Sunday, December 2, 2018

अमेरिका - ५


मी गेल्या आठवड्यात फिलाडेल्फियाला केदार कडे गेलो होतो चार दिवस, केदार म्हणजे मावस भाऊ, इथेच आहे १८ एक वर्ष , छान घर आहे, ३ मूल आहेत, एकदम गोड आहेत, दिसायला भारतीय पण बोलायला फर्डा इंग्रजी आणि शिस्त तीच , पण आपल्यासारखी, म्हणजे अगदी बेस्ट ऑफ बोथ वल्ड्स . मस्ती खूप पण व्रात्य नाही , एकदम आज्ञा धारी स्वतंत्र.

माझं तिकीट त्यानेच काढून पाठवलं (माझ्या इथल्या टिच भर मिळणाऱ्या भत्त्यात मला ५०००० हजार परवडणारे न्हवतेसच ) आणि मी गुरुवारी त्याच्याकडे पोचलो, thanks giving साठी दोन दिवस सुट्टी मिळाली होती म्हणून त्याच्या कडे गेलो. हा देश लै म्हणजेच लैच मोठाय , म्हणजे मी त्याच्या थोडा जवळ आहे, दिल्ली मुंबई इतका, किव्हा अजून थोडा जासत, पण तरी खूप जवळ, स्वाती, म्हणजे माझी मावस बहीण साडेसहा तास उडून केदार कडे आली , म्हणजे बघा .... आपण आठ तासात युरोपात जातो आणि अमेरिकेतल्या अमेरिकेत सडे सहा तास 

बुधवारी म्हणजे २१ नोव्हेंबर ला लवकर पांगा पांग झाली , सगळी लोक सुट्टीवर गेली , हापिसात इन मिन तीन माणसं , त्यातला एक गोरा  ( इथे सगळे तरुण आहेत, म्हणजे अगदी कॉलेज संपवून आलेले ) मला म्हणाला ते पण अगदी आढे वेढे घेत, थोडं चिंतेत , कि तू काय करणार चार दिवस , मी म्हंटल अरे मी चाललोय भावाकडे इथे नाही मी , एकदम हायस झाल्यागत म्हणाला चला बर झाल, मी विचार करत होतो कि तू इथे एकटा काय करणार, सगळंच बंद , मग तुला कुठे फिरायला नेऊ का? पण बर केलंस, ईथे काहीच नाही पाहायला.  बाय मजा कर म्हणाला आणि गेला .... खूप बर वाटलं मला, कि यार हा कुणी परका , परदेशातला माझ्या बद्दल इतका आपुलकीने विचार करतो? म्हणजे माणुसकी आहे तर, ह्यांच्यात जास्त असेल ... दिखावा नसेल पण जाणीव आहे ...... अगदीच पर गावी नाहीये मी असं वाटलं , उद्या वेळ आलीच तर ही लोक नक्कीच मदत करतील न सांगता, हा एक खूप आधार वाटला .... आपली काय ह्यांची काय तरुण पिढी हीच शेवटी उद्याची आशा आहे, अमेरिका तरी सुखरूप आहे असं वाटलं . ह्यांच्या आणि आपल्या शिक्षण पद्धती बद्द्दल घडण वळण बद्दल नंतर सांगेन कारण आज खरं तर फिली बद्द्दल आहे .... 

मी फिली ला साधारण तीन च्या सुमारास आलो , केदार मला न्ह्याला आला होताच , त्याच घर तासा भरावर होत (म्हणजे १०० एक किलोमीटर ), माझं पण घर एअरपोर्ट पासून तासाभरावर आहे, पण अंतर १५ किलोमीटर एवढाच फरक . तीन आठवड्याने आपला कुणीतरी भेटणार म्हणून मी पण भावुक आणि उत्सुक होतो , एरपोटच्या बाहेर आल्यावर एक चार मिनटात केदार दिसला, एकदम टका टक ऑडी A ७ , बर वाटलं भेटून, गाडी एरपोर्टच्या बाहेर आली आणि हायस वाटलं, एकदम मोठं शहर , गाड्या,  उंच इमारती वगैरे . मी राहतो ते एक गाव आहे, ट्रेन वगैरे काही नाही ट्राफिक नाही काही नाही इथे बर वाटलं, तरी सुट्टी होती म्हणून शुकशुकाट होता, पण छोटे रस्ते खूप गाड्या बघून बर वाटलं, मग कुठे खायला मिळतंय का बघू म्हंटल तर सगळं बंदच, मग घरी जाऊन मी हादडल ... त्याची तीन लहान मुलं अगदी गुणी सारखी माझ्या जवळ आले मला कडेवर घेऊ दिलं पापे घेऊ दिले आणि परत खेळायला पळाली , इतकं नवल वाटलं मला , इथे हवेतच गुणी पणा (आणि खूप थंडी), ठासून भरलंय ... 

कैरावीने (केदार ची बायको ) मस्त चहा दिला, रात्री आमटी भात भाजी लोणचं दही वगैरे सगळंच साजर संगीत दिल दुसऱ्या दिवशी उंधियु आणि एके दिवशी गवार बटाटा आणि पनीर आणि आमटी  भात, अगदीच छान जेवण , तीन आठवढे  मी एकटाच ते पाकीट फोडून खात होतो इथे पोट फुटे पर्यंत खायला घातलं . 

दुसऱ्या दिवशी मी स्वाती केदार फिलीला गेलो....

त्या ,मुलांचं एक (म्हणजे अनेक कौतुक आहेत त्या मधलं एक) कौतुक असं कि आम्ही निघालो तेव्हा २ नंबर च्या पोराने (वय वर्ष ८)विचारलं कि बाबा कुठे चाललात काका आणि आत्या ला घेऊन? केदार म्हणाला फिली दाखवायला, आम्ही यायचं का? नाही रे ह्यांनी पाहिलं नाही ना, म्हणून फक्त ह्यांना , ओक असं म्हणून आम्हाला बाय केलं मिठी मारली आणि सुसाट पळत खेळायला गेला, मला फार कौतुक वाटल , अजिबात हट्ट नाही कि काही नाही, कुणाच्याही हातात मोबाईल आयपॅड नाही, गिटार वाजतात.  एक मुलगा violin आणि piano आणि वाचन करतात रोज. हे सगळं मस्ती अभ्यास करून ....खूप स्वावलंबी  आहेत ... 



फिली हे खूप     ऐतिहासिक शहर आहे,  इथे  Declaration of Independence and Constitution वरसह्या केल्या होत्या , म्हणजे थोडक्यात इथे अमेरीकन लोकांनीं स्वातंत्र्य घोषित केले,कुणा पासून ते नाही नीट कळल. पण इथेच त्यांच constitution लिहिलेलं गेलय आणि ते फक्त ३० एक पानी आहे , त्यातलं मूळ बहुदा १७ पानीच.  बाकी सगळं लोकांनी ठरवायचं , म्हणजे हेच असच करा असच जा असच खा असच जगा अस नाही, तरीही लोक इतरांना खूप मान देतात आदर करतात, रस्त्यात पहिले आप आहे, लोकांना डोकं चालवायला वाव आहे, स्वातंत्र्य आहे. 

एक सांगावं वाटलं म्हणून, युरोपात काय किव्हा इंग्लंड ला काय लोक सिगारेटी फार ओढतात , इथे मला प्रमाण कमी दिसलं, नवल वाटलं मला, कारण आपण अमेरिका "खाली पिक्चर मी देखेलाय", तस अजिबात नाही वाटलं , दारू वर पण बऱ्या पैकी निर्बंध आहे, युरोपला वाणी पण दारू विकतो, इथे असं नाहीये. आपले हिंदी पिक्चर बघून लोकांना जे वाटत तेच आपल्याला वाटत ह्यांच्या बद्दल, जेवढं हिंदी सिनेमातला भारत खरा तेवढाच हॉलीवूडचा मधला हा देश खरा, फक्त शिस्त आणि स्वच्छता एकदम खरी. 

तर केदार आम्हाला (परत ५० मैल लांब)फिली ला घेऊन आला गाडी पार्किंग मध्ये लावली (मुंबई सारखा इथे पण पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणे :)म्हणून एके ठिकाणी गाडी लावली )आणि बस च तिकीट काढून आम्ही तिघे त्या होप ऑन व होप ऑफ मध्ये बसलो, हे जग भर असच आहे, दार अर्ध्या तासाला बस असते, २७ पॉईंट फिरवतात तुम्हाला.  हवं तेव्हा उतरा आणि परत पाठच्या बस मध्ये मध्ये बसा. गुरगुट थंडी होती, त्यात आम्ही ओपन बस मध्ये फिरलो, मजा आली राव.  केदार बिन्धास होता मी आणि स्वाती हातमोजे मफलर जाकीट कानटोपी, केदारच म्हणणं असय कि आपल्याला अशी समजूत आहे कि आपण कायम गरमच राहायला हवय आणि त्याची गरज नसते, स्वाती म्हणते पण थंड राहायची पण गरज नसते ,म्हणून आम्ही दहा बारा कपडे आणि तो नुसता जाकीट .. असो... तो वीस वर्ष राहतोय मला २० दिवस पण नाही झाले ....  

फिली शहर मोठं आहे. पेन्सिल्वेनियात राज्यातील सगळ्यात मोठं शहर, इथे एक मोठी घंटा आहे, लिबर्टी बेल, ती पाहायला मोठी रांग होती, मी नको म्हंटल, तास भर रांगेत उभं राहून काय पाहायचं? तर घंटा? इथला इतिहास  फार तर तीनशे वर्ष जुना (आपला २०००० वर्ष... नाही का? बर २०००..सांगायचा मुद्दा येगळा हाय, जुना ,नवा,  सरस, खराब नाहीये) .... पण तरी खूप छान सांगतात फिरवतात, झालंच तर इथे रॉकी नावाचा पिक्चर च शूटिंग झालं होत, म्हणजे स्टॅलोन च , त्यात तो एके ठिकाणी धावत जिने चढतो, तर ह्या लोकांनी त्याचा पुतळा उभारलाय आणि लोक तिथे फोटो काढतात .... काय पण विकतात आणि आपण काय पण विकत घेतो. 

तर आम्ही फिरता फिरता एके ठिकाणी ट्रॉपिक मध्ये अडकलो आणि शेजारी एक मार्केट होत, ७० एक दुकान त्यातली सगळीच बहुदा हॉटेल्स आणि दोन चार हाड माउस विकणारे, आम्ही खरं तर एका उंच बिल्डिंग पाशी थांबून वरून शहर पाहणार होतो, पण मला राहवेना, म्हंटल चला मार्केट पाहू. नुसत्या इमारती काय पाहायच्या? इन्सानियत पाहू म्हंटल. "रेडींग मार्केट", गजबजाट अनेक हॉटेल्स खाऊ गल्ल्लीच (तरी स्वछ), अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ, गाय म्हैस , डुक्कर, कोंबडी बदक, मासे सगळंच विकायला पण,  आपल्या सारखं असं लटकावून न्हवत ठेवलं. शेजारी शेजारीच  हॉटेल्स, मिठाई च दुकान, आईस क्रीम, भाजी पाला, पिझा, बर्गर , इंडियन , मेक्सिकन, केक्स , मिल्क शेक, कूकी आणि बरंच काही आम्ही हिंडून खाऊन निघे पर्यंत डीड दोन तास गेले ... कश्यात हि रमतो मी, मला आठवत आम्ही भावंडं त्या शिवाजी पार्कात त्या शनिवारी बाजारात किती रमलो (येडे आहेत आम्ही).पण मला मजा आली अशी जवळून लोक बघता आली, काय खातात पितात ते पाहता आलं, गर्दीत कसे वागतात , घाण करतात का? ते पाहता आलं प्रामाणिक लोक आहेत, जस एअरपोर्टला  असतात तसेच मार्केट मध्ये वागत होते, आपण मॉल मध्ये वेगळं आणि भाजी वली, मासे वाली कडे वेगळं असतो ...... ही कॉपी का नाही करत यार आपण. मी तिथे चिकन खाल्लं म्हणा, भारतात मी नाही खात, मासेच जास्त खातो, पण इथे येऊन मी जास्त शाकाहारी झालोय, स्वतः करून खा म्हणून असेल, पण भांडी घासा आणि परत इथे वाटण घाटण करायला काही नाही, बाहेर काय एवढ नीट नाही मिळत आणि मी राहतो अडनिड्या जागी धड काही नाही उबर चे १५ डॉलर आणि खायचे ५ अस आहे, म्हणून आपलं घरीच खावा ... तर त्या मार्केट मध्ये मस्त हुंदडून आम्ही बशीत बसलो तेव्हा चार झाले होते ,ती बाई (म्हणेज गाईड )म्हणली की साडेचार ला बंद होणार टूर, म्हणून आम्ही मग त्या टॉवर ला जाऊन वरून शहर बघायचा प्लॅन रद्द केला (एकदा आयफेल टॉवर वरून पॅरीस पाहिलं कि बाकी काय पाहणार महाराजा?)मग नुसत फेर फटका मारून परत केदार च्या तीन रत्नांशी बागडायला परत आलो

इथली नाव इंग्लंडशी जुळतात , म्हणजे रेडींग म्हणा... अशी बरीच अरे आणि मोठं म्हणजे न्यू यॉर्क, यॉर्क जे इंग्लंडला आहे ते इथे येऊन न्यू झालं....सगळी नाव तिथून आणली , कारण यूरोप मधून आलं कि हे बेट आधी लागत , आणि ही लोक आली पण इंग्लंड हून, सगळी नाव तशीच, पण इमारतींचं बांधकाम मात्र मला वेगळं वाटलं. ह्या लोकांनी नाव सोडल्यास , म्हणजे घेतल्यास बाकीचं इंग्लंडच तस काहीच नाही घेतलं . बेंजामिन फ्रँकलिन नावाचा एक थोर माणूस इथे होऊन गेला त्यानेच ते सगळं लिहिलं , तोच पहिला पोस्ट मास्टर, तोच फायर ब्रिगेड चा संस्थापक, तो एक संशोधक होता,  चांगला सुशिक्षित होता, एक ना अनेक गोष्टी, मला फक्त जॉर्ज वॉशिंग्टन माहित होता, म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन बद्दल ऐकून होतो, पण हे न्हवत ठाऊक कि तो एवढं सगळं करून गेला. पण त्याला मानलं, असं constitution लिहून गेला कि त्यात लोकांना मोकळं केलं अडकवलं नाही पण तरीही एक बारीक धाग्यात सगळ्यांना ओवून गेला, तुम्ही तोडलं तर माळ तुटेल, माळ असेल तर मोती नाहीतर मातीत जाईल .  सरकार तुम्हाला बांधत नाहीये.. फक्त सांगते .... आता थोडा फरक जाणवतो म्हणा,  त्यांचा तो नवा राष्ट्राध्यक्ष फार कुणाला आवडत नाही, पण अमेरिका देश खूप मोठा आहे, आपल्याला फक्त कडे कडेचा ठाउके आतला कुठे ठाऊक? स्वाती जेव्हा साडे सहा तास घेऊन इथे येते, म्हणजे खाली सगळं देश आहेसच ना? 






No comments: