Thursday, December 8, 2022

स्पिती - हिमाचल 1

मी खूप ते डिलिव्हरी ऍप्स वापरतो , दहा मिनटात घरात सामान हजर , आधी लोकं घरात धान्य साठून ठेवायचे आता सगळं हवं तेव्हा. बर तो माणूस जर दहा ऐवजी वीस मिनिटाने आला कि मी दहा वेळा फोन करून ... किधर है? किधर है ? असं विचारतो .... "मी" , आपलं एक प्रतीकात्मक म्हणून वापरलं ... आपण मुंबईत किव्हा मोठ्या शहरात अगदी इन्स्टंट जगतो आयुष्य , अगदी आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता , झोपायच्या आधी आणि उठल्या उठल्या मोबाईल बघतो ... 

 मला हिमालयात जा शांत होशील ... असा सल्ला दिला कुणीतरी.  आणि काहीही प्लॅन नसताना मला स्पिती ला जायची संधी मिळाली .... तिथे खूप ठिकाणी मोबाईल तर सोडाच साधा वाणी नाहीये बस सुद्धा दिवसातून एकदाच आणि ती नाही येऊ शकली तर दोन दिवस काही सम्पर्क नाही...  रस्ताहि धड नाहीये ... 

दोघातला विरोधाभास पाहिलात ? 

ignorance is bliss म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे , मला स्पिती बद्दल काही माहित न्हवतं आणि मी शोधायचा प्रयत्न पण नाही केला,  एक तर मी आळशी आहे, दुसरं म्हणजे मला कधी कधी माहित नसताना गेलेलं आवडतं, म्हणजे बघा तुम्ही एखाद्या ठिकाणचं गुगल करून फोटो पाहता माहिती काढता यू ट्युब बघता आणि जाता, पण तिकडे असं वेगळंच दिसतं मग नर्व्हस होता, त्या पेक्षा जे दिसेल ते .. अरे वाह ओह हो असं करत जावं, तेवढीच मज्जा आणि तिसरं कारण म्हणजे मी ज्यांच्या बरोबर जाणार ते म्हणजे माझे बॉस होते (आलं लक्षात मी आगाऊ पणा का नाही केला ते ?) आणि ते स्वतः एक दोन खेपेस तिथे फिरून आले होते आणि दर ३ महिन्याने कुठे कुठे जात असतात त्या मुळे मी तसा सेफ हॅन्ड्स मध्ये होतो मग पुन्हा का कष्ट घ्या?


वर सांगितल्या [प्रमाणे कार्यक्रम अगदी उत्तम प्लॅन होता आणि कुठेही त्रास झाला नाही कि,  अरे येऊ करायचं राहीलच ते ठरवलं असतं तर सगळं व्यवस्थित. खरं तर मी तसा फार जास्त प्लॅन वाला माणूस नाहीये आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये नजीकच्या काळात  भूतान आणि कधीतरी नन्तर न्यू झीलण्ड होतं (म्हणजे अजून आहेच ) आणि मला अचानक हा प्रस्थाव आला आणि मी लगेच त्याला होकार दिला. पण गम्मत म्हणजे इथे मला जरा भूतान चा फील आला कारण हे तिबेट ची बॉर्डर आणि एकूण लोकं सगळी बुद्धिस्ट आणि दिसायला थोडी तशीच (पण तरी भूतानला मी जाणारच). 

स्पिती,  लोकं थन्डित म्हणजे बर्फात करतात किव्हा उन्हाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर आम्ही तस केलं. साधारण एक आठ दिवसात आम्ही मुंबई - चंडगढ -नरकांडा (मुक्काम) - चिटकूळ (मुक्काम) -कल्पा (मुक्काम) -नाको -गुये - ताबो (मुक्काम) -धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) -कोमिक -हिक्कीम -लान्गझा -काझा (मुक्काम) -कि -चेचम -चंद्रताल (मुक्काम) - मनाली (मुक्काम) ते चंदिगढ -मुंबई .... इतकी पायपीट केली (इंनोवा मधून). 

मी समुद्र सपाटी वरचा माणूस आणि माझं निम्म्या हुन अधीक आयुष्य तळ मजल्यावर गेलं, फार तर रायगड सर केलाय , पण इथे रायगड पेक्षा सहा पट उंच डोंगर (सहा पट हे का म्हंटलं ते चतुर लोकांना समजलं असेलच)आणि तो पाहून टोपी पडली कि मागे आणिक एक उंच डोंगर , (इथूनच पांडवांनी स्वर्गात जायचं नियोजन का केलं हे मला कळलं ) म्हणजे उंचच  ऊंचं. परत आता झालंय कसं कि आपल्याला ऑक्सिजन लेवल वगैरे असते हे कोविड  नि शिकवलंय त्या मुळे पंचाईत होते तिथे ऑक्सिजन लेवल ७५ वगैरे होते म्हणे . म्हणजे मी बुटाची लेस बांधायला वाकलो आणि धाप लागली, फाटली ना हो. एरवी मी धावतो माझा stamina बराय हा गुरुर त्या डोंगराने (त्याच्या) बुटा खाली तुडवला (म्हणून डोंगराशी मस्ती नाही).  

नारकाण्डा ला आम्ही चंदिगढ हुन शिमला मार्गे साधारण ५ च्या सुमारास पोहोचलो अंतर फार नसलं तरी खूप घाट रस्ता खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच , गाडी लागणारा माणूस असेल तर त्याला अशक्य आहे (तिथे राहून गाडी लागते असं म्हणणारा माणूस अशक्य). आणि थंडी पण बरीच होती म्हणजे दोन दोन स्वेटर , तरी हा उन्हाळा म्हणून बरं एरवी बर्फा खाली असतं सगळं. इथे मला वाटतं निम्याहून अधिक हिमाचल हे आठ महिने बर्फ़ा मुळे बाकीच्या निम्म्या राज्या पासून तुटलेलं असतं. रस्ता नसतोच सगळं बर्फ़ा खाली जाणार कसं?

हिमाचल ला देव भूमी म्हणतात, का ते तिथे गेल्यावर कळतं. आहो सगळंच इतकं अफाट आणि निसरगावर अवलंबून असतं कि माणूस अगदीच थिटा वाटतो. पण अफाट हे सुंदर असू शकतं हे हेचि देही हेचि डोळा पाहून पटतं. आम्ही जेव्हा  नारकाण्डा ते चिटकल हा प्रवास केला तेव्हा मध्ये मोठी गावं तालुके आणि काही ठिकाणी तर मध्येच घरं बांधली असं वाटलं, आमचा ड्राइवर (जो स्वतः  दोन बस आणि ३ गाड्यांचा मालक आणि एकदम हिरो टाईप्स होता) म्हणाला,  कि आत डोंगरात अजून घरं आहेत , म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही कि गावं असतील म्हणून इतक्या आत दरीत. मध्ये रामपूर नावाचं मोठं गाव लागलं, तालुका आहे म्हणून कळलं . पण एकदम छान होत, कुठे दारिद्य नाही दिसलं, जवळचं  स्टेशन म्हणजे शिमला ते हो १४ तास , बाकी सगळं बस , त्या शिवाय पर्याय नाही. इतकं चार लोकांन पासून दूर आहे म्हणून मला वाटतं ते छान आहे . 

आम्ही इतक्या उंच गेलो तेव्हा तिथे सपाट पठार लागलं आणि इतकं सपाट कि तिथे शेती करतात लोक , इथे ना सगळी कडे डोंगर  आहेत म्हणजे बघा हा कि आपण समुद्रात जातोय अथांग समुद्र आणि मध्येच एखादं बेत लागलं छोटं तर लोक तिथे राहायला लागतील तसं काहीसं .... नुसते उंच डोंगर तो चढून गेलात कि पुन्हा नवीन मोठा डोंगर आणि त्या मध्ये एक छोटं खानी प्लेन जमीन , मग लोकांनी काय केलं कि थोडी सपाट जमीन दिसेल तिथे घर बांधली आणि मग आणिक लोकं येऊन त्यांनी गाव केलं आणि मग असं सगळं राज्यच बनलं. आम्हाला वाटेत बरेचदा बकरी, म्हणजे मेंढ्या (लोकर असते ती कोण हो? त्याच ) चारणारे लागले , आमचा ड्राइवर म्हणाला कि हेच खरे तर Original explorer अश्या मेंढ्या गाई म्हशी घेऊन फिरायचं छानशी जाग लागली कि तिथेच थांबून घर करायचं मग शेती वैगेरे करायची, जागा भरली कि पुढे जायचं आणि दुसरं गाव ... काय काय नवीन शिकायला मिळतं.  

चिटकुल चा वर चढताना रस्ता थोडा खराब आहे आणि काही ठिकाणी तर एकच गाडी जाऊ शकते.  सामोरा समोर गाड्या आल्या तर एक गाडी कड्याच्या जितकं कडेला म्हणून जाता येईल, तितकं जाऊन ती थांबते,  पूर्वीच्या काळी कडेलोट कश्याला म्हणत असतील त्याचा अनुभव घेतला आणि मला पुढे पुढे गेल्यावर असं कळलं कि हा रस्ता सगळ्यात OK आहे आगे आगे देखो असं म्हंटला ड्राइवर . 

सहा आठ महिने हा रस्ता बंद असतो म्हणजे वरची लोक वरतीच राहतात. बंद का असतो तर सगळा बर्फ, रस्ता करणार कधी आणि कसा? 

वरची गम्मत मी खाली म्हणजे पुढच्या भागात  सांगतो. 




2 comments:

Anonymous said...

खुप छान वर्णन!

meDreamz said...

खुप छान वर्णन!