आमचा पुढचा चेरापुंजी ला होता असेच खूप तास वाटेत काही गुहा लागणार होत्या आणि मग एक मोठा धबधबा आणि नन्तर तो रूट ब्रिज आणि भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव आणि पारदर्शक नदी ... आणि हे पाहायला आमची बस त्या रस्त्या वरून धूम निघाली ...
मेघालय मध्ये खासी आणि जारो ह्या मातृभाषा आहेत आणि असतील तर मला आता आठवत नाही, पण तिकडली लोकल लोकं आमच्या भाषा हि भाषा बोलतो असं म्हंटले, आपल्याला काहीच कळत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही असामी तरी बंगाली सारखी आहे त्या मुळे ती थोडी उमगते. त्या मुळे इथे नाव खूप विचित्र आहेत असं जाणवलं . नीट उचारता हि येत नाहीत. थोडं फार तुटक मुटकं इंग्रजी बोलतात (हिंदी वर राग आहे ते नन्तर सांगतो).
मेघालय राज्य सगळं घाट रस्त्याचं आहे , बहुतेक वेडी वाकडी वळणं आणि रस्ता सगळा छोटा आहे. मोठ्याला हाई वे नाहीच म्हणा. आम्ही शिलॉंगला फक्त तो धबधबा पहिला आणि निघालो वाटेत दोन चार गोष्टी पाहणार होतो पण त्या ड्रायव्हर ने आम्हाला पटवून दिलं कि आता त्या स्पॉट ला काही नाही आणि तुमचा अजून एक स्पॉट राहून जाईल तो जास्त छान आहे (पटलं आम्हाला). वाटेत एक मोठी दरी लागली खूप खोल , खोलच खोल , Dympep Valley असं नाव होतं मला उंचीची भीती आहे एकूणच म्हणून मी दुरून ती दरी पहिली. टुरिस्ट स्पॉट होता तो, तिथे मॅगी चे ऑम्लेट चे स्टॉल होते, दरी च्या शेजारी, लोकांना दरीत कमी आणि मॅगीत जास्त इंटरेस्ट दिसला. छान हिरवी गार होती दरी आणि खाली ते सगळे जीव घेणे स्पोर्ट्स पण होते, मी दोन चार फोटो काढून (मॅगी ऑम्लेट काहीही न खाता निघालो.
शिलॉंग ला सुद्धा त्या हॉटेलात चहा न्हवते देत हॉटेल थोडं गाव बाहेर होतं म्हणून टपरी पण न्हवती आजूबाजूला , तो खानसाम्या म्हणाला नाष्टा और चाय एक साथ देता है, काय तरी वेड्या सारखं, चहा दे म्हणालो मग नाश्ता दे नाहीतर मी हिंस्त्र होतो चहा नाही मिळाला कि , ऑम्लेट आणि आलू पराठाच दिला म्हणा .
सगळं स्वच्छ आणि कचरापेटी पण बांबूची |
गर्द झाडी |
आम्ही तिथून मग एक वॉटरफॉल बघायला निघालो नोहाकालीकाय का असं कायतरी नाव होतं , ११०० फूट इतका उंच धबधबा आहे असं म्हणाला ड्राइवर पण आम्हाला नॉशिनगीठीयान्ग ह्या अश्या किचकट नावाच्या ठिकाणी घेऊन गेला.
गुहा, त्यात दिवे लावले आहेत |
नॉशिनगीठीयान्ग मध्ये धबधबा छोटा झाला होता, हल्ली चेरापुंजी ला पण पाऊस कमी पडतो, आधी वर्ष भर पडायचा आता तसं होत नाही, त्या मुळे दरी मोठी असली तरी पाण्याची धार लहान होती, पण पाऊस असल्यावर बघायला नक्कीच भारी वाटत असेल.
आमचा मुक्काम होता त्या ठिकाणी कारण दुसऱ्या दिवशी लवकर आम्हाला "नोंग्रीयात ट्रेक" ला जायचं होतं ते वर्ल्ड फेमस रूट ब्रिज वालं ठिकाण. तिथल्या स्थानिक लोकांनी झाडांच्या मुळा पासून ब्रिज बांधला आहे त्याला शे दोनशे वर्ष लागली असणारे आणि जितका जुना होत जातो तितकाच तो मजबूत होत जातो. तो बघायला साधारण ५००० हजार पायऱ्या वगैरे जायच्या होत्या.
ड्रॉयव्हर खूप टाइम पास करत आम्हाला हॉटेल ला घेऊन गेला. मी डबल शेरिंग ला होतो , माझ्या बरोबरचा मुलगा २६ एक वर्षांचा असेल. अजिबात सोइ नसलेलं हॉटेल होतं ते पाणी मागितलं तर म्हणाले घेऊन या जाऊन आणि जवळ पास काही नाही , सगळी दुकानं अगदी हॉटेल पण सहा ला बंद फार तर सात. माझ्या वयाची पंजाबी बाई होती , पूर्वा नाव तिचं ती तर खूप चिडली, कारण तिची स्पेशल म्हणून दिलेली रूम तर अंडा सेल सारखी होती नुसती एक खाट आणि भिंत , तशी सधन घरातली आहे ती. ती ड्राइव्हर ला घेऊन गावात गेली अब हाटेल शोधून आली अडीच हजार रेट होता पण चांगलंय म्हणाली , कल सुबह जल्दी निकलना है , खरं होतं. न खाता पिता कसं जायचं आणि चहा पण नाही मिळणार हे कळल्यावर मी जरा गडबडलो, चहा सोडा पाणी पण नाही हो देत ती लोकं . एक विचित्र वास येत होता , ते डास मारतात तो फवारा मारला होता सगळी कडे , माझ्या रूम मेट नि मला कन्व्हिन्स केलं कि आपण वाटून घेऊ आणि शिफ्ट होऊ, मी पण जाऊन बुक केली रूम आणि हे पालटलं गडी. पण मी घेतली तरी एकट्याने (एक बार कमिट करदिया तो में ... ) आणि सगळ्यात उत्तम निर्णय होता तो . तिथे आम्हाला छान जेवण (चहा ), सकाळी ब्रेक फास्ट बांधून , मोठ्या स्वच्छ खोल्या , आत गरम पाण्याची पिशवी (ती का लागेल ते मला नंतर समजलं ) हवं तेवढं पाणी आणि प्रसन्न होतं सगळं.
खूप गमतीची गोष्ट म्हणजे इथे रविवारी दारू विक्री बंद असते म्हणजे दुकानं बंद असतात दर रविवारी ...
तिकडे मॅनेजर होता एक जॉन्सन नावाचा त्याला हिंदी पण बोलता येत होतं आणि इंग्रजी सुद्धा उत्तम होतं , त्याने आम्हाला सगळी छान माहिती दिली, सकाळी लवकर जा म्हणाला म्हणजे दुपारी त्रास होणार नाही येताना . दोन ब्रिज आहेत म्हणाला एक अगदीच लगेच आहे तो जास्त छान आहे आणि तो जाताना करा येताना त्राण नसेल २०० पावलं चालायचा , दुसरा आहे ब्रिज तो साधा आहे आणि तिसरं म्हणजे रेनबो फॉल्स पर्यंत जाऊन या ते तेवढंच पुढे आहे पण खूप अप्रतिम आहे. परिसर खूप छान आहे. ड्रायव्हर आणि गाडी दिली तिथे गाईड चा नम्बर दिला आणि ड्रायव्हर ला सांगितलं कि तू गाईड ला फोन करून भेट करून दे आणि मग जा. सकाळी आम्हाला त्याने उकडलेली अंडी दोन सँडविच एक केळ बांधून दिलं.
सकाळी सात साडे सात ला आम्ही हॉटेल हुन त्या नोंग्रीयात ला पोचलो , सडसडीत बांध्याचा एक माणूस आम्हाला गाईड म्हणून दिला होता, त्याचं घर तिथेच होतं , फार तर शे दीडशे लोकांची वस्ती असेल . साधारण ५ ते ६ किलोमीटर चा प्रवास असेल आणि त्यात ह्या हजारो पायऱ्या. आम्ही त्या पायऱ्या उतरलो आणि पहिल्या ब्रिज जवळ गेलो , नदीच्या वरती आहे तो, पाणी कमी होतं पण कमाल आहे हि लोकं निसर्गाशी किती एकरूप होऊन जगतात (आता मोबाईल ने अतिक्रमण केलंय म्हणा). काय सुंदर होतं सगळं. निरव शांतता होती खूप पक्ष्यांचे आवाज थोडं पाणी वाहत होतं निरभ्र आकाश सकाळची कोवळी उन्ह गर्द झाडी ... १००% ऑक्सिजन . तो ब्रिज पाहून (आणि मनोमन जॉन्सन चे आभार मानून )आम्ही परत दुसरा मोठा ब्रिज पाहायला निघालो, वाटेत अनेक वेळा पायऱ्या लागतात आणि रस्ता पण पाय वाटीचाच आहे. लहान मुलं आणि मुली अधिक , शाळेला चालले होते आणि त्यांचे आई बाप आजोबा त्या पोरांना गडबडीने सोडायला जात होते, आमच्या गाईड (लूमलांग) ला मी विचारलं कि शाळा कुठे? तो म्हणाला वरती में रस्त्याला . म्हणजे हि लोकं रोज हजारो पायऱ्या चढून आणि उतरून जातात आणि पाऊस पडला (जो नेहमीच पडतो)तर त्यात ह्या अश्या पायऱ्या वरून ये जा ... धन्य आहे म्हणालो. ती लहान पोर पोरी लहान पोर पोरीनं सारखेच हसत बागडत जात होती , सगळं गाव सडसडीत . आणि अजून आत आत पण गावं आहेत म्हणाला थेट पर्यंत आणि मध्ये मध्ये डोंगर दर्यात पण लोकं राहतात , ती लोकं वेगळ्या रस्त्या ने ये जा करतात. अजून किती रस्ते आणि गावं होती कोण जाणे? काही गावं आम्ही टुरिस्ट लोकांना दाखवत नाही म्हणाला . लोकं खूप घाण करतात. लाज वाटली मला आपल्या लोकांची.
आम्ही सकाळी आठला तो ब्रिज पाहून पूढे जात असताना एक फिरंग बाई आणि बुआ दिसले आम्हाला येताना . ती बाई पण गाईड आहे असं लूमलंग म्हणाला , म्हणजे ती लोक पहाटे चार ला वगैरे निघाले असणारेत अंधारात ह्या जंगलात. काय साहसी असेल ती बाई आणि बुवा पण, त्याला संध्याकाळचं flight होतं म्हणून सकाळी ९ पर्यंत निघायचं होतं म्हणून हा अट्टहास. ह्या पेक्षा अजब म्हणजे आम्ही अडीच ला परत येत असताना ती बाई आम्हाला अर्ध्या वाटेत परत कुणाला तरी घेऊन जाताना दिसली ... पायच धरणार होतो मी पण वाकायची ताकत न्हवती माझ्यात .
दोन एक किलोमीटर उबडखाबड रस्त्यावरून गेल्यावर आम्हाला तो वर्ल्ड फेमस फोटोत दिसणारा ब्रिज दिसला खाली थोडं पाणी वाहतं आणि शेजारी दोन दुकानं आहेत नाश्ता पाणी , आम्ही थोडं खाल्लं त्यांना पण दोन पैसे मिळू देत म्हंटल , लूमलांग चे ओळखी चे होते (असणारच )त्याला पण बरं वाटलं. तिथून अजून खूप अंतर जायचं होतं आम्हाला ते रेनबो फॉल्स बघायला. पूर्वा ला विचारलं त्याने कि जाऊया का थोडं कठीण आहे, जाऊ म्हंटली , फार तर तुला चार लोकानां बोलवावं लागेल मी अडकली तर . गेली पन्नास वर्ष कथक करते ती, त्या मुळे पायाची चामडी नाजूक झाली असते म्हणाली आणि रोज नाच शिकवते, पण म्हणून जमलं तिला सगळं जाऊन यायला. येताना त्याच ठिकाणी थांबून मॅगी खाल्ली मी आणि बांधून आणलेलं अंड एक अगदी उपाशी असलेल्या कुत्री ला दिली. तिथें एक मांजर पण होती छोटी होती अगदी पिल्लू पण कसली दांडगट होती , माणूस आला कि कुत्रा मांजरी आल्याच हो.
No comments:
Post a Comment