Sunday, January 22, 2023

स्पिती - हिमाचल 6

 स्पिती - हिमाचल  ६

चंद्रताल चा जायचा रस्ता अति भयानक, म्हणजे खूप खराब आहे, नाहीच म्हणा ना. खूप खडतर  जागा पण डोंगराळ, वेडा वाकडा रस्ता .... एक एक करत पांडव खाली पडले ते नवल नाही. आता तरी रस्ता आहे इतक्या हजारो वर्षां पूर्वी तर काहीच नसेल आणि तो डोंगर, आपण कधी काळी काही वाचलं असतं आणि असं अचानक हे असं समोर आलं ना कि वाटतं हा यार हे तर खरं निघालं.  

चंद्रताल म्हणजे जिथून पांडव स्वर्गात चालत गेले, (म्हणजे एकटा धर्मराजच शेवटी उरला)ते ठिकाण   ... साधारण ३ एक महिनेच फक्त  इथे वावर असतो बाकी बर्फ,  रस्ता बंद. म्हणून असेल म्हणा, पण  रस्ता करतच नाहीत हि लोक. एका तास भर अंतरा करता दोन चार तास जातात , आणि वाहन बंद पडलं काही टायर पंक्चर झाला तर संपलच हो सगळं. पण वरती त्या लेक जवळ, तिथे टेन्ट्स टाकतात लोकं आणि भाड्याने देतात खाणं वगैरे सगळंच. अश्याच एका तंबूत आम्ही आमच्या ब्यागा टाकल्या आणि गाडीत बसून दहा मिंट वर गेलो आणि परत गाडी लाऊन १५ मिनिट तंगड तोड करून चंद्रताल ला पोचलो. चंद्रताल एकक तलाव आहे (lake).  खूप सुंदर अति सुंदर दृश्य चहू बाजूला डोंगर मध्ये निळा शार तो तलाव. त्याचा आकार चंद्रा सारखा आहे म्हणून नाव चंद्रताल असं म्हणतात खरं खोटं माहित नाही , पण रात्री चंद्राचं प्रतिबिं छान दिसतं (असेल पण मी गारठून माझ्या टेन्ट मध्ये ३ स्वेटर tshirt thermal आणि दोन blanket घेऊन कुडकुडत होतो). आम्ही नाही पाहिलं . इथून खरं तर आकाश पण सुंदर दिसतं. खरं सांगू का , मी समुद्र सपाटी वरचा माणूस आहे, मुंबईत जन्म आणि सगळं इथेच आयुष्य गेलं.  बर्फ ग्लासात आणि थंडी फ्रीझर मध्येच.  असं आता अचानक तुम्ही मला धीट हो म्हंटल आणि जा बिन्धास म्हंटल तर कसं चालेल? (९:१८ ला window पकडायचो लेको, गाडीत शिरून दाखवा मग बोला थंडी बद्दल, ज्यादा बोलियाचं काम न्हाय काय समाजलाव ). 

आम्ही त्या तलावा जवळ ...जवळ जवळ तास दीड तास घालवला, खूप शांत होतं  आणि न मला व्यसन आहे पाण्याचं, इतकं सुंदर स्वछ पाणी कुठे दिसतं हल्ली? खप वेळ शान्त पणे बसलो, तिथे खरं तर लोक प्रदक्षिणा घालतात, मला एकट्याला जायला थोडं रिस्की वाटलं, (गर्दीची भीती नाही वाटत एकांताची वाटते) म्हणून फक्त एक ५०० मीटर जाऊन शांत पणे बसून राहिलो, इथे oxygen पण कमी होतं , मधेच काही धाप वगैरे लागलिओ तर ? म्हणून टाळलं, खरं तरच सहज शक्य झालं असतं ४ एक की.मी. आहे. सुकून म्हणतात ना? तो मात्र मिळाला, थोड्या वेळाने  मग पर्यटक आले, खूप गोंगाट झाला.  तिथे नको होता गोंगाट असं वाटलं, आम्ही परत त्या तंबूत आलो, चहा बिस्कीट खाल्लं. रात्री झोप काही नाही आली. जरा कुशी वर वळलो तर गादी गार गुट्ट , दचकून जाग कशी बशी रात्र गेली. सकाळ अतिशय सुंदर निघाली. बाकी काही का असेना इथे सकाळ खूप सुंदर असते, हिमालय खूप मोहक आहे, एकदा सवय झाली ना इथली तर खूप आवडेल मला. हलका सूर्य दिसतो थोडे पांढरे डोंगर एका मागे एक असे अनेक डोंगर , आपण कसं हिरव्या झाडांचे अनेक हिरवे रंग बघतो तसं आहे ह्या डोंगराचं ... हरवून जातो आपण , पण ऊन हवं सकाळ हवी. 

इथे ना पंजाब दिल्ली वगैरे लोक खूप येतात त्या मुळे खूप ठिकाणी आम्हाला छोले पनीर मिळालं, पण इथे रात्रीचा बेत सुंदर होता, साधी मुगाची डाळ, दुधी ची भाजी आणि लाल भोपळ्याचा हलवा..पोळी भात होतच. त्याला म्हंटल अरे नवल आहे पहिल्यांदा छोले नसलेलं दिसलं मला. त्याच उत्तर फार छान होत, तो म्हणाला कि पाहाडो मे कहासे छोले आयेगा? इतक्या उंचीवर चांगलं नाही , जो जल्दी पकता है वोही जल्दी पचता है म्हणून साधं जेवण ... हि अक्कल बाकीच्यांना कधी येईल कुणास ठाऊक . सकाळी पण पोहे होते उकडलेलं अंड ... साधं होतं . 

आम्ही सकाळचं  खाऊन मनाली करता निघालो,  अंतर फार नाही तरी पाच एक तास खडतर प्रवास.. बाकी मनाली काय टुरिस्ट आहे सगळं,  गर्दी वैगेरे कमी.  विशेष म्हणजे इथे घटोतकोचा चं हिडिंबेचं देऊळ आहे, इथे राहायला तेव्हा अशीच लोकं लागत असणार तेव्हा. सगळं महाभारत इथेच घडलं म्हंटल्यावर काय हो. आम्ही हॉटेलात राहिलो थोडं फिरलो आणि मग चंदीगड आणि मुंबई .... 

आम्हाला इथे हॉटेलात जेवताना एक डोक्याला पट्टी असलेला साधा सुधा मुलगा शेजारच्या टेबल वर येऊन बसला , veg मे क्या है म्हंटला एकदम टिपिकल शहरातला गुजराती मुलगा. इथे कामाला आला असेल नोकरीला, पडला असेल आता  घाबरला असेल म्हणून सारखे फोन हॉस्पिटल air lines घरी असं  मला  वाटलं . 

माझ्या बॉस नि विचारलं काय लागलं? कुठचा तूच? तर पुढलं ऐकून आपण किती चुकीचे निष्कर्ष काढतो हे जाणवलं. तो गुगल मध्ये नोकरी करणारा तिशीतला amhmedabad चा मुलगा , स्पिती लोकल transport नि फिरत होता. (सगळं जे आम्ही आरामात इनोव्हा नि केलं ते) म्हणजे तो सगळीकडे लोकल transport नीच फिरतो म्हणाला, जिथे जिथे फिरला आहे ते सगळं . छन्द लग्न करण्यात रस नाहीये, घरून प्रेशर आहेच, पण छन्द. भारत भ्रमण .लोकल ट्रान्सपोर्ट, कारण लोकांशी बोलता येतं. तर हि जखम झाली मूद ला (आधी लिहिलं बघा, दिवसात एकच बस वगैरे ) , एका कुत्र्यानी उडी मारली ह्याच्यावर. हा पाइ कुठे जात होता तेव्हा, कुत्रा नाही चावला पण डोकं आपटलं --- टाके --- खूप रक्त , पण मूद ला एक बस २४ तासाने येते, डॉक्टर कुठें असणारे? मग लोंकांनी खूप मदत केली (हेच त्याला सिद्ध करायचं असेल , लोकं कशी मदत करतात) औषध लावलं पट्टी बांधली आणि एक टुरिस्ट जीप ने मनाली पर्यंत सोडलं . मग हॉस्पिटल MRI टाके सगळं ... केवढी धिटाई ... म्हणजे मला शेम्बळत वाटणारा कुणी जिगर भलताच जिगर बाज निघाला हो , आम्ही नुसतेच बोलण्यात शूर थंडीला घाबरणारे ... हि अशी तरुण मुलं भेटली ना कि मला खूप हुरूप येतो आशा वाढतात, देश पुढे चाललाय तरुण पिढी खूप धीट आणि जिगर बाज आहे हि खात्री होते ... खारीचा वाट म्हणून  माझ्या बॉस नीच त्याचं बिल भरलं आणि त्याला खूप आशीर्वाद कम गुड लक दिलेत .... 

आम्ही सुखरूप चंदिगढ आणि मग मुंबई ला आलो... 











Sunday, January 15, 2023

स्पिती - हिमाचल 5

 स्पिती - हिमाचल  ५

आमचा पुढचा टप्पा धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) , धनकर ला इथल्या (एकेकाळच्या)राजाचा महाल आहे एकदम डोंगरात दुर्गम भागात , म्हणजे इतक्या वर्षा पूर्वी माणसं इथे का आली असतील? आणि इथे का राहिली असतील हा मोठा प्रश्न आहे, इथे फार युद्ध वगैरे झाले असतील असं वाटत नाही (असली तरी कुणी इतिहासात ते मांडलं नाहीये ), इतक्या लांब येई पर्यंतच शत्रू दमून जाईल. पण एक नवल म्हणजे इतक्या उंचीवर कसं काय बांधलं असेल हे बघूनच जाणे. धनकर तलाव चा छोटा ट्रेक आहे इथे आणि ह्या ठिकाणी पण शाळा आहे ते मला फार आवडतं. मला शाळा दिसली कि आनंद होतो फार, अज्ञान दूर करण्या साठी दुसरी जागा नाही (whatsapp सोडून म्हणा ).   इथे TV आला आहे इंटरनेट आहे म्हणजे जे आपल्याला दिसतं ते ही लोकं सुद्धा बघतात. बदल होतोय हळू हळू ... हे सांगायला नको कि इथे पण monastery आहे. एक मला प्रश्न पडला इथे , हि लोकं आपल्या (बेकार) serials शी कसं relate करत असतील गाड्या , बंगला , दाग दागिने , झालंच तर छळ कपट भडक मेक अप , एवढी लोकं समुद्र वगैरे , उंच बिल्डिंगा ...  

धनकर जमिनी सपाटी पासून साधारण १२००० फूट वगैरे असेल आणि तिथे थोडं अजून वरती पाण्याने भरलेला तलाव आहे (कसं काय म्हणजे काय आहे हे, इथे वरती कोण भरतय पाणी ?? ).   आम्ही काही तो ट्रेक नाही केला पण खूप लोकं वर जाऊन येतात. इथे oxygen असं पण कमी आहे आणि वेळ तापता सूर्य (जितकं वर चढतो तितकं आपण सूर्या जवळ जाणार ना आपण). आम्ही सरळ गाडीत बसलो आणि पूढे पिन व्हिलेज मार्गे मूद गावा पर्यंत गेलो. 

मूद नावाचं गाव अतिशय दुर्गम आहे. इथे दिवसातून फक्त एकच बस येते (थंडीत तीही नाही ) संध्याकाळी ६च्या सुमारास आणि सकाळी सात ला निघते , एक बस सुटली कि थेट २४ तास थांबा ओला उबर सोडाच दुसरं कोणतंच वहान नाही, म्हणजे टुरिस्ट आहेतच पण बाकी काही नाही. इथून ना दोन मोठे ट्रेक्स आहेत पिन पार्बती आणि पिन बाबा पास , साधारण ८ ते १० दिवसांचा थोडा खडतर ट्रेक आहे ... म्हणजे माझ्या करता अशक्य ... दहा दिवस बर्फात आणि १५००० फुटांच्या वर (अंघोळ नाही काही नाही, परत whole वावर इस आवर म्हणजे जडच) काय काय कष्ट सहन करावे लागतील कुणास ठाऊक. मला जड आहे पण तुम्हाला हवं तर नक्की करा सगळा हिमालय तो. मी (लांबून का असेना) हिमालयाच्या प्रेमात आहे , अजस्त्र अति विशाल खूप गूढ कधी मोहक सुंदर कधी भीतीदायक ... आजवर इतक्या लोकांनी आपला जीव त्या हिमालयाच्या पायथ्याशी का गमावला हे सांगणं फार कठीण नाही. 

मूद मध्ये आम्हाला खूप फिरंगी दिसले, म्हणजे फिरंगीच दिसले ती लोक महिनोन महिने तिथे आहेत राहतात कारण तेव्हा नाही कळलं कारण असं गाव तर शंभर मीटर मध्ये संपतं (शाळा आहे बरं का ) मग का हि लोक इथे आहेत , रात्री लाईट पण गेली सकाळी पाणी पण थंड अंघोळ काय करणार (तिथे एक हनिमून कपल आलं होत, दया आली मला ... ). हि लोक इथे का ? इथे तर अफू गांजा पण नाही ... मग जेव्हा मुबंईत परत आलो तेव्हा शोधलं आणि कळलं कि इथे १८६० च्या आसपास एक शोध लागला, हिमालयाच्या दगडाचा rock formation. हि जागा geologists ना फार प्रिय आहे. काय काय सनशोधन करतात.    

आम्हाला इथे एक इटालियन माणूस भेटला तो कुठून तरी ट्रेक करून आला होता चार - सहा महिने इथेच असतो , भारत फार आवडतो म्हणाला , ज्या जागेवर आम्ही होतो तिथे नेटवर्क पण न्हवतं, मॅप्स काय चालणार? छापील घेऊन फिरतो म्हणाला, बत्तात्रेय केव्हाच गेली होती. एक दिवस गुहेत राहिला, आता इथून पण कुठे तरी जाणार म्हणाला. किती धीट असेल, काय कोरडं अन्न घेऊन फिरतोय तेच बाकी भाषा पण धड येत नाही आपली नवल आहे ह्या लोकांचं , उगाच जग भर राज्य नाही केलं ह्या युरोपियन नि.  

सकाळी थोडा नाश्ता करून आम्ही निघालो आणि  काझा ला साधारण ११ पर्यंत पोचलो . आमच्या हॉटेलच्या समोर ITBP चं स्थळ होतं त्यात बायका सुद्धा होत्या. ITBP म्हणजे Indo-Tibetian Border Police , खूप जोखमीच काम असणारे एक तर कायम थंडी किव्हा अति थंडी त्यात त्या चिनी लोकांशी सारखा सामना . आपल्याला इथे मुंबईत फक्त खड्डे किव्हा घाण किव्हा ट्रॅफिक फार तर थोडं राजकारण हेच विषय त्रास दायक ठरतात (पाऊस आपलाच आहे म्हणून त्याचा उल्लेख टाळला). पण ह्या लोकांचे challenges वेगळ्याच आहेत, हिमालया सारख्या मोठ्या पण त्यांना त्याचं काहीच नाहीये. 

काझाला तर फार म्हणजे फार उन्ह,  गरगर लच  , तो स्वेटर पण मी कम्बरेला बांधला (मग तो कुठे हरवला मग नन्तर परत जाऊन सापडला, मला ओळखणाऱ्या लोकांना ह्यात नवल वाटलं नसेल) आणि त्या मार्केट ला फिरलो.एक सांगायचं म्हणजे  काल्पा नन्तर थेट इथेच पेट्रोल पम्प लागतं अधे मध्ये नाहीच कुठे (वाहन मात्र खूप दिसली). तुम्हाला म्हंटलो ना सगळंच अजिब आहे. आम्ही तिथे हाटेलात थुपका खाल्लं मस्त, लोकल डिश. गम्मत म्हणजे मेनू मध्ये थालीपीठ पण होतं , हि लोकं खरी चांगली, आपल्या हाटेलात छोले पनीर चायनीज मिळतं पण थालीपीठ खायला पायपीट करावी लागते, इथे समोर थालीपीठ. आम्ही नाही खाल्लं म्हणा पण सांगतो आपलं. त्या मार्केट मध्ये मी दोन चार गोष्टी घेतल्या, लोकल माणसाला मदत (तो नेपाळी निघाला ) म्हणून. संध्याकाळी आम्ही ते जगातलं सगळ्यात उंचिवाल पोस्ट ऑफिस पाहिलं सगळ्यात उंच गाव उंच कार जाऊ शकते तो रस्ता   वगैरे वगैरे सगळं पाहिलं मग परत बुद्धा ची मूर्ती वगैरे वगैरे सगळं .  

काझाला मात्र मी फार दमलो रात्री नाक बंद झालं झोप नाही मला घराचे वेध लागले खरं तर , खरं तर हॉटेल छान होतं थंडी न्हवती जेवण उत्तम. सकाळ पाहतोय कि नाही असं झालं (पहिली एकदाची). उन्ह बाधलं मला फार , दुपारी तास भर पायपीट केली आणि नन्तर फिरलो पण .. डाइरेक्ट सूर्य प्रकाशाची सवय नाही मध्ये pollution नाही काही नाही निरभ्र आकाश ... पण झालो बाबा नीट . 

परत ते मोनास्टरी पाहून आम्ही चंद्रताल लेक ला गेलो .. चंद्रताल म्हणजे जिथून पांडव (धर्म राजच खरं तर ) डायरेक्ट स्वर्गात गेले ती जागा... 








Sunday, January 1, 2023

स्पिती - हिमाचल 4 - वाळवंट - Himalayan Desert

स्पिती - हिमाचल  ४ वाळवंट  Himalayan Desert 

आम्ही काल्पा सोडलं आणि स्पिती मध्ये शिरलो, आणि सगळं दृश्य बदललं , म्हणजे आधी सगळं छान होत, डोंगर डोंगर,  माथ्यावर छोटास बर्फ आणि  काल्पा सोडल्यावर एकदम रूक्ष डोंगर  सगळं वाळवंट , हा भाग सगळा वाळवंट , मला हि आश्चर्य वाटलं. म्हणजे डोंगराच्या एका बाजूला सफरचंदाने लडबडले वृक्ष एकीकडे एकदम वाळवंट? सारंच अजब आहे. हे सगळे डोंगर वेगवेगळे आहेत  रूप वेगळं, पण सारेच उंच  उंच अति उंच तेच एक काय ते कॉमन आहे. एखाद दिवस बरं वाटतं पण नंतर सगळं उदास भकास. हे सगळं थंडीत फार छान दिसतात म्हणतात कारण सगळं पांढरं शुभ्र दिसतं. पण त्या वाळवंटात सुद्धा मी एक सुंदर तलाव पहिला. नाको नावाचं गाव होत आणि तिथे एक सुंदर तलाव आणि बाजूला हिरवी झाडं होती . एक लोकल बुद्धिस्ट मंदिर होतं , थोडं चढायचं होतं तिकडे , वर कुणीही नाही .. म्हणजे इतक्या दुर्गम स्थानी कोण असणारे म्हणा, पण निरव शांतता, वारा होता फक्त, छान वाटलं. खाली येऊन आम्ही तलाव पहिला काय सुंदर तलाव स्वछ पाणी छान झाडी होती .. इतक्या वर तलाव  मस्त मस्त . शेजारी एका हॉटेलात जेवलो. एक माणूस आणि त्याचा परिवार होता बायको मुलं वैगेरे , एकदम हसरा छान जेवलो शाकाहारी होत, कढी बटाट्याची भाजी डाळ रोटी भात ... 

मला एक प्रश्न सारखा सतावतोय ... हि लोक आहेत तरी कोण? राहतात तरी कशी? सात आठ महिने बर्फ एरवी वाळवंट तरी आनंदी हसरी ह्या लोकांचं मिळकतीचं साधन तरी काय?  मिळकत नाही तरी हसरी माणसं का खूप काही मिळत नाही म्हणून जे मिळतंय त्यातच आनंद मानून हसरी असतात? पदोपदी हिमालय आपल्याला शिकवत असतो न बोलता आपण ते अनुभव करून शिकत जायचं असतं ... 

आम्ही पून्हा गाडीत बसून निघालो, एकूण आठ दिवस आम्ही सकाळ निघायचो आणि रात्रौ येऊन झोपायचो , कलपा ला काय ते आम्ही छान निवांत राहिलो. वाटेत असेच खडतर रस्ते काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरु आहे रस्ता अजून बरा करायचं BRO प्रयत्न करतंय , अफाट आणि फार मुश्किल आहे काम. इथेही काम करणारे बहुदा बिहारी आहेत आणि त्यात बायका खूप आहेत, टुरिस्ट गाड्या गेल्या कि ती कामगार लोकं आपल्याकडे बघतात आणि एकमेकात काहीतरी गम्मत सांगितल्या सारखी करतात आणि हसतात. नवल आहे, कष्ट करून घाम गाळून आनंदी,  किव्हा  कष्ट करून घाम गाळतात म्हणून आनंदी असतील. 

आमचा पुढला प्रवास गुये नावाच्या गावाला होता, थोडा आडवाटेला आहे ते आणि वाटेत एक नदी लागते. तर  त्या गुये चं महत्व असय कि तिथे एक ममी आहे (सगळंच अजब मी म्हणालो तुम्हाला). सांघा तेन्झीन असं त्या बुद्धिस्ट मॉंक च नाव आहे आणि ती साधारण ५०० वर्ष किव्हा जास्त जुनी आहे.  तो ध्यानस्थ स्तिथीत बसला आहे. कुणी म्हणतं समाधी घेतली कुणी म्हणतं कि ध्यान धरलं असताना भूकंप झाला असेल किव्हा बर्फ पडला असेल आणि बर्फात राहिल्या मुळे दात केस आणि स्किन पण तशीच राहिली. ITBP म्हणजे इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस ह्यांनी १९७० च्या दशकात एका भूकंपा नन्तर सगळं ठीक ठाक करताना ,  ती दिसली मग त्यांनी ती एका मॉनेस्ट्री जवळ एका जागेत बसवली. गावकरांचं म्हणणं आहे कि ती ममी गावाला संकटातून वाचवते.  दात अजून शाबुत आहेत आणि नखं सुद्धा वाढतात असं लोक म्हणतात .  मग ती चीन ने तिथून नेण्याचा प्रयत्न केला वैगरे वगैरे गोष्टी आहेत . चीन म्हणजे तिबेट, अगदीच हाकेच्या अंतरावर आहे, तिथे नेटवर्क नाहीये फक्त लागला तर जिओ लागतो. पण एक फार आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेटवर्क नसताना माझा मोबाईल बेजिंग ची वेळ दाखवू लागला. आणि ज्यांचा आय फोन आहे त्यांच्या बरोबरच झालं , अँड्रॉइड ला काही प्रॉब्लेम नाही आला. हि लोक बंद असलेल्या मोबाईल ची वेळ बदलू शकतात तर चालू मोबाईल च काय आणि कंप्युटर चं काय करतील सांगता येत नाही?

तिथे ती मोनास्टरी चं काही नूतनी करण सुरु आहे , त्यात एक माणूस बुद्धाची मूर्ती रंगवतना गात होता , आवाज थोडा घुमत पण होता, पण इतका अप्रतिम गात होता कि मी त्याची रंग कला सोडून त्याची गायन कलेंनीच प्रभावित झालो, त्याच्या कडून गाणं गाऊन घेतलं रेकॉर्ड हि केलं, लाजला बिचारा पॅन्ट पण फाटकी होती पण चेहरा प्रसन्न आणि आवाज पहाडी  देव कुठे कुठे पेरून ठेवतो कुणास ठाऊक ? मी  माझ्या इन्स्टा वर टाकलं  पण माझे  जेमेतेम ८० फॉलोवर्स  कुणी परत शेर केलं तर त्या माणसाचं आयुष्य बनेल पण आपण हिमालयात थोडी राहतो लोकांचा विचार करायला ?  

गाव छोटं टुमदार ५० ते ६० वस्ती तरी तिथे पोस्ट ऑफिस आहे बस येते, टाबो नावाच्या एका मोठ्या गावा पासून ४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सिमला पासून ४०० किलोमीटर... एक लक्षात घ्या तिथे थंडीत तापमान -२० च्या खाली जातं दिवसा सुद्धा -४ असतं आणि जवळचं गाव जिथे १२० घरं ... काय करत असतील इमरजन्सीत? का त्यांना इमरजन्सी नसतेच? का आपण बाऊ करतो? सगळंच अजब सगळंच खूप साधं सरळ . असं म्हणतात कि The most simple questions are the most profound. तू कोण आहेस त्यातलाच एक सवाल, हि लोक आहेत तरी कोण? 

आम्ही तिथून निघालो आणि टाबो नावाच्या गावी आलो. मला फार आवडलं ते गाव, चहुबाजूनी डोंगर (उंचच उंच खूप उंच) आणि थोडीशीच घर पण जवळ जवळ,  डिश अँटेनाहोत्या घरावर (म्हणजे हि लोक पण त्या अति भयंकर सिरिअल्स बघत असणार, काय रे देवा ), आमचं हॉटेल पण छान होतं. मी वर गच्चीत गेलो म्हणजे एक मजली बिल्डिंग वर ओपन असं टेरेस टाईप. समोर एक डोंगर होता तो ह्या बुद्धिस्ट मॉंक नि पोखरून त्यात गुहा केली होती आणि ती लोकं आत जाताना दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लोक सरळ उतरलेत म्हणजे हातात काही दोरी नाही जवळ जवळ सरळ डोंगर पण वेडे वाकडे उतरत सरळ खाली येत होते. मला चार पावलं टाकलं कि धाप लागत होती आणि हि लोकं दररोज एवढा मोठा डोंगर वर खाली करत होते . हि मॉंक लोक ना दिसला डोंगर कि पोखरा आणि करा गुहा अशी आहेत , आमच्या बोरिवलीला पण कान्हेरी गुंफा आहेत, पण ते ठीके जंगल आहे जवळ समुद्र, नदी खायला प्यायला सगळं मिळत असणारे पण इथे हिमालयन वाळवंटात का म्हणून हि लोक राहत असतील आणि आता तरी आपण कपडे स्वेटर घालू शकतो पण त्या काळी असं काही नसणारे मग का बरं हे असं करत असतील? मी काय तिबेट नाही पाहिलं पण असच असू शकेल. इतक्या दुर्गम आणि कठीण जागेत का बरं वस्ती करायची ... (हल्ली लोक सिंहासनावर बसून ac हॉल मध्ये लोकांना ध्यान धरायला शिकवतात, चांगलंय) ... मी म्हंटल ना हिमालय खुप शिकवतो शिक्षक आपण निवडायचा . 

टाबो प्रसिद्ध आहे एका monastry साठी प्रसिद्ध आहे ती सर्वात जुनी आणि सगळ्यात पवित्र आहे असं म्हणतात. आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे फोटो काढले, लहान लहान लामा तिथे शिकत होते आणि फार कपडे न्हवते घातले. हि परंपरा अशीच पुढे नेण्या साठी धड्पड. त्या तिथे दुकानात मी चार गोष्टी घेतल्या माझ्या कडून त्या टाबो वासियांना मदत ... माणसं तिथे हसरी हो आणि हो एक शाळा सुद्धा होती तिथे.