कल्पा
आम्ही त्या चिटकूळ नावाच्या गावावरून निघालो आणि मग शांत पणे निसर्ग बघत बघत कल्पा नावाच्या एका सुंदर ठिकाणी गेलो. आणि रस्ते इतके छान इतके छान आणि ते पण इतक्या दुर्गम भागात कि कोण करतंय हा रस्ता? ह्या लोकांना मुंबईत का नाही बोलवत? तर मला असं कळलं कि रस्ता बनवणारे ना स्टेट गव्हर्मेंट ना केंद्र सरकार, रस्ता बनवतं BRO म्हणजे Border Roads Organisation. (ह्यांना एकदा मुंबईत आणलं पाहिजे, म्हणजे जिकडे ढग फुटी होते रस्ता वाहून जातो पण तुटत नाही, ते मुंबईच्या पावसाला काय घाबरतील?)
हा सगळा बॉर्डर एरिया , म्हणजे तिबेट ची बॉर्डर, म्हणून BRO बनवते आणि मेंटेन पण करते रस्ता. खूप डोंगराळ रस्ता, उंच उंच डोंगर , खूप थंडी आणि दुपारी एकदम गरम , पण तरीही त्यात पण कामगार काम करत होते , नवल वाटलं, आपण किती सुख सोयी बघून जागा बघतो आणि जरा वीज गेली इंटरनेट गेलं कि कासावीस होतो . इथे रस्त्याच्या शेजारी थोडी सावली बघून काही कामगार निवांत पडले होते दुपारी जेऊन... म्हणून म्हणतो प्रवास करा , आयुष्य एक प्रवासच आहे. (माणूस पण ग्रेट आहे, तिथे इतक्या वरती पण धरण बांधतो, म्हणजे रस्ता नाहीये पण धरण बांधतो आपण , अजब आहे आपला देश).
आम्ही त्या कल्पा ला दुपारी पोचलो, हॉटेल पण छान होतं आणि आजूबाजूला झाडं कसली असतील? सफरचंद. मी कोकणात फिरणारा माणूस आहे, त्या मुळे आंब्याची कलमं बघायची सवय आणि इथे तर तगरी च झाड असतं ना? तशी सफरचंद लागली होती लदबदली होती . मी विचारलं कि खाऊ का एक तोडून ? अरविंद म्हणाला कि कच्ची आहेत अजून वेळ आहे तयार व्हायला, मी देईन पुढे गेलो कि, खूप ओळखीचे आहेत.
त्या पर्वत शिखराचं नाव किन्नर कैलाश , कारण त्या अनेक उंच उंच डोंगरान मध्ये एका डोंगरावर शंकराच्या पिंडीचा आकार आहे आणि तो डोंगर अति विशाल आहे, सगळंच अजब आहे.
ह्या जिल्ह्याचं नाव किन्नौर असं आहे म्हणून त्याला किन्नौर कैलाश असं खरं तर म्हणतात, इथे भगवान शंकर आणि देवी पार्वती राहतात अशी समजूत आहे म्हणून त्याला कैलाश हे नाव . १४ किलोमीटर चा ट्रेक आहे आणि ती पिंड जवळ पास ७० एक फूट उंच आहे. दुर्बीण असली असती तर नीट पाहता आलं असतं , इतका ट्रेक करायला तुम्ही एकदम प्रोफेशनल असायला हवेत आम्ही ज्या वेळी गेलो होतो सप्टेंबर तोच चांगला महिना आहे ट्रेक साठी, साधारण सहा हजार पन्नास मीटर इतका उंच आहे तो पर्वत आणि तिथे पार्वती नि पाण्यासाठी कुंड सुद्धा केलं आहे म्हणतात. म्हणजे बघा ६०५० मीटर वर एक पाण्याचा कुंड सुद्धा आहे. इथे आपल्या नाळात, तिथे इतक्या वर पाणी. श देवानेच केला असणार, माणसाचं कामच नाही ते.
पण इतक्या खडतर ठिकाणी शंकरच राहू जाणे (म्हणुन गणपती बाप्पा, आपला महाराष्ट्रात जास्त वास्तव करतो ), तिथे शन्कराचं खूप कौतुक आहे, असणारच हो . एकदम डॅशिंग असणार मी दोन मिंट डोळे मिंटून साष्टांग घातला.
पण सांगतो तुम्हाला इतकं सुंदर दिसतं ना ते दृश्य खालून सुद्धा कि अगदी अद्भुत अचंबित करणारं होतं. आपण नतमस्तक होऊन त्या निसर्गा पुढे त्या भगवाना पुढे आपसूक हात जोडतो. (जा एकदा मला थँक्स म्हणाल). आपण किती शुल्लक आहोत ते पदो पदो तो निसर्ग आपल्याला ठासून सांगत असतो, चुकून एक धोंडा जरी निखळला ना वरून तर सगळंच गाव बेचिराख होईल, का उगा आपण मी माझं मला माझंच करतो ? तुम्हारा एक नाही चलेगा बंधू .
पाय निघत न्हवता माझा, कारण आमच्या खोली बाहेर एक बालकनी होती त्यातून हेच दृश्य. तरी आदल्या संध्याकाळी आम्ही थोडी चक्कर मारली एक बंद देऊळ बघितलं, इथे देवळं कायम उघडी नसतात सकाळी असतात फक्त. पण ते पाहायला पण ५० मजले चढ उतार केल्या सारखं वाटत होतं. तिथे पण एक शाळा होती मुलींची आणि शेजारी हॉस्टेल कारण मला वाटतं हे थोडं मोठं गाव आहे, बाकी सगळी आजू बाजूला खेडी... इथून पण जवळचं स्टेशन शिमला बस नि आठ दहा तास (काय न्हाय निवांत जावा) आपण चायला उगाच घाई घाई आणि emergency मध्ये काय होईल असं म्हणतो. ह्या लोकांचं काय अडलं आहे का? नाही ना?
आमचा ड्राइव्हर अरविंद तिथेच राहतो जवळ पास त्याला एक दिवस घरी जात आलं , तो म्हणाला कि लहानपणी शाळेत जायला रोज १० किलोमीटर येऊन जाऊन अशी तंगड तोड होती, पण लक्षात नाही यायचं म्हणाला , मजेत मस्ती करत जायचो (मुद्दाम म्हणाला असेल माझी दमछाक पाहून). हि लोक पण जाम काटक , मला वाटतं हा सहज धावेल मॅरेथॉन. सगळ्या उंच ठिकाणी असतं तसंच एक suicide point इथे पण होता. पण तिथे जवळ गेल्यावर समजलं कि खाली उडी मारायची गरजच नाही, नुसतं खाली वाकून पाहिलं तरी हार्ट अटॅक येईल इतकं खोल , तळ दिसतच नाही, (म्हणजे जीव द्यायला पण डबा घेऊन जावं लागत असणार, खाली पोचे पर्यंत माणूस उपास मारीने मारायचा ) एक तर मला उंचीची प्रचंड भीती आहे आणि हे तर उंचीच्या पलीकडलं. मगाशी सांगितलं ना? कि तो कैलास परबत ६ किलोमीटर उंच आणि हि जागा इतकी उंच कि खाली तळ दिसत नाही म्हणजे खालून किती उंच असेल तो पर्वत? आणि खाली गेलो तरी शिमला ते पण इतक्या उंचावर .... तुमहाला लक्षात येतंय का? मी मगास पासून उंच उंच उंच करत होतो ते किती उंच आहे ते? आकाश पर्यंत उंच आहे हे सगळं ....
इथे पण रस्ते छोटे होते पण चांगले होते, आमचा पुढचं पेट्रोल पंप दोन दिवसाने लागणार होतं ... नाही म्हणजे जस्ट सांगितलं ..... इथून पुढे सगळं वाळवंट लागणार होतं ...