Saturday, November 16, 2024

आसाम - मेघालय - 2

 आमचा पुढचा चेरापुंजी ला होता असेच खूप तास वाटेत काही गुहा लागणार होत्या आणि मग एक मोठा धबधबा आणि नन्तर तो रूट ब्रिज आणि भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव आणि पारदर्शक नदी ... आणि हे पाहायला आमची बस त्या रस्त्या वरून धूम निघाली ... 

मेघालय मध्ये खासी आणि जारो ह्या मातृभाषा आहेत आणि असतील तर मला आता आठवत नाही, पण तिकडली लोकल लोकं आमच्या भाषा हि भाषा बोलतो असं म्हंटले, आपल्याला काहीच कळत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही असामी तरी बंगाली सारखी आहे त्या मुळे ती थोडी उमगते. त्या मुळे इथे नाव खूप विचित्र आहेत असं जाणवलं . नीट उचारता हि येत नाहीत. थोडं फार तुटक मुटकं इंग्रजी बोलतात (हिंदी वर राग आहे ते  नन्तर सांगतो). 


मेघालय राज्य सगळं घाट रस्त्याचं आहे , बहुतेक वेडी वाकडी वळणं आणि रस्ता सगळा छोटा आहे. मोठ्याला हाई वे नाहीच म्हणा. आम्ही शिलॉंगला फक्त तो धबधबा पहिला आणि निघालो वाटेत दोन चार गोष्टी पाहणार होतो पण त्या ड्रायव्हर ने आम्हाला पटवून दिलं कि आता त्या स्पॉट ला काही नाही आणि तुमचा अजून एक स्पॉट राहून जाईल तो जास्त छान आहे (पटलं आम्हाला). वाटेत एक मोठी दरी लागली खूप खोल , खोलच खोल , Dympep Valley असं नाव होतं  मला उंचीची भीती आहे एकूणच म्हणून मी दुरून ती दरी पहिली. टुरिस्ट स्पॉट होता तो,  तिथे मॅगी चे ऑम्लेट चे स्टॉल होते, दरी च्या शेजारी, लोकांना दरीत  कमी आणि मॅगीत जास्त इंटरेस्ट दिसला. छान हिरवी गार होती दरी आणि खाली ते सगळे जीव घेणे स्पोर्ट्स पण होते, मी दोन चार फोटो काढून (मॅगी ऑम्लेट काहीही न खाता  निघालो. 

शिलॉंग ला सुद्धा त्या हॉटेलात चहा न्हवते देत  हॉटेल थोडं गाव बाहेर होतं म्हणून टपरी पण न्हवती  आजूबाजूला , तो खानसाम्या म्हणाला नाष्टा और चाय एक साथ देता है, काय  तरी वेड्या सारखं, चहा दे म्हणालो मग नाश्ता दे नाहीतर मी हिंस्त्र  होतो चहा नाही मिळाला कि , ऑम्लेट आणि आलू पराठाच  दिला म्हणा .


सगळं स्वच्छ आणि कचरापेटी पण बांबूची 

गर्द झाडी 
खूप सारा प्रवास करून आम्ही एक गुहा बघायला आलो, Arwah lumshynna Cave  असं एकदम कठीण नाव असलेल्या गुहा होत्या जास्त मोठी गुहा नाहीये असं वाटलं मला, पण मग कळलं कि लोकांना जाण्या करता एकच छोटी गुहा खुली केली आहे, बाकी सगळ्या बंद. कुणी केल्या असतील त्या? का नॅचरल आहेत? कोण राहत असेल? सगळं अजब आहे. आजूबाजूचा परिसर मात्र खूप छान हिरवा गार होता. मेघालय मध्ये एक जाणवलं म्हणजे इथे बाथरूम स्वच्छ आहेत सगळे आणि कुठे हि लोकांनी थुंकून वैगेरे नाही ठेवलं गुहा आहेत पण घाण वास नाही कुठे आणि आम्ही गेलो तेव्हा फार गर्दी पण न्हवती, गोंगाट नाही. 


आम्ही तिथून मग एक वॉटरफॉल बघायला निघालो नोहाकालीकाय का असं कायतरी नाव होतं , ११०० फूट इतका उंच धबधबा आहे असं म्हणाला ड्राइवर पण आम्हाला नॉशिनगीठीयान्ग ह्या अश्या किचकट नावाच्या ठिकाणी घेऊन गेला. 

गुहा, त्यात दिवे लावले आहेत 
वाटेत एक छानसं प्रसिद्ध व्हेज रेस्टॉरंट होतं पण आमच्यातला एक बंगाली मुलगा हटून बसला कि मला चिकन "चं " हवंय , मग दोघे म्हणले कि नॉनव्हेज असेल तर बेटर , एक जैन होती मुलगी पण तिचा नवरा बाहेर आला कि सगळं खायचा म्हणून त्यांना फार फरक न्हवता पडत, मी असं पण चिकन खात नाही दुसरी पंजाबी होती पण बऱ्या पैकी शाकाहारी होती आणि बाहेर व्हेज बरं वाली, तिनेच सुचवलं ते वर्ल्ड फेमस व्हेज  रेस्टॉरंट . पण ते बंगाली पेटलंच आणि लालफीत बांधून विद्रोहच केला . (तरी सकाळी चार आम्लेट आणि थांबलो तिथे अंडा मॅगी खाल्लं होतं), कुठे फार येत न्हवतं ते, गुहा पण नको म्हंटलं क्या देखना उसमे ? असं केलन... मग आम्ही त्या टुरिस्ट स्पॉट ला जाऊन डाळभात खाल्ला आणि त्या लोकांनी दोन चार नॉन व्हेज डीशेस घेतल्या आणि किती बेकार होतं म्हणून आता रात्री मात्र छान चिकन खाऊ म्हणाले. माझ्याच पोटात गोळा आला. हे अनोळखी  लोकांना घेऊन जाण्याचं जोखीम वाटलं मला, बाहेर गेल्यावर माझा भर पाय चालवण्यात जास्त असतो पोट नाही . थोडं लोकल खातो म्हणा पण बघणं जास्त पसंद करतो, पण असेही अनुभव मोलाचे . त्या जैन मुलीचं एकदा खूप पोट बिघडलं , पनीर खाल्लं तिने चेरापुंजी ला कुठे तरी, त्यावर ताक . उगीच कुठे हि काहीही खाऊ नये माणसाने ... 

नॉशिनगीठीयान्ग मध्ये धबधबा छोटा झाला होता, हल्ली चेरापुंजी ला पण पाऊस कमी पडतो, आधी वर्ष भर पडायचा आता तसं होत नाही, त्या मुळे दरी मोठी असली तरी पाण्याची धार लहान होती, पण पाऊस असल्यावर बघायला नक्कीच भारी वाटत असेल. 



तिथून निघून परत केले छोट्या गुहा आहेत तिथे आम्ही गेलो , हि रस्तयात होती,  म्हणजे गावात छोटी असली तरी इंटरेस्टिंग होती. दहा वीस वगैरे तिकीट असेल, पण तो तिकीट घेणारा खूप जास्त उद्धट होता उगाच खेकसत होता, त्याला फार टुरिस्ट लोकं पसंत न्हवती , मला एकूणच हि लोकं रुड वाटली आणि हिंदी नाही येत म्हणणारे , इंग्रजी ची बोंब. फार टुरिस्ट फ्रेंडली नाहीयेत हि लोकं किव्हा प्रोफेशनल नाहीयेत. 

आमचा मुक्काम होता त्या ठिकाणी कारण दुसऱ्या दिवशी लवकर आम्हाला "नोंग्रीयात ट्रेक" ला जायचं होतं ते वर्ल्ड फेमस रूट ब्रिज वालं ठिकाण. तिथल्या स्थानिक लोकांनी झाडांच्या मुळा पासून ब्रिज बांधला आहे त्याला शे दोनशे वर्ष लागली असणारे आणि जितका जुना होत जातो तितकाच तो मजबूत होत जातो.  तो बघायला साधारण ५००० हजार पायऱ्या वगैरे जायच्या होत्या. 

ड्रॉयव्हर खूप टाइम पास करत आम्हाला हॉटेल ला घेऊन गेला. मी डबल शेरिंग ला होतो , माझ्या बरोबरचा मुलगा २६ एक वर्षांचा असेल. अजिबात सोइ नसलेलं हॉटेल होतं ते पाणी मागितलं तर म्हणाले घेऊन या जाऊन आणि जवळ पास काही नाही , सगळी दुकानं अगदी हॉटेल पण सहा ला बंद फार तर सात. माझ्या वयाची पंजाबी बाई होती , पूर्वा नाव तिचं ती तर खूप चिडली, कारण तिची स्पेशल म्हणून दिलेली रूम तर अंडा सेल सारखी होती नुसती एक खाट आणि भिंत , तशी सधन घरातली आहे ती. ती ड्राइव्हर ला घेऊन गावात गेली अब हाटेल शोधून आली अडीच हजार रेट होता पण चांगलंय म्हणाली , कल सुबह जल्दी निकलना है , खरं होतं.  न खाता पिता कसं जायचं आणि चहा पण नाही मिळणार हे कळल्यावर मी जरा गडबडलो, चहा सोडा पाणी पण नाही हो देत ती लोकं . एक विचित्र वास येत होता , ते डास मारतात तो फवारा मारला होता सगळी कडे , माझ्या रूम मेट नि मला कन्व्हिन्स केलं कि आपण वाटून घेऊ आणि शिफ्ट होऊ, मी पण जाऊन बुक केली रूम आणि हे पालटलं गडी. पण मी घेतली तरी एकट्याने (एक बार कमिट करदिया तो में ...  ) आणि सगळ्यात उत्तम निर्णय होता तो . तिथे आम्हाला छान जेवण (चहा ), सकाळी ब्रेक फास्ट बांधून , मोठ्या स्वच्छ खोल्या , आत गरम पाण्याची पिशवी (ती का लागेल ते मला नंतर समजलं ) हवं तेवढं पाणी आणि प्रसन्न होतं सगळं. 

खूप गमतीची गोष्ट म्हणजे इथे रविवारी दारू विक्री बंद असते म्हणजे दुकानं बंद असतात दर रविवारी ... 

तिकडे  मॅनेजर होता एक जॉन्सन नावाचा त्याला हिंदी पण बोलता येत होतं आणि इंग्रजी सुद्धा उत्तम होतं , त्याने आम्हाला सगळी छान माहिती दिली, सकाळी लवकर जा म्हणाला म्हणजे दुपारी त्रास होणार नाही येताना . दोन ब्रिज आहेत म्हणाला एक अगदीच लगेच आहे तो जास्त छान आहे आणि तो जाताना करा येताना त्राण नसेल २०० पावलं चालायचा , दुसरा आहे ब्रिज तो साधा आहे आणि तिसरं म्हणजे रेनबो फॉल्स पर्यंत जाऊन या ते तेवढंच पुढे आहे पण खूप अप्रतिम आहे. परिसर खूप छान आहे. ड्रायव्हर आणि गाडी दिली तिथे गाईड चा नम्बर दिला आणि ड्रायव्हर ला सांगितलं कि तू गाईड ला फोन करून भेट करून दे आणि मग जा. सकाळी आम्हाला त्याने उकडलेली अंडी दोन सँडविच एक केळ बांधून दिलं. 





सकाळी सात साडे सात ला आम्ही हॉटेल हुन त्या नोंग्रीयात ला पोचलो , सडसडीत बांध्याचा एक माणूस आम्हाला गाईड म्हणून दिला होता, त्याचं घर तिथेच होतं , फार तर शे दीडशे लोकांची वस्ती असेल . साधारण ५ ते ६ किलोमीटर चा प्रवास असेल आणि त्यात ह्या हजारो पायऱ्या. आम्ही त्या पायऱ्या उतरलो आणि पहिल्या ब्रिज जवळ गेलो , नदीच्या वरती आहे तो, पाणी कमी होतं पण कमाल आहे हि लोकं निसर्गाशी किती एकरूप होऊन जगतात (आता मोबाईल ने अतिक्रमण केलंय म्हणा). काय सुंदर होतं सगळं.  निरव शांतता होती खूप पक्ष्यांचे आवाज थोडं पाणी वाहत होतं निरभ्र आकाश सकाळची कोवळी उन्ह गर्द झाडी ... १००% ऑक्सिजन . तो ब्रिज पाहून (आणि मनोमन जॉन्सन चे आभार मानून )आम्ही परत दुसरा मोठा ब्रिज पाहायला निघालो, वाटेत अनेक वेळा पायऱ्या लागतात आणि रस्ता पण पाय वाटीचाच आहे. लहान मुलं आणि मुली अधिक , शाळेला चालले होते आणि त्यांचे आई बाप आजोबा त्या पोरांना गडबडीने सोडायला जात होते, आमच्या गाईड (लूमलांग) ला मी विचारलं कि शाळा कुठे? तो म्हणाला वरती में रस्त्याला . म्हणजे हि लोकं रोज हजारो पायऱ्या चढून आणि उतरून जातात आणि पाऊस पडला (जो नेहमीच पडतो)तर त्यात ह्या अश्या पायऱ्या वरून ये जा ... धन्य आहे म्हणालो. ती लहान पोर पोरी लहान पोर पोरीनं सारखेच हसत बागडत जात होती , सगळं गाव सडसडीत . आणि अजून आत आत पण गावं आहेत म्हणाला थेट पर्यंत आणि मध्ये मध्ये डोंगर दर्यात पण लोकं राहतात , ती लोकं वेगळ्या रस्त्या ने ये जा करतात. अजून किती रस्ते आणि गावं होती कोण जाणे? काही गावं आम्ही टुरिस्ट लोकांना दाखवत नाही म्हणाला . लोकं खूप घाण करतात. लाज वाटली मला आपल्या लोकांची. 

आम्ही सकाळी आठला तो ब्रिज पाहून पूढे जात असताना एक फिरंग बाई आणि बुआ दिसले आम्हाला येताना . ती बाई पण गाईड आहे असं लूमलंग म्हणाला , म्हणजे ती लोक पहाटे चार ला वगैरे निघाले असणारेत अंधारात ह्या जंगलात. काय साहसी असेल ती बाई आणि बुवा पण,   त्याला संध्याकाळचं flight होतं म्हणून सकाळी ९ पर्यंत निघायचं होतं म्हणून हा अट्टहास. ह्या पेक्षा अजब म्हणजे आम्ही अडीच ला परत येत असताना ती बाई आम्हाला अर्ध्या वाटेत परत कुणाला तरी घेऊन जाताना दिसली ... पायच धरणार होतो मी पण वाकायची ताकत न्हवती माझ्यात .  


दोन एक किलोमीटर उबडखाबड रस्त्यावरून गेल्यावर आम्हाला तो वर्ल्ड फेमस फोटोत दिसणारा ब्रिज दिसला खाली थोडं पाणी वाहतं आणि शेजारी दोन दुकानं आहेत नाश्ता पाणी , आम्ही थोडं खाल्लं त्यांना पण दोन पैसे मिळू देत म्हंटल , लूमलांग चे ओळखी चे होते (असणारच )त्याला पण बरं वाटलं. तिथून अजून खूप अंतर जायचं होतं आम्हाला ते रेनबो फॉल्स बघायला. पूर्वा ला विचारलं त्याने कि जाऊया का थोडं कठीण आहे, जाऊ म्हंटली , फार तर तुला चार लोकानां बोलवावं लागेल मी अडकली तर . गेली पन्नास वर्ष कथक करते ती, त्या मुळे पायाची चामडी नाजूक झाली असते म्हणाली आणि रोज नाच शिकवते, पण म्हणून जमलं तिला सगळं जाऊन यायला. येताना त्याच ठिकाणी थांबून मॅगी खाल्ली मी आणि बांधून आणलेलं अंड एक अगदी उपाशी असलेल्या कुत्री ला दिली. तिथें एक मांजर पण होती छोटी होती अगदी पिल्लू पण कसली दांडगट होती , माणूस आला कि कुत्रा मांजरी आल्याच हो.  
पुढला प्रवास खूप सुंदर रस्त्यातून पण थोडा खडतर होता चिंचोळा रस्ता होता आणि एकी कडे थोडी दरी होती, पण झाडं होती खूप मध्ये म्हणून खालचं काही दिसत न्हवतं. लूमलांग पूर्वा बरोबर येत होता आणि मी थोडा पुढे पुढे जात होतो , मी फास्ट आहे म्हणून नाही खरं तर पण तो निसर्ग मला एकट्याला पाहायचा होता. वाटेत एक छोटं दुकान होतं तेच पॅकेजड फूड आणि मॅगी विकणारा. लगेच लूमलांग ने विडी ओढून घेतली. हि लोकं तंबाखू खात नसले तरी सिगारेटी फार ओढतात. तरी बऱ्यापैकी चढतात आणि उतरतात. 




खूप अंतर कापल्यानंतर मग तो रेनबो फॉल दिसला, अभूतपूर्व आहे निसर्ग तिथला आणि माही लवकर गेलो म्हणून कुणीच न्हवतं , उगम होता नदीचा किती तरी वेळ बसलो होतो आम्ही पाण्यात पाय टाकून एवढं गेलो ते सार्थक झालं. 



परतीचा प्रवास नेहमीच बिकट असतो. उन्ह पण वाढलं होतं सकाळीच निघालो होतो पण नशिबाने नीट आलो , येताना त्या हजारहून अधिक पायऱ्या होत्या त्या थोड्या त्रास दायक झाल्या खऱ्या पण निभावलं. वाटेत येताना लहान लहान मुली अननस विकत होत्या एकदम गोबरु  गोंडस. त्या ड्रायव्हर ला फोन केला आणि आलो परत आम्ही  . संध्याकाळी आम्ही ते जे व्हेज हॉटेल मिस केलं होतं ना? त्यात जेवलो इथे पण आहे ब्रांच देवा नाव आहे त्याचं एकदम पॉश आणि लै महाग आहे राहायला दहा हजार वैगेरे आहेत एका दिवसाचे जेवण महाग न्हवतं आणि बरं होतं. 


नन्तर चा प्रवास भारतातल्या सगळ्यात स्वच्छ अश्या गावाचा होता आणि पारदर्शक पाण्यातल्या होडीचा ... 
सांगतो हळू हळू पुढे . 













Tuesday, November 12, 2024

आसाम - मेघालय - 1

आसाम - मेघालय  - फेब २०२४

मी इतक्या वर्षात कधीही सोलो ट्रिप केली नाही ... म्हणजे बहुतेक सगळ्याच ट्रिपा सोलो होत्या पण एकट्यानेच केलेल्या,  असं कुणी अनोळखी माणसां बरोबर नाही. 

खूप confusion, ते आधी clear करतो. मी थोडा यूरोप फिरलोय, US  थोडा भटकलोय, नाही म्हणायला गयाना   मेक्सिको वगैरे आणि भारतात थोडं फार पाहून घेतलाय , पण ते बहुदा कामा निमित्त. वेळ काढून एकटाच, तसा सोलो,  पण  ... चला ट्रिप ला जाऊ,  असं नाही केलं कधी , म्हणून ह्या वेळेला असं ठरवून गेलो सोलो करूया म्हणून.  खरं तर मी भूतान करणार होतो, (खूप वर्ष मला करायचं आहे ते ) त्याच्या शोधात असताना एक  नॉर्थ ईस्ट ची दिसली मला माहिती, त्यांना विचारायला फोन केला भूतान तर त्याने मला हि आसाम वगैरे सांगितलं , मी भूतान ची पण माहिती घेतली पण काय माहित मी हि काझीरंगा - मेघालय टूर बुक केली. म्हणजे बघा तुम्हाला कधीतरी डेरिंग वाली गोष्ट करायची असेल , वरून पाण्यात उडी, किव्हा बंजी जम्पिंग किव्हा तत्सम काही,  खूप विचार केलात तर होत नाही ना ? तसं . मी दहा मिनटात फार विचार न करता पैसे भरून टाकले. 

thrilophilia नावाची एक कम्पनी आहे त्यांची आसाम - काझीरंगा - शिलॉंग - चेरापुंजी - मावलीनॉन्ग , अशी टूर मद्ये मी फार कुणाला ना विचारता उडी घेतली  (नाही म्हणायला एका मैत्रिणीशी बोलून बघितलं जुजबी कारण ती फार अश्या ट्रिपा करते, साफ उडवून लावलं तिने मला आणि जा काही होत नाही घाबरतो कशाला? असं म्हंटल्यावर मी कसा नाही म्हणणार ?. आशीर्वाद ते म्हंटल)

पहाटे ६ च्या विमानाने मी गुवाहाटी ला गेलो, म्हणजे अघोऱ्या वेळी उठून टॅक्सी पकडून जावं लागलं (तीन तास आधीच जाऊ म्हणून निघालो ते बरं केलं कारण  अडीच - तीन  ला पण मुंबई बिझी होती ).  सहा हे सांगितलं कारण साधारण सडे आठ - नवाला विमान  आसाम जवळ जात असताना मला हिमालय दिसला , मी खिडकीत न्हवतो पण तरी मान वाकडी करून बघितला .  खूप वेळ हिमालय दिसतो आणि सकाळ सकाळ सूर्यकिरण पडलेली असतात , लोक जीव टाकून टाकून का जातात हिमालय चढायला हे कळलं , विमानातून डोंगर दिसावा? हा असा इतका मोठा डोंगर? त्या दहा मिनिटाच्या विलोभनीय दृश्याने रात्री च जागरण प्रवास सगळं विसरायला लावलं, गेलात कधी कि अगदी आवर्जून पहा, खिडकी ची सीट घेऊन. (हिमालयाचं सकाळचं देखणं रूप,  रंगून सांगण्या इतपत  माझ्या कडे शब्द सामर्थ्य, अजून तरी नाही,)  माझ्या रांगेतला खिडकी वाला गाढ झोपला होता, देव देतो आणि कर्म नेतं त्यातला प्रकार. हे मला सगळ्या टूर मध्ये फार जाणवलं म्हणून मुद्दाम सांगितलं. 

टूर ला जाण्याआधी एक व्हाट्सअप ग्रुप केला होता, मीच एकटा मराठी होतो. अजून सात जण होती, आम्हाला फक्त ड्राइव्हर आणि गाडी दिली होती आणि एक ढोबळ आराखडा, बाकी तुमचं तुम्ही पाहा आणि या असा तो प्लान होता. माझं विमान वेळेवर पोचलं पण बाकीची विमान थोडी अडकली त्या मुळे दहा च्या ऐवजी आम्ही ३ ला निघालॊ आणि डायरेक्ट काझीरंगा रात्री १० ला गाठलं. दुपारी एका हॉटेलात व्हेज थाळी खाल्ली (बरं होतं जेवण). भात हवा तेवढा देतात बाकी बटाटा होता डाळ होती पण करण्याची पद्धत वेगळी होती, एकूण जेवणाचे आबाळ होणार नाहीत हे लक्षात आलं. इतरांनी चिकन वगैरे घेतलं, मी येताना मासा खाऊ म्हंटल, प्रवास सुरु होणार होता आपला डाळ भात बरा. 

तुम्ही कधी त्या भागात गेला असाल तर कळेल कि साडेचार पाच ला अंधार होतो, म्हणून आम्ही गाडीत बसलो आणि थोड्याच वेळात अंधार पडला, आम्हाला जायला तीन चार तास लागणार होते त्या मुळे बराच प्रवास अंधारात झाला, चहाला थांबलो म्हणा एकदा (चहा उत्तम मिळतो इथे) आणि पोचायच्या आधी जेवलो. रस्त्याची खूपकामं  सुरु होती त्या मुळे ट्राफिक पण लागला. भारतात कुठेही प्रवास करा साधारण तसंच दिसतं खिडकी बाहेर तशिच छोटी गावं , बाजारपेठ , छोटीखानी हॉटेल, लोकं , पुढार्यांचे पोस्टर्स .. अगदी तसंच होतं , पण हिरवं आहे सगळीकडे. काझीरंगा पोचायला उशीर झाला होता , शेवटचे कैक मैल जंगलचा रस्ता होता , मी आपला कुठे वाघ सिंह दिसतोय का बघत होतो, (नाही दिसला) त्या गर्द झाडीत. हॉटेल बरं होतं आणि आजूबाजूला थोडं थंड होतं , बारीक पंखा लावावा लागला तरी. 

सकाळी लवकर उठून आमही त्या  जन्गलात गेलो जीप सफारी ... एक सांगयचं म्हणजे हि लोकं उठून पटकन चहा देत नाहीत , मी शोधाशोध करत होतो मग त्या माणसाला म्हंटलं कि मला ते किचन दे उघडून मीच करून घेतो (साला सकाळी चहा नाही म्हणजे काय?). 

निसर्ग म्हणजे किती निसर्ग ?  सुंदर हिरवं होतं सगळं . नजर जाईल तिथे जंगल अनेक अनेक पक्षी दिसले खूप झाडं दिसलीत हत्ती, हरणं दिसलीत गेंडे पण खूप दिसले,  अगदी जवळून. एके ठिकाणी तर इतकी निरव शांतता होती कि त्या ड्राइव्हरला  मी म्हंटल कि पाच मिंट गाडी बंद कर मला शांतता ऐकायची आहे आपण एरवी नुसता गोंगाट ऐकतो शांतता पण खूप बोलते . एक छोटी नदी वाहत होती पक्ष्यांची किलबिल घन दाट जंगल ... इतक्या साऱ्या प्रवासाचं सार्थक झालं. खरं तर त्यात खूप समाधान होतं  तरी आम्ही म्हणालोच तो जरा वाघ- सिंह दिसला असता तर बरं झालं असत. तिथे एक हत्तीची सफारी पण आहे तो हत्ती तुम्हाला पायवाटेने आत जन्गलात घेऊन जातो आम्ही नाही केली ती, कधी गेलात तर आधीच बुक करून ठेवा आणि दोनदा जाऊन या जंगलात छान आहे. मला तिकडला एक माणूस म्हणाला कि खूप पाऊस लागला लागलं कि सगळे प्राणी जंगल सोडून रस्ता ओलांडून, पलीकडे डोंगरावर जातात , मग आम्हाला कळतं कि आता नदीला पूर येणार, जंगल बदच असतं म्हणा पावसात.  पण त्या प्राण्यांना अचूक समजतं कधी सोडायचं जंगल ते. माणसांनां काही करत नाही म्हणाला,  शांत पणे मनुष्य वस्तीतून जातात. (प्राणीच ते, उगाच त्रास दयायला माणूसआहे का तो?)आसाम ला तर गेंडे सगळी कडे दिसतात म्हणजे आपल्या कडे कसं गाई दिसतात तसे हे गेंडे आरामात फिरत असतात (अगदीच नसेल गाई सारखं पण सर्रास दिसतात). 

काझीरंगा ला एक बाग आहे छान फुलं आहेत,  छोटं museum आहे बांबू ची बाग आहे अनेक बांबू आहेत तिथे आणि एका स्टेज आहे ती लोक लोकनृत्य करून दाखवतात , दिवसा झलक असते रात्री तासा  भाराचा शो असतो नक्की पाहून या तास दोन तास काढून जा छान आहे ते सगळं. आमच्या ग्रुप मध्ये एक कथक शिकवणारी होती, अनेक वर्ष तिची नृत्य अकॅडेमी आहे , तिला पण इतकं आवडलं हे सगळं , मला मध्येच त्या नाचणाऱ्या ने काय दाखवलं ते सांगायची, म्हणून मला अधिक मजा आली. 

मी मुंबईचा म्हणजे, भारताचा पश्चिम भागातला आणि आसाम म्हणजे पूर्व, पण नाचातून ज्या गोष्टी  सांगतात तिथले नृत्य करणारे ते सारख्याच आहेत आणि अनेक अनेक वर्ष तीच परंपरा. अजब आहे आपला देश खूप वेगळा तरी एक सारखा...

दुपारी तिथून निघून आम्ही थेट शिलॉंग ला जाणार होतो सात आठ तास लागले आम्हाला.  जेवण एक  दोन चहा सगळं झालं.. वाटेत एके ठिकाणी चहाची टपरी होती टपरी , मी चहा सांगितला अजून दोघांनी पण हो म्हंटल , त्या माणसाने संत पणे चहा केला , इतका छान होता कि मी अजून सांगितला मग अजून कुणी आणि दर वेळेला तो परत नव्याने आधण ठेवायचा त्याला म्हणालो कि अरे ठेव कि जास्त आम्ही इतकी लोक आहोत , नाही मी तय्यारच चहा करतो... काय बोलणार? चहा एक नम्बर होता.  पण सांगायचं म्हणजे फार घाई नाही कसली, सगळं निवांत. येताना रस्ता मध्ये मध्ये खराब होता, "प्रगती पथ पे है"  असे बोर्ड होते, (लवकर करा प्रगती असं सांगावं वाटलं त्यांना) आमच्या इथे पण फारा वर्ष प्रगती पथ पे काम चालू आहे तसं असेल बहुतेक, वर म्हंटल तस सगळा भारत सारखाच.  

वाटेत जाताना छोटी गावं लागत होती आणि बुधवार चा बाजार वगैरे असतो ना तसा खूप ठिकाणी लागला होता लोकांची वर्दळ, काय काय वस्तू होत्या आणि सगळं प्रगती पंथ पर असल्यामुळे गाडी संथ चालत होती म्हणून मला ते सगळं छान निवांत पणे बघता येत होत,  मला शॉपिंग मध्ये फार रस नाहीये पण असा बाजार वगैरे भरला ना कि मला त्यात फिरायला जाम आवडतं. (फिलाडेल्फिया ला एकदा मी स्वाती आणि केदार माझी भावंड आम्ही त्या एका बाजारात तास डीड तास घालवला, काय काय गोष्टी होत्या वेगळं खायला खूप रेल चेल, खूप स्वच्छ होता म्हणा ते  ) एकदा उतरून जाऊन यावं वाटत होतं पण तेवढयात गाडी खरंच प्रगती करायची.  मस्त होतं सगळं खूप उत्साही आनंदी लोकं.... रंग बिरंगी वस्तू, खाणं आणि काय काय ? 

आम्ही शिलॉंग ला जाणार होतो पण ते परत गुवाहाटी करूनच होतं, शिलॉंग म्हणजे मेघालय ची राजधानी (सांगून ठेवतो उद्या KBC विचारलं तर) आणि गुवाहाटी ते शिलॉंग जाताना एका रस्त्यात डावीकड़े आसाम आणि उजवीकडे मेघालय असय. आमची गाडी मेघालयात शिरली तेव्हा एका प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे स्वछता , रस्ते छान झाले साफ होतं सगळं. आसाम घाण नाहीये पण मेघालय स्वच्छ आहे. स्वःछ्ता हि अंगात असावी लागते. 

शिलॉंग ला रात्री पोचलो बऱ्याच, बस छोट्या गल्ली बोळातून जात होती एकदम ते "तू कहा ये बता " मधल्या गण्या सारखं होतं.  हॉटेल छोटं होतं पण रूम्स स्वच्छ आणि छान होत्या. 

सकाळी उठलो तेव्हा वातावरण पण छान होतं. सकाळी आम्ही शिलॉंग ला फिरलो एक धबधबा आहे elephant falls तीन टप्यात आहे म्हणजे तीन पायऱ्या सारखा हळू हळू पडतो आणि दोन ब्रिज आहेत  त्यातून पार जायचं  मस्त पाणी अंगावर पडतं , खूप गर्दी होती आणि लोकं सेल्फी काढण्यात जास्त रंगले होते समोर इतकं सुंदर दृश्य असताना स्वतः किती सुंदर दिसतोय हे पहाण्यात बहुतेक जण रमले होते (नर्ससिस्ट नावाचा एक ग्रीक माणूस होता त्याची एक गोष्ट आहे ती वाचा कधी) असो , पण एकूण सकाळ सुंदर गेली. मी शिलॉंग ला १९८७ साली गेलो होतो एका दिवसा करता त्यात हि जागा मला लक्ख आठवते तसच आहे सगळं, फक्त गर्दी आहे जास्त आणि शो शा जास्त आहे निसर्ग तसाच आहे. इथली लोकं खासी आहेत म्हणजे खासी जमात आहे, तर ह्या लोकांनी ह्याचं नाव "का क्षद लै पटंग खोहशेव" असं ठेवलं (सगळी कडे अशी बोबडी वळणारी नाव आहेत ), म्हणजे तीन स्टेप्स चा धबधबा  कारण तसाच आहे तो पण ह्या  falls ला  इंग्रजांनी elephant हे निर्बुद्ध नाव दिलं कारण इथे हत्ती सारखा दगड आहे, त्यांना काय दगड कळलं कुणास ठाऊक? 

आमचा पुढचा चेरापुंजी ला होता असेच खूप तास वाटेत काही गुहा लागणार होत्या आणि मग एक मोठा धबधबा आणि नन्तर तो रूट ब्रिज आणि भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव आणि पारदर्शक नदी ... आणि हे पाहायला आमची बस त्या रस्त्या वरून धूम निघाली ... 


ती सगळी सहल आता पुढच्या भागात.... 








Bamboo

















चहा 

Elephant Falls