Sunday, January 15, 2023

स्पिती - हिमाचल 5

 स्पिती - हिमाचल  ५

आमचा पुढचा टप्पा धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) , धनकर ला इथल्या (एकेकाळच्या)राजाचा महाल आहे एकदम डोंगरात दुर्गम भागात , म्हणजे इतक्या वर्षा पूर्वी माणसं इथे का आली असतील? आणि इथे का राहिली असतील हा मोठा प्रश्न आहे, इथे फार युद्ध वगैरे झाले असतील असं वाटत नाही (असली तरी कुणी इतिहासात ते मांडलं नाहीये ), इतक्या लांब येई पर्यंतच शत्रू दमून जाईल. पण एक नवल म्हणजे इतक्या उंचीवर कसं काय बांधलं असेल हे बघूनच जाणे. धनकर तलाव चा छोटा ट्रेक आहे इथे आणि ह्या ठिकाणी पण शाळा आहे ते मला फार आवडतं. मला शाळा दिसली कि आनंद होतो फार, अज्ञान दूर करण्या साठी दुसरी जागा नाही (whatsapp सोडून म्हणा ).   इथे TV आला आहे इंटरनेट आहे म्हणजे जे आपल्याला दिसतं ते ही लोकं सुद्धा बघतात. बदल होतोय हळू हळू ... हे सांगायला नको कि इथे पण monastery आहे. एक मला प्रश्न पडला इथे , हि लोकं आपल्या (बेकार) serials शी कसं relate करत असतील गाड्या , बंगला , दाग दागिने , झालंच तर छळ कपट भडक मेक अप , एवढी लोकं समुद्र वगैरे , उंच बिल्डिंगा ...  

धनकर जमिनी सपाटी पासून साधारण १२००० फूट वगैरे असेल आणि तिथे थोडं अजून वरती पाण्याने भरलेला तलाव आहे (कसं काय म्हणजे काय आहे हे, इथे वरती कोण भरतय पाणी ?? ).   आम्ही काही तो ट्रेक नाही केला पण खूप लोकं वर जाऊन येतात. इथे oxygen असं पण कमी आहे आणि वेळ तापता सूर्य (जितकं वर चढतो तितकं आपण सूर्या जवळ जाणार ना आपण). आम्ही सरळ गाडीत बसलो आणि पूढे पिन व्हिलेज मार्गे मूद गावा पर्यंत गेलो. 

मूद नावाचं गाव अतिशय दुर्गम आहे. इथे दिवसातून फक्त एकच बस येते (थंडीत तीही नाही ) संध्याकाळी ६च्या सुमारास आणि सकाळी सात ला निघते , एक बस सुटली कि थेट २४ तास थांबा ओला उबर सोडाच दुसरं कोणतंच वहान नाही, म्हणजे टुरिस्ट आहेतच पण बाकी काही नाही. इथून ना दोन मोठे ट्रेक्स आहेत पिन पार्बती आणि पिन बाबा पास , साधारण ८ ते १० दिवसांचा थोडा खडतर ट्रेक आहे ... म्हणजे माझ्या करता अशक्य ... दहा दिवस बर्फात आणि १५००० फुटांच्या वर (अंघोळ नाही काही नाही, परत whole वावर इस आवर म्हणजे जडच) काय काय कष्ट सहन करावे लागतील कुणास ठाऊक. मला जड आहे पण तुम्हाला हवं तर नक्की करा सगळा हिमालय तो. मी (लांबून का असेना) हिमालयाच्या प्रेमात आहे , अजस्त्र अति विशाल खूप गूढ कधी मोहक सुंदर कधी भीतीदायक ... आजवर इतक्या लोकांनी आपला जीव त्या हिमालयाच्या पायथ्याशी का गमावला हे सांगणं फार कठीण नाही. 

मूद मध्ये आम्हाला खूप फिरंगी दिसले, म्हणजे फिरंगीच दिसले ती लोक महिनोन महिने तिथे आहेत राहतात कारण तेव्हा नाही कळलं कारण असं गाव तर शंभर मीटर मध्ये संपतं (शाळा आहे बरं का ) मग का हि लोक इथे आहेत , रात्री लाईट पण गेली सकाळी पाणी पण थंड अंघोळ काय करणार (तिथे एक हनिमून कपल आलं होत, दया आली मला ... ). हि लोक इथे का ? इथे तर अफू गांजा पण नाही ... मग जेव्हा मुबंईत परत आलो तेव्हा शोधलं आणि कळलं कि इथे १८६० च्या आसपास एक शोध लागला, हिमालयाच्या दगडाचा rock formation. हि जागा geologists ना फार प्रिय आहे. काय काय सनशोधन करतात.    

आम्हाला इथे एक इटालियन माणूस भेटला तो कुठून तरी ट्रेक करून आला होता चार - सहा महिने इथेच असतो , भारत फार आवडतो म्हणाला , ज्या जागेवर आम्ही होतो तिथे नेटवर्क पण न्हवतं, मॅप्स काय चालणार? छापील घेऊन फिरतो म्हणाला, बत्तात्रेय केव्हाच गेली होती. एक दिवस गुहेत राहिला, आता इथून पण कुठे तरी जाणार म्हणाला. किती धीट असेल, काय कोरडं अन्न घेऊन फिरतोय तेच बाकी भाषा पण धड येत नाही आपली नवल आहे ह्या लोकांचं , उगाच जग भर राज्य नाही केलं ह्या युरोपियन नि.  

सकाळी थोडा नाश्ता करून आम्ही निघालो आणि  काझा ला साधारण ११ पर्यंत पोचलो . आमच्या हॉटेलच्या समोर ITBP चं स्थळ होतं त्यात बायका सुद्धा होत्या. ITBP म्हणजे Indo-Tibetian Border Police , खूप जोखमीच काम असणारे एक तर कायम थंडी किव्हा अति थंडी त्यात त्या चिनी लोकांशी सारखा सामना . आपल्याला इथे मुंबईत फक्त खड्डे किव्हा घाण किव्हा ट्रॅफिक फार तर थोडं राजकारण हेच विषय त्रास दायक ठरतात (पाऊस आपलाच आहे म्हणून त्याचा उल्लेख टाळला). पण ह्या लोकांचे challenges वेगळ्याच आहेत, हिमालया सारख्या मोठ्या पण त्यांना त्याचं काहीच नाहीये. 

काझाला तर फार म्हणजे फार उन्ह,  गरगर लच  , तो स्वेटर पण मी कम्बरेला बांधला (मग तो कुठे हरवला मग नन्तर परत जाऊन सापडला, मला ओळखणाऱ्या लोकांना ह्यात नवल वाटलं नसेल) आणि त्या मार्केट ला फिरलो.एक सांगायचं म्हणजे  काल्पा नन्तर थेट इथेच पेट्रोल पम्प लागतं अधे मध्ये नाहीच कुठे (वाहन मात्र खूप दिसली). तुम्हाला म्हंटलो ना सगळंच अजिब आहे. आम्ही तिथे हाटेलात थुपका खाल्लं मस्त, लोकल डिश. गम्मत म्हणजे मेनू मध्ये थालीपीठ पण होतं , हि लोकं खरी चांगली, आपल्या हाटेलात छोले पनीर चायनीज मिळतं पण थालीपीठ खायला पायपीट करावी लागते, इथे समोर थालीपीठ. आम्ही नाही खाल्लं म्हणा पण सांगतो आपलं. त्या मार्केट मध्ये मी दोन चार गोष्टी घेतल्या, लोकल माणसाला मदत (तो नेपाळी निघाला ) म्हणून. संध्याकाळी आम्ही ते जगातलं सगळ्यात उंचिवाल पोस्ट ऑफिस पाहिलं सगळ्यात उंच गाव उंच कार जाऊ शकते तो रस्ता   वगैरे वगैरे सगळं पाहिलं मग परत बुद्धा ची मूर्ती वगैरे वगैरे सगळं .  

काझाला मात्र मी फार दमलो रात्री नाक बंद झालं झोप नाही मला घराचे वेध लागले खरं तर , खरं तर हॉटेल छान होतं थंडी न्हवती जेवण उत्तम. सकाळ पाहतोय कि नाही असं झालं (पहिली एकदाची). उन्ह बाधलं मला फार , दुपारी तास भर पायपीट केली आणि नन्तर फिरलो पण .. डाइरेक्ट सूर्य प्रकाशाची सवय नाही मध्ये pollution नाही काही नाही निरभ्र आकाश ... पण झालो बाबा नीट . 

परत ते मोनास्टरी पाहून आम्ही चंद्रताल लेक ला गेलो .. चंद्रताल म्हणजे जिथून पांडव (धर्म राजच खरं तर ) डायरेक्ट स्वर्गात गेले ती जागा... 








No comments: