Friday, February 13, 2026

Australia -3 - Echuka

इचूका - प्रवास

मी राहतो ते गाव लहान आहे आणि इथून सगळंच लांब आहे त्या मुळे आम्हाला ६०० किलोमीटर प्रवास करणं भाग होतं. छान रस्ते नो खड्डे , सगळीकडे रस्त्यात पांढरे पट्टे , कुठून ओव्हरटेक करा कुठे नाही, हे सगळं अगदी नीट आखलं होतं हॉर्न नाही कुणी अंगावर नाही ... असं स्वप्नमय सगळं (हे सगळं mandatory आहे, आपण आपली अपेक्षा इतकी ० केलीये कि बेसिक पण भारी वाटतं). 

तर प्रवास उत्तम झाला ७ तास लागले (३ वेळा थांबून). इथे ११० अशी max लिमिट आहे मध्ये ८० होतं गाव आलं कि ५० मग २ किलोमीटर ४० . आता बघा हा,  रस्ता मोकळा वाटेत कुणी नाही शुकशुकाट एक बोर्ड गावातला कि ५० स्पीड , गाडी उत्तम , पटकन लक्षात नाही येत ५० चा ६० कधी होतो ते स्पीड. आम्हाला असाच एक जबर फटका बसला, आम्ही तिघे होतो तंद्रीत चाललो होतो, पुढचा एकदम स्लो झाला म्हणून आम्ही झालो, तो वळला एके ठिकाणी आणि आम्ही पुढे गेलो , २ मिनिटाने पाठी पोलीस ची गाडी विंग वोंग विंग वॉंग करत पाठी , इंग्रजी पिक्चर मध्ये दाखवतात तशी थांबली खूप पाठी (भारी BMW होती), अमेरिकेत तुम्ही हलायचं पण नसतं समोर बघत राहायचं , पोलीस येऊन काय ते बघून जाऊदेत त्यातला प्रकार. इथे काहीच हालचाल नाही म्हणून आमच्यातला गाडी चालवणारा उतरून गेला, आम्ही जायचं का ते कळत न्हवतं , मग लायसन बघू झालं, ते जपान चं होतं त्यात दहा मिंट .... मग तो सडे आठ फूट पोलीस पाटील आला आणि म्हणाला कि तुम्ही जोरात गेलात , ५० लिमिट आहे साहेब ... ३६००० रुपये दंड मारलान ...परत वाचा (वाचाल तर वाचाल). मला सांगा नियम न पळून सांगताय कुणाला? मग आम्ही आखा रस्ता ५० दिसलं कि ३० नि गेलो आणि ११० दिसलं कि ९०. कडक अनुशासन कडक शिस्त ... आम्हाला एक दोनदा लोकांनी हॉर्न पण मारला , जल्दी जाव म्हणून सांगायला , त्याला आम्ही (गाडीतून बंद काचेतून ), बरी नजर वाले तेरेको ६०००० का दंड हो म्हणून ओरडलो (हिंदीत).  आपलं समाधान.

एवढं सिलो सिलो जाऊन पण आम्ही बरे गेलो , वाटेत एकदा पेट्रोल पम्पावर उतरलो तर लै माश्या , गाडीतून उतरल्यावर, आत चहा ब्रेड वगैरे विकतात , गुजराती होता, in the middle of nowhere होता पंप , तरी हा होता , धड इंग्रजी पण येत न्हवतं , बायको फर्डा इंग्रजी होती, माश्या सोडणार नाही म्हंटली पाठ. इथे किडे माकोडे खूप आहेत , रानटी आहे प्रदेश म्हणून लोकं पण तशीच आहेत धिप्पाड ...

इचूका गाव छान आहे , बंदर आहे आणि new south wales आणि Victoria च्या बॉर्डर वर आहे आम्ही एक बोटीतून चक्कर पण मारली सकाळी. मरे नदी आहे, नदी आहे म्हणून हिरवळ आहे. मला पाणी फार आवडतं . नावा मुळे असेल माझ्या, पण नदी वगैरे म्हंटलं कि मला बरं वाटतं , कोकण पण मला म्ह्णून जास्त आवडत असेल. तर इथे नदी आहे त्या मुळे छान झाडं वगैरे दिसली , बरं इंडियन जेवण मिळालं (काय लोकांना कौतिक). 

मुख्य म्हणजे कांगारू दिसले, खूप जिवंत उड्या मारणारे कांगारू दिसले, आईच्या पोटातून लहानगा डोकावून पण बघत होता (मी कांगारू खायचा प्लॅन त्या मुळे ड्रॉप केलाय) गोड दिसतात. एका रिसॉर्ट जवळ दिसलेत. ऊन्ह उतरली कि येतात बाहेर . माणसाला बघून पळून जातात. ह्या लोकांना थोडा उपद्रव होतो म्हणतात. पण एकदाचे दिसले बाबा कांगारू .

येताना पण तितकेच तास लागले (दंड नाही लागला), पेट्रोल पंपावर जेवलो, दोन गुजराती लोकं दिसली , पण एकूण प्रवास सुखकर झाला. 

आम्ही एकदा ऑरेन्ज नावाच्या ठिकाणी जाऊन आलो तेव्हा रस्ता छान होता, हिरवं शेत दिसलं , थोडा वर खाली रस्ता होता, वर खाली म्हणजे चढ उत्तर रस्ता एकदम टकाटक मक्खन. हिरवळ पण होती खूप.  गाव मोठं होतं पण बाकी सगळं सेम. काही फोटो पण टाकतोय.  ऑरेंज मध्ये इंडियन स्टोर आहे आणि एक दोन पंजाबी हॉटेल पण आहेत . सुख वस्तू आहे गाव . एक छोटा मॉल पण आहे. 

मला US ला किव्हा यूरोपात खूप ठिकाणी homeless लोकं दिसली.  US ला जवळ जवळ प्रत्येक स्टेट मध्ये (१० का ११  स्टेट्स फिरलोय) दिसलेत. इथे मी अजून २ का ३ लहान शहर पाहिलीत पण अजून फार गरीब किव्हा homeless नाही दिसलीत. कष्ट करी कामगार वर्ग सारखा दिसतो . मी ज्या शहर वजा गावात राहतो तिथे सोन्याच्या खाणी आहेत (सोनं स्वस्त मिळेल का ? असं विचारल्यावर भारीच विनोदी आहेस बुवा, असं म्हणाली ती ताई आणि ठो ठो हसली) म्हणून कामगार वर्ग दिसतो आणि दुसरं म्हणजे शेती करतात लोकं , एकर नाही तर किलोमीटर नि करतात २५ किलोमीटर वगैरे. एवढी शेती करायची म्हणजे मोठे ट्रॅक्टर आलेत , माणसं नाहीत फार. तोच माणूस सगळं करतो म्हणून कष्टकरी कामकरी वर्ग. आपल्या कडे फार चाकर मानी दिसतात लोकं जीव टाकून लोकांना पैसे कमावून द्यायच्या मागे लागत असतात. इथे ते नाही काही . निवांत असतं स्वतः कष्ट  करा स्वतः खा. 


अजून एक म्हणजे कपडे साधे आहेत , ऑफिसात तर चड्डी घालून येतात आमच्या , उन्हाळा आहे म्हणून असेल . म्हणजे CFO पण चड्डीत COO तेच (वऱ्हाड निघालंय मध्ये नाही का ती बाई म्हणते चड्डी चड्डी काय करता घेतल्या चड्ड्या, तसंच काहीसं). आपल्याकडे बायका जरा नटून वैगेरे येतात तसं नाहीये इथे, एकूणच बाहेरच्या  देशात असं मला जाणवलं. पुरुष नशिबाने अजून तरी सगळीकडे usually सेम असतात  , त्या मुळे दाढी वेगैरे आपल्या सारखं आहे इथे.

(पण ते चड्डी म्हणजे जरा जास्तच झालं) . 

बाकी बरंय गाव माणसं बरीयेट फार श्रीमंत नाही कि गरीब नाही. एक आवर्जून सांगायचं म्हणजे मी जिथे जातो तिथे चार पाच लोकं बसतात (५० लोकं आरामात मावतील इतकी जागा) बाकी वेरहाऊस किव्हा साईट वर असतात. मालकीण बाईच सकाळी ७ ला ऑफिस उघडते, जाऊन पाणी आणते चहा (tea bags ) दूध आणते , कचरा बाहेर टाकते (dust bin मध्ये ) ७ नंतर तीच कुलूप लावून जाते.  त्या दिवशी त्या मालकाने ऑफिस मॉप ने पुसून घेतलं आणि ते बाहेर वाळत टाकलं सगळं घबाड.  बऱ्यापैकी पैसे आहेत त्यांच्याकडे.  पण कसला माज नाही आणि हे काम मी का करू? असं नाही. शेतकरी होता आधी पण साधे पणा अजून  टिकून आहे. (त्याच्या पंज्यात शेक हॅन्ड म्हणजे बादलीत चमचा असं आहे एकदम कष्टाचे हात कळतात). हा एक फरक आपल्यात आणि ह्यांच्यात आहे. म्हणजे अगदी यूरोप आणि अमेरिकेत पण कोणत्याही कामाला कमी नाही लेखत आपण हे कसं करायचं? हे नाही. 

असं grounding experience आले कि खूप बरं वाटतं.

इथे  एक मोठी डिश आहे, म्हणजे दुर्बीण आहे, observatory , छान होता अनुभव एक "The Dish" नावाचा चित्रपट पण येऊन गेलाय. कधी लिहेन त्यावर. आता उल्लेख केला कारण तिथे एक पिक्चर बघितला. सूर्या पेक्षा कैक लाख पटीने मोठे तारे आहेत आणि सूर्याचा एक कण जरी चंद्रावर पडला तरी संपेल चन्द्र हा सूर्याचा आकार.  म्हणजे त्या ताऱ्याचा अजस्त्र पणा बघा ... आपण कित्ती क्षुल्लक आहोत ते जाणवेल . म्हणून त्या माणसाचं मला फार कौतुक वाटलं, ह्या जगात आपली जागा ओळखून राहणारी माणसं फार कमी आहेत. आणि अंतराळात पाहिलंत तर आपलयाला हे फार लक्षात येतं कि आपण काही नाही रे कसला माज आणि कसलं काय.

इथे फार सुंदर आणि मोठं दिसतं आकाश आणि जमीन, त्या मुळे फार जाणवत राहतं आपला छोटेपणा (लहान म्हणूया)






चला मंडळी असाच फिरत राहिलो तर लिहीत राहेनच, तुम्ही पण येऊन बघा एकदा , छान आहे देश. 


सागर कुलकर्णी 

फेब्रुवारी २०२६









Saturday, February 7, 2026

Australia - extra एक अनुभव .

एक अनुभव .

आमच्या बरोबर जपान चा एक कलीग आहे मूळ हैद्राबाद , आम्ही दुपारी बाहेर जातो जेवायला ९०% सबवे कारण ते सेफ आणि बेस्ट , इथे नवीन एस्पा कबाब म्हणून त्या सबवे शेजारी पाकिस्तानी हॉटेल उघडलं आहे , मी पण दोन  दिवसाने तिकडे गेलो कारण तो जपान वाला रोज जातो हलाल मटण गॅरंटी आहे म्हणून  , मला त्या कबाब वाल्याने फार आठ्या आणून आणि चिडून कबाब दिला म्हणून मी परत नाही गेलो, पैसे देऊन तिरस्कार का सहन करा? तो माणूस बाकीच्या लोकांशी हसून थँक्स म्हणून देतो आणि मला मात्र चिडून दिलं ...  ह्ड म्हंटलं... हा मला आलेला २५ वर्षात पाकिस्तानी माणसाचा पहिला अनुभव (मी लै देश पाहिलेत, म्हणून पहिला म्हणालो, बाकीचे खूप वेगळे आहेत).

पर्वा कोल्स मध्ये (कोल्स म्हणजे आपलं dmart , पण गर्दी कमी कारण लोक संख्या कमी), एक आपला (brown skin  ), माणूस अदबीने हसला मी पण हसलो , मग काउंटर वर जाताना तोच माणूस पुढे होता, मुझे आपको देख के  लगा जैशन्करजी है (minister आपले )(पु लं म्हणतात तसं वहिदा रहमान आणि कानन बाला मध्ये दोघी बायका ह्या पलीकडे साम्य नाही तस झालं मला), मी उगाच हाहाहा केलं (मी घरी येऊन दोनदा फोटो पहिला त्यांचा, काय साम्य आहे का म्ह्णून, नाही दिसलं), इथे कसा असेल जयशंकर? म्हणालो मी, हॅलो मी सागर , तुम्ही कुठले मी आसिफ , कराची म्हणाला , मग आम्ही बोलत त्या दुकानाच्या बाहेर आलो , आम्हा ४ लोकांना बघून अरे आप साथ है ? कभी देखे नही म्हणाला , म्हंटलो अरे  १० दिवसा करता आलोय, तर आग्रह केला त्याने , आओ खाना खाने , दमलो म्हणलो घरी जातोय जस्ट ऑफिसातून आलोय. चाय तो पिलो , अगदी प्रेमाचं आमंत्रण वजा हट्ट , समोर राहतो म्हणला , १५ मिनिट से क्या होगा ? बायको डॉक्टर आहे, ८ महिन्या आधी आलो छोटा गाव है म्हणाला , चला गप्पा मारू , चाय पिके खाना खाके जाईये म्हणाला . अरे चाय तो पिलो मस्त चहा करतो परत तोच आग्रह . मला खूप जेवायला जायचं आहे, दाल चावल खायला चालेल असं वाटलं , एक तर पाकिस्तानी जेवण एक नंबर असतं आणि इथे डायरेक्ट पाकिस्तानीच  जेवण देणार , प्लस आठ दिवस नुसता पाव खातोय आणि इतकं प्रेमाचं निमंत्रण होतं आणि खरंच इतकं मना पासून कि काय सांगू ? पण एकदम चार लोकं नको वाटलं (खूप उपाशी आहोत भुक्कड सारखं खाल्लं असतं ).. जाताना परत शेक हॅन्ड ,  अगळी बारी जरूर आना , परत आग्रह वजा हट्टं. अरे काय असं झालं, आता ह्या वयात खोटा आव आणि खरं काय ते कळतं आपल्याला ...

कसं काय आणि का आपण मत बनवायचं सांगा? 

सागर 





Australia -2

पारकेस - Parkes - पार्क्स.

आमचं काम पारक्स नावाच्या गावात आहे सिडनी पासून साधारण ४०० किलोमीटर असेल अंतर, इथे आहे विमानतळ पण अगदी छोटेखानी आणि २६ जानेवारीला तो बंद होता. तेच विमान दोन फेऱ्या मारतं २० सीटर वैगेरे असेल. मग आम्ही ऑरेंज नावाच्या एअरपोर्ट पर्यंत गेलो आणि तिथून मग टॅक्सी करून १०० किलोमीटर पार्क्स ला आलो.  इथे रेंट कार आहे पण ह्या गावात ती सोडता येत नाही म्हणे, अशी बहुतेक चुकीची माहिती कुणीतरी दिली होती म्ह्णून हा द्रविडी प्राणायम. (आपण भारतीय लोकं बेसिक जुगाडू असतो काहीतरी सोया शोधात राहतो हि लोक काय कि अमेरिकन काय एका  रेषेत चालतात )

ऑस्ट्रेलिया हा देश मुख्यतः शेती प्रधान देश आहे आणि खरा खुरा शेती प्रधान आहे, इथे धान्य अजिबात आणू देत नाहीत , येताना सगळं डिकलेऱ करा माझं एक रेडी टू इट भाताचं बघून तो पोलीस सैरा वैरा पळत होता , डिक्लेर नाही केलंस म्हंटला , म्हंटल अरे हा भात आहे तांदूळ नाहीये (पोलिसाला विनोद बुद्धी नसावी ) टाकून दे म्हणालो तर त्याने ते केलंच पण मला नशिबाने फक्त warning वर सोडलं , नाहीतर ४००० $ वगैरे दंड घेतला असता म्हणे .... बापरे , आयुष्य भर खाल्लेल्या भाताची किंमत पण एवढी नसेल . 

तर तुम्ही जर ऑस्ट्रेलियाला येत असाल आणि एक कण , तीळ जरी आणलात तरी सांगून आणा, तीळ भिजायची वाट न बघता हि लोकं तुमची वाट लावतील .

खुळे आहेत , असो. तर आम्ही परत सिडनी एअरपोर्ट ला चार तास थांबून शिवनेरी इतकं मोठं विमान पकडून ऑरेंज ला आलो. सिडनी एअरपोर्ट ला मज्जा न्हवती. हा शेतकरी कामगार वर्ग आहे फार आर्ट वैगेरे दिसली नाही मला. खरा भारत पाहायचा असेल तर गावात जा असं कुणी माहात्म्या ने म्हंटल आहे म्हणे , तसं इथे काही नसावं , सगळंच शेतीवाटली मला. सिडनी छान आहे शहर , मस्त आहे पण लगेच शहर संपतं. लोकं रांगडी आहेत. अमेरिकन सारखी घाईत नाही जास्त आगाऊ नाही कि यूरोप सारखी फ्रेंडली नाहीत , यूरोपात अनोळखी पण तोंड भरून गुड मॉर्निंग करतो , अगदी साहेब सुद्धा , इथे मला अजून तरी कुणी गुड मॉर्निंग नाही केलंय (ऑफिसातले करतात ). ऑरेंज एअरपोर्ट गोड होता, दोन जणांनी बॅगा विमानातून काढल्या आणि छोट्या बेल्ट वर ठेवल्या , पोलीस नाही security नाही . पण आजूबाजूला हिरवळ खूप होती ...हा एक मुख्य राहीलच कि.  सिडनी ला एअरपोर्ट अगदी पाण्याच्या जवळ आहे म्हणजे उतरताना किव्हा टेक ऑफ ला उन्नीस बीस झालं कि समुद्र , ते भारी आहे एकदम , म्हणजे आजूबाजूला. फार गर्दी वर्दळ न्हवती आजूबाजूला पण. पण उतरताना पाणी दिसलं आणि एकदम लँडिंग ऑन लँड. 

हे थोडं मोठं गाव आहे , इथे दोन चार इंडियन रेस्टॉरंट आहेत , एक म्हणजे इंडियन म्हणजे पाकिस्तानी बांगलादेशी पण असू शकतात , पण हे इंडियन आहे म्हणाला सनी, कांगारू नाही दिसले वाटेत , एकदम गाडी समोर येतात म्हंटला , जरा सावध राहावं लागतं. पण एक जाणवलं कि खूप शेती आहे सगळी कडे का नुसतं रान आहे कुणास ठाऊक . आम्ही जेव्हा ६०० किलोमीटर फिरून आलो तेव्हा रस्त्यात मेलेले कांगारू खूप दिसले, आता पर्यंत , मी जीवंत कमी आणि मेलेले जास्त पाहिले, आपल्या कडे कुत्री येतात ना गाडी खाली? इथे कांगारू येतात )


पार्क्स त्या मनाने खूप छोटं आहे गाव , १५००० लोक संख्या पण एरिया बोरिवली एवढा असेल. तापमान खूप होतं , आठवड्यात ४२ वैगेरे गेलं , AIR BNB होतं पण एकच AC हॉल मध्ये बेड रूम मध्ये नाहीच , जाम हाल झाले चार दिवस , नशिबाने आम्हाला नंतर मोटेल मध्ये ठेवलं  (भारतीय आहे ). बरंय मोटेल, पण किचन नाहीये रोज बाहेरचं.

इथे खाणी खूप आहेत , खाणीत काम करायला लोकं येतात म्हणाला इथे. लोकं इथे मोटेल मध्ये रहातात आठवडा आणि जातात शनिवारी घरी. एकतर शेती नाहीतर खाण म्हणून हि लोकं अंगा पिंडाने भारी आहेत. इथे पार्क्स मध्ये फक्त एकच असा रस्ता आहे, टाउन सेंटर तिथेच आहे सगळं, अजून एक दोन ठिकाणी दुकानं आहेत म्हणा, पण मोठा हाच रस्ता , गाडी शिवाय काम नाही इथे आणि गाड्या मोठ्याला आहेत, असायलाच हव्या कारण थोडं तास भर जाऊन यायचं असेल तरी शे सौवाशे अंतर असतं. आम्हाला पण इथे आमच्या कस्टमर नि एक गाडी देऊन दिली आहे , ऑफिस ते मोटेल आणि दुपार सबवे किव्हा चाइनीस साठी गाडी, वाण सामान आणायला पण गाडीच. 

इथे पाकिस्तानी ख्रिश्चन माणसाचं हॉटेल आहे (restaurant) आणि एक कबाब वाला आहे (त्याचा फार चांगला अनुभव नाही आला , नन्तर सांगेन ) एक चायनीस ज्याला आपलं इंग्रजी येत नाही आणि एक थाई आहे, एक दोन पब आणि चार गाडीची, हे गणित नाही कळलं मला पण आहेत बाबा चार गाडीची दुकानं आणि चार चार एक पेट्रोल पम्प. अजून चांगलं जेवण नाही मिळालं इथे. सिडनी ला त्या दिवशी रस्तयात एका गाडी वर मगर आणि कांगारू पण होते (शिजवलेले) , मला ट्राय करायचं होतं पण एक व्हेज होता मुलगा आणि एक म्हणाला आमच्या धर्मात claws असलेले प्राणी allowed नाही. राहून गेलं खायचं, वरण भात रोज खातो कांगारू वैगेरे खाऊन मागायला हवा मग ऑस्ट्रेलियात येऊन गेलो हे सांगता येईल ना. 

बाकी गाव गावासारखं आहे, इथे सगळेच इंग्रजी बोलतात म्हणून तो फरक नाही पण ह्यांना पण शहर आवडत नाही आणि गर्दी वगैरे ... भाषा सोडली तर आपल्या सारखंच . इथे फक्त एक आहे कि mcdonald अंडी KFC  subway सगळीकडे आहे आणि हि लोक सेम खातात अन्न , आपण फार व्हरायटी खातो त्या मुळे इथे अन्नाचा भेद भाव नाहीये.


पुढे इचुका नावाच्या ठिकाण्याची आणि ऑरेंज  नावाच्या जागी गेलो त्याची गम्मत सांगतो. (कांगारू वगैरे खल्ला तरी सांगेन ).













 

Thursday, February 5, 2026

Australia 1


ऑस्ट्रेलिया -

 टेक्निकली माझे सगळे खंड फिरून  झालेत , नॉर्थ अँड साऊथ अमेरिका असे दोनहि , यूरोप पण झालाय आशियात आपण राहतो, अगदी लहान  असताना आफ्रिकेट जाऊन आलोय (लहान सहान पण आठवण नाहीये) आणि आता शेवटी ऑस्ट्रेलिया... तरी अजून मला आफ्रिका नीट पाहायची आहे आणि आशिया मध्ये किमान मलेशिया पर्यंत तरी जाऊन यायचंय, असो किती झालं तरी माणसाला अजून हवंच असतं.

तर ऑस्ट्रेलिया - भौगोलीक  दृष्ट्या जरी हा देश अमेरिके सारखा दिसला तरी हा मनाने यूरोप सारखा आहे, म्हणजे अमेरिकन नाही पण धड यूरोप सुद्धा नाही. खूप मोठा आहे खूप मोठा खूपच मोठा आहे. आम्ही शनिवारी एक ६०० किलोमीटर (अमेरिकेत माईल म्हणतात ) गेलो , तर १३० किलोमीटर सरळ रस्ता मग एक गाव तिकडे एक वळण मग परत १०६ किलोमीटर सरळ रस्ता ... पण हायवे सिंगल लेन अमेरिके सारखं सुसाट आणि मोठ्याला हायवे नाही . सगळं आकाश दिसतं नजर जाईल तोवर शेत जमीन डोंगर नाही सपाट  सगळं सपाट नो घाट , वेग ११०, जास्त नाही (गुगल मॅप्स  वर सगळं नीळ अजिबात लाल नाही कि नारंगी नाही, ६०० किलोमीटर नो ट्राफिक म्हणजे विचार करा काय असेल दृश्य, मी बाहेरचं दृश्य सोडून सारखा मॅप बघत होतो)


आमचं विमान सिडनीला   उतरलं , भारत सोडला कि सगळंच स्वच्छ असतं , तसंच होतं , देश बेताचा श्रीमंत आहे, म्हणजे बघा तुम्ही जर्मनी किव्हा झुरिकला उतरलात कि एकदम रिच वाटतं सगळं, US ला पण तसंच जाणवतं बऱ्याच एअरपोर्ट वर , पण सिडनी त्या पेक्षा कमी वाटली श्रीमंतीत पण आपल्या पेक्षा किव्हा मेक्सिको पेक्षा बऱ्या पैकी श्रीमंत. मला वाटलं मोठं आहे शहर म्हणजे एअरपोर्ट पण मोठा असेल, तर अगदीच लहान निघाला. हि लोकं मात्र सहा फूट - लांबीने आणि रुंदीने पण. 

टॅक्सी वाला आशियातला होता, अजून मला एक पण गोरा किव्हा लोकल टॅक्सी वाला इथे किव्हा अमेरिकेत काय लंडन ला तरी दिसला नाहीये (म्हणजे आपण मुंबईकर श्रीमंत आहोत हे लक्षात घ्या , कारण इथे सगळे बाहेरचेच असतात उबर वाले). हॉटेलात बॅगा टाकून (आणि अंघोळ करून) आम्ही सिडनी मध्ये लिट्ल इंडिया ला जेवायला गेलो. आमच्या हापिसातला एक जपान ला असतो त्याला इंडियन फूडच कौतुक आहे , मला बाहेर गेलं कि नसतं कौतुक, एक तर ते नावाला इंडियन असतं बाकी  सगळं गम्मत जम्मत. आहो पण सांगायचं म्हणजे जेवढे foreigners मुंबईत दिसतात तेव्हडेच तिथे होते बाकी सगळे आपली माणसं (जेवण बरं होतं ) हॉटेल पंजाबी जिलबी खाल्ली तो पंजाबी गुजराती पान वाला आणि एक दुकानदार गुजराती (इंग्लिश पण अगदी गुजरात मधलंच). फक्त एक मोठा फरक म्हणजे .... अगदी बरोबर ...... स्वछता.

जाता येता उबर वाला चाइनीस होता अबोल होता , भारतीय किव्हा पाकिस्तानी असले कि खूप बोलतात (दोघां मधला फरक सांगितल्या शिवाय सांगता येत नाही ). 

नशिबाने रात्री फार जेट ल्याग नाही जाणवला, ५:३० तास पुढे आहे सिडनी पर्थ अडीच तास. हॉटेलात अमेरिकन बेकफास्ट होता , इथे आलो कि दोन चार वर्षाचा मैदा पोटात साठवून जातो मी नेहमी (काय ते कौतुक मैद्याचं नाही कळलं मला ).

सिडनी मोठं शहर आहे (राजधानी कॅनबेरा आहे ) मोजकी दोन तीन मोठी शहरं आहेत त्यात बऱ्यापैकी असलेलं शहर म्हणजे सिडनी.  इथे ऑपेरा हाऊस आणि हारबर ब्रिज फेमस आहेत. सकाळी पंजाबी माणसाची उबर करून आम्ही त्या ऑपेरा हौस ला पोचलो. ऑस्ट्रेलियन डे पण २६ जानेवारी ला असतो त्या मुळे तिथे वर्दळ होती, पोलीस होते छान होतं वातावरण जल्लोष वगैरे न्हवता पण फेस्टिव्ह होतं अजिबात ढणा ढणा म्युझिक नाही काही नाही. शांत होतं सगळं पण रैलचैल होती.

ऑपेरा हाऊस फोटोत दिसतो तितका पांढरा शुभ्र नाहीये, त्यावर दिवे लावून रंग उतरला आहे म्हणतात. जगातली सगळी मोठी शहरं समुद्र किनारी आहेत अमेरिकेतली दोन , लंडन , मुंबई आणि बरेच तसंच सिडनी. इथे पॅसिफिक समुद्र आहे , पाणी तसंच दिसतं म्हणा. छान आहे परिसर खूप बोटी वगैरे दिसतात , शेजारी मोठं गार्डन आहे , लोकं धावत वैगेरे होती. सहज आठवलं म्हणून सांगतो , आम्ही आयफेल टॉवर पाहायला जात असताना लोकं तिथे जॉगिंग करत होती, तसंच काहीसं वाटलं , मोठी आहे वास्तू हि पण सुंदर आहे gaudy नाहीये, तिथून आजूबाजूला दृश्य पण छान आहे, समोर तो ब्रिज दिसतो हारबर ब्रिज, मोठा लोखंडी आहे त्यावर ट्रेन पण जाते गाडी पण आणि माणसांना वर जाण्याकरता एक टूर आहे, खालून वर जाऊन यायचं असतं ४०० मीटर आहे चढाई , आम्ही नाही गेलो, ३५०$ वगैरे आहे आणि वेळ पण खूप जातो, आमच्या कडे २ तास होते फक्त .

मी फार  त्यांच्या स्वछ्तेचं  कौतुक करतो म्हणा  , पण त्या ऑपेरा हौस च्या शेजारी समुद्र इतका साफ आहे कि, तिथून तळ दिसतो, आता बोला ? म्हणजे हे शक्य आहे. 

आम्ही मग नुसतं फिरलो आजूबाजूला त्या टुरिस्ट बस मध्ये छ्क्कर मारली छोटी छान ट्राम पहिली कॉफी प्यायलो. त्या दिवशी छोटी जत्रा होती तिथे रस्त्या वर लोकं काय काय विकत होते एक माणूस saxaphone वाजवत होता , मस्त प्रसन्न होतं वरण. त्या दिवशी एअर फोर्स ची मोठ्या आवाजाची विमानं उडत होती , भारतात नाही पाहिलं कधी मी , पण तिथे पाहायला मिळाली.

तिथून हॉटेल ला येताना एक वयस्कर चायनीज उबर वाला भेटला  इंग्लिश चांगलं होतं, हाँग काँग का? आमच्यातल्या एका ने विचारलं , नाही म्हंटला साऊथ आफ्रिका ... आमचं आश्चर्य खूप बोलकं होतं , हास हसत म्हणाला , माझी मुलगी असते चार वर्षां पूर्वी नातवंड सांभाळायला आलो .... जग भर जावा बाप तो बाप असतो आणि नातवंडांची जवाबदारी चायनीस असो का भारतीय अमेरिका असो का आफ्रिका का ऑस्ट्रेलिया ....बरोबर ना? कौतूक ह्या करता कि ७० ओलांडलेला म्हातारा नुसता घरी न बसता अजून मुलीच्या पैश्यां वर अवलंबून न्हवता , कष्टकरी काम करी वर्ग.

आम्ही सिडनी वरून निघून पार्कस नावाच्या गावी जायला निघालो ... ऑस्टेलियन गावा बद्दल लिहेन पुढे.






सागर 

फेब्रुवारी २०२६