Saturday, December 22, 2018

अमेरिका १०

अमेरिका १०

दिसला रे बाबा डोंगर एकदाचा, मी ओक्लहोमा हुन LA ला येत होतो, म्हणजे लॉस अँजेल्स, काय नशीब आहे बघा, केदार राहतो इस्ट कोस्ट  आणि स्वाती वेस्ट, (जावं लेको मजा करा, मटार उसळ खा शिकरण खा).  आता पर्यंत मी अर्धाच भाग पहिला होता अमेरिकेचा. आता एक रेष पूर्ण करून पलीकडे आलो, म्हणजे एका रेषेत आलो पुढे, अजून खाली वर, आजू बाजू , अशी बरीच आहे, म्हणजे कलकत्ता केलं थोडं मध्य प्रदेश आणि आता मुंबई .... आणि हा देश आपल्या पेक्षा दहा पट मोठा आहे.

तर आज LA जवळ आलं तेव्हा थोडं उजाडलं होत, सकाळी ६ ची फ्लाईट होती, इथे आली सौवा नऊला पण वाजले होते सौवा सात . म्हणजे प्रवास केला ३ तास, पण मी गेलो दीड तासात , कारण २ तास घड्याळ पाठी जातं. आणि इथे येता येता थोडी सकाळ होत होती आणि एकदम चार आठ डोंगर दिसले, एकदम हायस झालं आणि दोन एक दिवसात समुद्र पण दिसेल कि एकदम बर वाटेल. छान होते डोगर बोडके होते, खूप भले मोठे न्हवते पण होते कॅरी ते ओक्लोहोमा आणि कॅन्सस सगळं सरळ प्रदेश डोंगर नाहीत , इथे आहेत. मस्त वाटलं थोडं ऊन . पण अजून माझ्या डोळ्यात त्या आल्प्स च्या वरती दिसलेला बर्फ आणि मधेच डोकावणारा सूर्य , टूमदार घर , मस्त ढग ... पण दिसला डोंगर ते बर झालं . 

इथे विमानात काही देत नाहीत खायला ,फक्त  जूस आणि चहा आणि दारू , लांबची फ्लाईट होती म्हणून आधी मी जूस घेतला आणि उतरायच्या आधी चहा (तास भर झोप झाली होती), पण खूप लोकांनी दारू घेतली शेजारी मध्यम वयाच्या जोडप्याने दोनदा स्क्रू ड्राइव्हर आणि पाठच्या माणसाने जॅक डॅनिएल्स घेतली. संजय मला एकदा म्हणाला होता, कि तो गोव्याला एका ठिकाणी राहिला होता तिथे सगळे PHD होते, म्हणजे सकाळी चहा आणि व्हिस्की एकदम, आम्ही दुपारी बिअर वाले, इतक्या पहाटे दारू? असहि विमानात मी अजिबात दारू पीत नाही, फार तर भारतात उतरायच्या आधी एखादी बिअर. त्या दिवशी तर बर्फ पडला रविवारी म्हणून माझी फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून मी थंडीत एक पेग मारला जेवताना आणि गुडूप झोपलो तर मला इतकं गिल्ट आलं दुपारी प्यायलो म्हणून ... आणि इथे सटासट सकाळी दारू काम सुरु होत, गोव्याला सुट्टीला गेल्यावर सकाळी दारू पिणं वेगळं आणि प्रवासात जाताना वेगळं नाही का? म्हणजे माझ्या करता ... 

हा एअरपोर्ट तसा बराच मोठा आहे, म्हणजे मोठ्याहून मोठा, आठ टर्मिनल्स ... पण सुबक नाही वाटला (इथे सुबकतेचा अभाव आहे, प्रचंड मोठे भारदस्त आहे, सुबक दिसलं नाही मला अजून), आपला छान आहे , म्युनिक झुरिक पण मस्त आहेत, मोठे झाले कि कुरूप होतात का ? कुणास ठाऊक? पण झुरिक पण मोठा आहे तसा .. असो आता दोन दिवस इथे फिरतो आणि सांगतो काय गंमत आहे इथे 


No comments: