूप आवडते आणि ह्या लोकांना कडे तंत्राद्यान म्हणा का मांडणी का कल्पना, संकल्पना एवढी प्रगल्भ आहे कि अबब होत. मी नेहमी शिकायला काय येतो आणि काय शिकून जातो?  चित्रपटानं बद्दल माझं ज्ञान थोडं वाढलय , म्हणजे बघण्याचं .... मी खरा असा फार टीव्ही वाला नाहीये, क्रिकेट असेल किव्हा असच असेल बर काही तरच , पण  जीव टाकून सिरीयल पाहणारा मी काय नाहीये, पण इथे असे पर्यंत, ५० एक  पिक्चर नक्की बघेन (घरात,  टीव्ही वर, नाहीतर तिकीट ५ आणि उबेर १५ होईल). 

यूरोपात (इंग्लंड सोडून )आणि इथे टीव्ही वर एक मोठा , म्हणजे फार मोठा फरक दिसला तो म्हणजे , ऍडल्ट सिनेमे किव्हा असं अंग लगट वाल फार नसत , तिथे यरोपात ११ नंतर एकदम खुले आम ..... माझं मत फार वेगळं होत ह्यांच्या बद्दल. बदलतंय थोडं ... एक गंमत म्हणजे, इथे फक्त टीव्हीत सुंदर बायका दिसतात प्रत्येक्षात नाही दिसल्या अजून.  एक तर सगळ्या ह्या आडदांड, सुबक नाहीच, नाकीडोळी पण नीटस नाहीत. (फ्रेंच पोरी फार छान दिसतात , युरोपला ते एक् नेत्र सुख फार आहे ) आपल्या इथे रस्त्यात सुद्धा एखादी टवटवीत सुंदर किव्हा नाजूक सुबक देखणी दिसते तश्या इथे नाहीच, त्या मनाने दिसायला पुरुष बरेच उजवे वाटले, सगळ्या बाईका म्हाताऱ्या टाईप्स वाटतात आणि चेहऱ्या वर सुरकुत्या, त्या थंडी मुळे पण असतील म्हणा. 

असो पण मुद्दा असा कि सिनेमा शिकायचा असेल तर इथे येऊनशिकायला हवं, खूप बदलेल दृष्टिकोण . त्या सैराट साठी गोगावले बंधू इथे येऊन का रेकॉर्ड करून गेले ते उमगलं .... 

मी वरती एकही पिक्चर च नाव दिल नाही, जमलं तर एखाद परीक्षण ... नको जड आहे शब्द... त्या पेक्षा माझ्या डोळ्यातून दिसलेला सिनेमा लिहीन... पण स्वप्न अशी बघायला हवी .... स्वप्न रंजन ह्यांच्या कडून शिकायला हवं .

Sunday, December 2, 2018

अमेरिका ६

एक पटकन सांगावस वाटलं , आमच्या ऑफिस मध्ये गेल्या सोमवारी बॉस च्या सांगण्यावरून एका सिनियर मुलाने त्या नवीन जोइनीस पैकी एका ला सांगितलं कि त्याला कस्टमर कडे जाव लागेल लगेच तो नाही म्हणाला , लगेचच नाही , दुसरा पण नाही म्हणाला. हा आपला भारतीय मुलगा एकदम आश्चर्यचकित झाला. एक तर सरळ बॉस ला नाही आणि कारण काय एका कडे कुत्रा आहे एका कडे मांजर. 

काही तरी सांगताना श्री म्हणाला कि त्याच कुत्र्याचं कारण खरंय कारण तो मारायला आलाय. दोन दिवसाने मी सहज त्या मुलाला म्हंटल कि कसा आहे तुझा डॉग , फोटो दाखवू? मी नाही म्हणलं कारण श्रीरंग ने आधीच सांगितलं होत कि दयनीय अवस्था आहे म्हणून. फार दिवस नाहीत म्हणाला , त्याने पण adopt केला होता , कुठे तरी वादळात तो अडकला होता, दहा बारा वर्षान पूर्वी, अमेरिकेत वादळ आलं होत त्यात तो वाचला पण खूप घाबरला होता . पण खूप गुणी प्राणी होता , त्या मुलाच्या आईला अल्झायमर झालं आहे, तर तिच्या करता सोबत म्हणून तो खूप छान होता, एकदा आईला दाखवून आणेन , तिला special care मध्ये ठेवलय , then will put the dog to sleep. खूप शांत पणे सगळं सांगत होतो , मी खूप भावना विवश होतो, म्हणजे आपण भारतीयच असे असतो. तो म्हणाला मी जर कस्टमर कडे गेलो चार दिवस आणि ह्याच काई झालं म्हणजे? इतके वर्ष माझ्या सोबत होता त्याच्या शेवटच्या वेळी मी त्याच्या जवळ नको राहायला? 

ही लोक म्हणे म्हाताऱ्या आई बापाला ओल्ड एज होम मध्ये ठेवतात आणि कुत्रे घरी, अस कुणी तरी एकदा म्हणलं होत, पण आईला ओल्ड एज मध्ये का ठेवलंय आणि कुत्र्यावर किती जीव आहे ते सत्य किती वेगळं होत.