Friday, December 16, 2022

स्पिती - हिमाचल 3

कल्पा 

आम्ही त्या चिटकूळ नावाच्या गावावरून निघालो आणि मग शांत पणे निसर्ग बघत बघत कल्पा नावाच्या एका सुंदर ठिकाणी गेलो. आणि रस्ते इतके छान इतके छान आणि ते पण इतक्या दुर्गम भागात कि कोण करतंय हा रस्ता? ह्या लोकांना मुंबईत का नाही बोलवत? तर मला असं कळलं कि रस्ता बनवणारे ना स्टेट गव्हर्मेंट ना केंद्र सरकार, रस्ता बनवतं BRO म्हणजे Border Roads Organisation. (ह्यांना एकदा मुंबईत आणलं पाहिजे, म्हणजे जिकडे ढग फुटी होते रस्ता वाहून जातो पण तुटत नाही, ते मुंबईच्या पावसाला काय घाबरतील?)

हा सगळा बॉर्डर एरिया , म्हणजे तिबेट ची बॉर्डर, म्हणून BRO बनवते आणि मेंटेन पण करते रस्ता. खूप डोंगराळ रस्ता, उंच उंच डोंगर , खूप थंडी आणि दुपारी एकदम गरम , पण तरीही त्यात पण कामगार काम करत होते , नवल वाटलं, आपण किती सुख सोयी बघून जागा बघतो आणि जरा वीज गेली इंटरनेट गेलं  कि कासावीस होतो . इथे रस्त्याच्या शेजारी थोडी सावली बघून काही कामगार निवांत पडले होते दुपारी जेऊन... म्हणून म्हणतो प्रवास करा , आयुष्य एक प्रवासच आहे. (माणूस पण ग्रेट आहे, तिथे इतक्या वरती पण धरण बांधतो, म्हणजे  रस्ता नाहीये पण धरण बांधतो आपण , अजब आहे आपला देश).  

आम्ही त्या कल्पा ला दुपारी पोचलो, हॉटेल पण छान होतं आणि आजूबाजूला झाडं कसली असतील? सफरचंद. मी कोकणात फिरणारा माणूस आहे, त्या मुळे आंब्याची कलमं बघायची सवय आणि इथे तर तगरी च झाड असतं ना? तशी सफरचंद लागली होती लदबदली होती . मी विचारलं कि खाऊ का एक तोडून ? अरविंद म्हणाला कि कच्ची आहेत अजून वेळ आहे तयार व्हायला, मी देईन पुढे गेलो कि, खूप ओळखीचे आहेत. 

त्या पर्वत शिखराचं नाव किन्नर कैलाश , कारण त्या अनेक उंच उंच डोंगरान मध्ये एका डोंगरावर शंकराच्या पिंडीचा आकार आहे आणि तो डोंगर अति विशाल आहे, सगळंच अजब आहे. 

ह्या  जिल्ह्याचं नाव किन्नौर असं आहे म्हणून त्याला किन्नौर कैलाश असं खरं तर म्हणतात, इथे भगवान शंकर आणि देवी पार्वती राहतात अशी समजूत आहे म्हणून त्याला कैलाश हे नाव . १४ किलोमीटर चा ट्रेक आहे आणि ती पिंड जवळ पास ७० एक फूट उंच आहे. दुर्बीण असली असती तर नीट पाहता आलं असतं , इतका ट्रेक करायला तुम्ही एकदम प्रोफेशनल असायला हवेत आम्ही ज्या वेळी गेलो होतो सप्टेंबर तोच चांगला महिना आहे ट्रेक साठी, साधारण सहा हजार पन्नास मीटर इतका उंच आहे तो पर्वत आणि तिथे पार्वती नि पाण्यासाठी कुंड सुद्धा केलं आहे म्हणतात. म्हणजे बघा ६०५० मीटर वर एक पाण्याचा कुंड सुद्धा आहे. इथे आपल्या नाळात, तिथे इतक्या वर पाणी. श देवानेच केला असणार, माणसाचं कामच नाही ते.  

पण इतक्या खडतर ठिकाणी शंकरच राहू जाणे (म्हणुन गणपती बाप्पा, आपला महाराष्ट्रात जास्त वास्तव करतो ), तिथे शन्कराचं खूप कौतुक आहे, असणारच हो . एकदम डॅशिंग असणार मी दोन मिंट डोळे मिंटून साष्टांग घातला. 

पण सांगतो तुम्हाला इतकं सुंदर दिसतं ना ते दृश्य खालून सुद्धा कि अगदी अद्भुत अचंबित करणारं होतं. आपण नतमस्तक होऊन त्या निसर्गा पुढे त्या भगवाना पुढे आपसूक हात जोडतो. (जा एकदा मला थँक्स म्हणाल). आपण किती शुल्लक आहोत ते पदो पदो तो निसर्ग आपल्याला ठासून सांगत असतो, चुकून एक धोंडा जरी निखळला ना वरून तर सगळंच गाव बेचिराख होईल, का उगा आपण मी माझं मला माझंच करतो ? तुम्हारा एक नाही चलेगा बंधू . 

पाय निघत न्हवता माझा,  कारण आमच्या खोली बाहेर एक बालकनी होती त्यातून हेच दृश्य. तरी आदल्या संध्याकाळी आम्ही थोडी चक्कर मारली एक बंद देऊळ बघितलं, इथे देवळं कायम उघडी नसतात सकाळी असतात फक्त. पण ते पाहायला पण ५० मजले चढ उतार केल्या सारखं वाटत होतं. तिथे पण एक शाळा होती मुलींची आणि शेजारी हॉस्टेल कारण मला वाटतं हे थोडं मोठं गाव आहे, बाकी सगळी आजू बाजूला खेडी... इथून पण जवळचं स्टेशन शिमला बस नि आठ दहा तास (काय न्हाय निवांत जावा) आपण चायला उगाच घाई घाई आणि emergency मध्ये काय होईल असं म्हणतो. ह्या लोकांचं काय अडलं आहे का? नाही ना?   

आमचा ड्राइव्हर अरविंद तिथेच राहतो जवळ पास त्याला एक दिवस घरी जात आलं , तो म्हणाला कि लहानपणी शाळेत जायला रोज १० किलोमीटर येऊन जाऊन अशी तंगड तोड होती, पण लक्षात नाही यायचं म्हणाला , मजेत मस्ती करत जायचो (मुद्दाम म्हणाला असेल माझी दमछाक पाहून). हि लोक पण जाम काटक , मला वाटतं हा सहज धावेल मॅरेथॉन. सगळ्या उंच ठिकाणी असतं तसंच एक suicide point इथे पण होता. पण तिथे जवळ गेल्यावर समजलं कि खाली उडी मारायची गरजच नाही, नुसतं खाली वाकून पाहिलं तरी हार्ट अटॅक येईल इतकं खोल , तळ दिसतच नाही, (म्हणजे जीव द्यायला पण डबा घेऊन जावं लागत असणार, खाली पोचे पर्यंत माणूस उपास मारीने मारायचा ) एक तर मला उंचीची प्रचंड भीती आहे आणि हे तर उंचीच्या पलीकडलं. मगाशी सांगितलं ना? कि तो कैलास परबत ६ किलोमीटर उंच  आणि हि जागा इतकी उंच कि खाली तळ दिसत नाही म्हणजे खालून किती उंच असेल तो पर्वत? आणि खाली गेलो तरी शिमला ते पण इतक्या उंचावर .... तुमहाला लक्षात येतंय का? मी मगास पासून उंच उंच उंच करत होतो ते किती उंच आहे ते? आकाश पर्यंत उंच आहे हे सगळं .... 

इथे पण रस्ते छोटे होते पण चांगले होते, आमचा पुढचं पेट्रोल पंप दोन दिवसाने लागणार होतं ... नाही म्हणजे जस्ट सांगितलं ..... इथून पुढे सगळं वाळवंट लागणार होतं ... 

 









 

 


 

 

Sunday, December 11, 2022

स्पिती - हिमाचल 2

आधी सांगीतल्या प्रमाणे आम्ही तो डेंजर रस्ता चढून वर आलो (पुढला प्रवास बहुतेक अश्याच रस्त्यात होणार होता ) तर मधेच एक गाव लागला चिटुकलं पण हे चिटकूल न्हवत कारण  चिटकूल  अजिबात चिटकू पिटकू नाहीये. ह्या चिटकूल च एक वैशिष्ठ म्हणजे तिबेट च्या आधीचं हे शेवटचं गाव आणि शेवटचं पोस्ट हाफिस. इथे हिमाचल खुपसा भाग तिबेट च्या बॉर्डरला आहे त्या मुले भारतीय सैन्य आणि BSF ची खूप सैनिक दिसतात. म्हणजे आम्ही त्या चिंचोळ्या रस्त्याने वर येताना समोरून अनके ट्र्क आले मग आम्ही गाडी रिव्हर्स घेऊन कडेला उभं राहून त्यांना जागा करून दिली. हे गाडी  रिव्हर्स घेऊन कडेला उभं इतकं सोपं नसतं (आमच्या लहान पणी बिल्डिंग ला भिंत असायची आणि मग आम्ही एका बिल्डिंग मधून दुसया बिल्डिंग ला जाताना भिंत चढून जायचो, साधं सरळ गेट मधून नाहीच आणि बरेचदा शॉट कट म्हणून जायचो, तर त्या भिंतीवरून आम्ही चालायचो, एक वीट भर भिंत त्या वर जेमतेम एक पाऊल राहील असं, पण समोरून कुणी आलं कि मग ज्या कवायती कराव्या लागायच्या  तशी कवायत  हि लोक मोठ्या गाड्या घेऊन करतात) हे उधाण मुलांना नक्की कळेल 

मी इतकं लहान पणीचं  उद्धरण दिलं . कारण असय ना,  तिथे गेलं कि आपो आप आपण कॅलेंडर मागे नेतो कारण ती लोकं अजून जुन्या सारखंच आयुष्य जगतात , उगाच हसतात (?) आनंदी असतात,  प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक , प्रामाणिक एकदमच प्रामाणिक 

उदहारण .... 

आम्ही गाडी लावली एका टेकडीवर आणि उतरून दऱ्या पाहायला जात होतो आणि मला आठवलं माझं पाकीट असलेला बटवा का बॅग तिथेच गाडीतहोती , मी म्हंटल जरा गाडी उघड किमान पाकीट तरी घेतो, तर ड्राइव्हर म्हणाला कि खूप पैसे जरी तू गाडीत ठेवलेस आणि गाडी उघडी ठेवलीस तरी सुद्धा कुणी आत अजिबात पैसे घेणार नाही हि लोक संतुष्ट आहेत.  (कारण त्यांच्या कडे खूप मौल्यवान असा फक्त निसर्ग आहे आणि अजून तरी आपल्यात तो निसर्ग हिरावून घ्यायची क्षमता नाहीये, अजून तरी ) हे मी मनात म्हणालो. थोडं विषयांतर होतंय पण  ना लाज वाटते आपलीच. असो .. इथे क्राईम रेट सगळ्यात कमी (कमी नसायला काय? इथे बुटाची लेस लावताना धाप लागते चोर धावणार कसा? अन कुठे?)

तर वर जाताना एक पठार लागला म्हणजे गावं लकछम  होतं नावं गावाचं  ते  लागलं.   तिथे शेती करतात लोक, फूल दिसतात पण त्याला म्हणतात उगला म्हणजे आपला गहू (आपले तांदूळ खरं तर), पण हे दळून ह्याचा दीरढ करतात म्हणजे मराठीत डोसा.   तिथून खूप वर गेल्यावर बसपा नदी च्या किनारी आमचे टेन्ट्स होत्या . काही गोष्टींचं वर्णन करायला शब्द तीठे पडतात (एक तर माझा शब्द  भांडार सीमित आणि हा निसर्ग अफाट अद्भुत , ह्याला शब्दात का आणि कशाला बांधायचं.  (सगळंच का बांधायचं? काहीही का बांधायचं). भारतात का जगात माहित नाही पण इथली हवा सगळ्यात शुद्ध आहे असं रिसर्च मधून समजलं https://www.sagarkulkarni.in/ इथे मी थोडेसे फोटो टाकले आहेत, जमलं तुम्हाला तर शब्दात बांधायचा प्रयत्न करा , माझ्या कुवतीच्या पलीकडलं आहे . 

हा कॅम्प ना बास्पा नदीच्या किनारी आहे (आठ महिने बंद) आणि   काय  तो निसर्ग अनेक अनेक डोंगर डोंगरा मागून डोंगर आणि मध्येच एका डोंगराच्या शिखरा वर मुकुटा सारखा बर्फ  अद्वितीय काय निसर्ग काय ते दृश्य पाषाणा ला पाझर फुटेल ... हि ,माणसं इतकी निरागस साधी का ? ते मला समजलं रोज उठून तुम्हाला हे दृश्य दिसलं तर ? परत झोपताना आकाश हळू हळू रंग बदलतं हवा आणिक थंड,  माहोल सर्द होतो  आणि इतकं सगळं सुंदर असतं कि तोच मोठा नशा होतो .. अहाहाहाहा.  

खरं सांगतो त्या टेन्ट मध्ये रात्री आपण गारठतो , सगळं शांत आणि नदीचा हलका आवाज ... मला पाण्याचं व्यसन आहे आणि नद्यांच्या पाण्याचं अधिक, मालवण ला मी नदी किनारी राहायला पसंद करतो, पण पाणी.  मला पाणी खूप आवडतं आणि इथे तर मी जेम ते, वीस ते तीस फूट पाण्याच्या जवळ होतो, पाण्यात पाय ठेवला तरी गारठतो, पण नितळ, शुद्ध पाणी पाहण्यात वेगळी मौज असते .. हा मंद आवाज ऐकताना कधी झोप लागली ते समजलं नाही आणि सकाळी बाहेर पडलो तेव्हा अद्भुत ... 

तिथे जी मुलं होती त्या टेन्ट ची काळजी घेणारी ती उशिरा उठली मग आम्हीच चार लोकांनी मिळून चहा केला , सडे आठ नऊ ला चहा नाश्ता मिळाला पण चहा तर सकाळीच लागतो ना? अमृतुल्य आहे इतक्या सुंदर ठिकाणी चहा नको? बाकी मी काय वर्णन करू? सुंदर नदी , डोंगर. मधेच एखादा पंधरा शुभ्र कलशा सारखा एखादा डोंगर माथा. आमच्या अवती भवती फिरणारा तो गोंडस कुत्रा ... (एक जाणवलं जिथे माणूस तिथे कुत्रा अख्या देव भूमीत म्हणाल तिथे असाल तिथे एखाद दिसतच. ). जाऊन या,  रमणीय आणि प्रेक्षणीय आहे. 

चिटकूळ ला एक शाळा आहे (हो हो आहे ). मला दोन लहान मूल दिसली, (तुम्हाला सांगतो शाळेत जाणारी मूळ आणि मुली ह्या पेक्षा दुसरं प्रेक्षणीय दृश्य नाही ) एक मेकांच्या हातावर काही तरी काढत होती, चारच महिने शाळा किती मस्त पण बाकी सगळा बर्फ , माझ्या समजण्या पलीकडलं आहे . असो , तर ह्यांच्या कडे धन्य कोठार आहेत, आठ महिन्याची शिदोरी असते ह्यात, आमचा ड्राइवर अरविंद म्हणाला कि ह्यांच्या कडे किमान डेड वर्ष पुरेल इतकं धान्य असत, पैसा अडका नसेल पण , धान्य आणि पाणी असतं पाणी म्हणजे सगळाच बर्फ. किती बेसिक धरून आहेत हि लोकं .. ना?  बकरा कापून तो उन्हात सुकवतात , उन्ह खूप तीक्ष्ण असतं (अगदी सूर्या च्या जवळ न हो?) मग बकरा चांगला सुकतो मग तो खायचा हिवाळ्यात , खाली खूप डेलिकेसि म्हणून खपते... इथे मिनरल वॉटर फुकट  डायरेक्ट हिमालयातून हो, परत २००० हजाराची डेलिकेसि रोज ताटात , हवाय कशाला हो वैभव?


एक देऊळ आहहे तिथे सुंदर नक्षी काम केललं पण लाकडी कारण बर्फात काही नाही टिकणार, फोटो मध्ये पहा कित्ती सुंदर आहे, सकाळी एक तास भर असत उघडं बाकी बंद. तिथे एक आंधळा माणूस आणि त्याची बायको आले होते देवाच्या पाया पडायला, आम्ही त्यांना झुले असं केलं (म्हणजे नमस्कार असेल ). पण सांगयचं असं कि ती दोघे इतके हसरे होते, देवाच्या पाया पडले आणि  गेले, म्हणेज आंधळा माणूस तसं पाहिलं तर दारिद्य आठ महिने बर्फ बर्फ अगदी -२१ वगैरे असेल पण जोडपं हसरं ... माझे वडील म्हणतात तसं और क्या चाहिये :) . सुख आपल्या मानण्यावर आहे ... 


शब्द खूप दगा द्यायला लागलेत ... 


जाऊन या , पुढे काल्पा आणि बाकीची स्पिती फिरवतो .... 















Thursday, December 8, 2022

स्पिती - हिमाचल 1

मी खूप ते डिलिव्हरी ऍप्स वापरतो , दहा मिनटात घरात सामान हजर , आधी लोकं घरात धान्य साठून ठेवायचे आता सगळं हवं तेव्हा. बर तो माणूस जर दहा ऐवजी वीस मिनिटाने आला कि मी दहा वेळा फोन करून ... किधर है? किधर है ? असं विचारतो .... "मी" , आपलं एक प्रतीकात्मक म्हणून वापरलं ... आपण मुंबईत किव्हा मोठ्या शहरात अगदी इन्स्टंट जगतो आयुष्य , अगदी आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता , झोपायच्या आधी आणि उठल्या उठल्या मोबाईल बघतो ... 

 मला हिमालयात जा शांत होशील ... असा सल्ला दिला कुणीतरी.  आणि काहीही प्लॅन नसताना मला स्पिती ला जायची संधी मिळाली .... तिथे खूप ठिकाणी मोबाईल तर सोडाच साधा वाणी नाहीये बस सुद्धा दिवसातून एकदाच आणि ती नाही येऊ शकली तर दोन दिवस काही सम्पर्क नाही...  रस्ताहि धड नाहीये ... 

दोघातला विरोधाभास पाहिलात ? 

ignorance is bliss म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे , मला स्पिती बद्दल काही माहित न्हवतं आणि मी शोधायचा प्रयत्न पण नाही केला,  एक तर मी आळशी आहे, दुसरं म्हणजे मला कधी कधी माहित नसताना गेलेलं आवडतं, म्हणजे बघा तुम्ही एखाद्या ठिकाणचं गुगल करून फोटो पाहता माहिती काढता यू ट्युब बघता आणि जाता, पण तिकडे असं वेगळंच दिसतं मग नर्व्हस होता, त्या पेक्षा जे दिसेल ते .. अरे वाह ओह हो असं करत जावं, तेवढीच मज्जा आणि तिसरं कारण म्हणजे मी ज्यांच्या बरोबर जाणार ते म्हणजे माझे बॉस होते (आलं लक्षात मी आगाऊ पणा का नाही केला ते ?) आणि ते स्वतः एक दोन खेपेस तिथे फिरून आले होते आणि दर ३ महिन्याने कुठे कुठे जात असतात त्या मुळे मी तसा सेफ हॅन्ड्स मध्ये होतो मग पुन्हा का कष्ट घ्या?


वर सांगितल्या [प्रमाणे कार्यक्रम अगदी उत्तम प्लॅन होता आणि कुठेही त्रास झाला नाही कि,  अरे येऊ करायचं राहीलच ते ठरवलं असतं तर सगळं व्यवस्थित. खरं तर मी तसा फार जास्त प्लॅन वाला माणूस नाहीये आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये नजीकच्या काळात  भूतान आणि कधीतरी नन्तर न्यू झीलण्ड होतं (म्हणजे अजून आहेच ) आणि मला अचानक हा प्रस्थाव आला आणि मी लगेच त्याला होकार दिला. पण गम्मत म्हणजे इथे मला जरा भूतान चा फील आला कारण हे तिबेट ची बॉर्डर आणि एकूण लोकं सगळी बुद्धिस्ट आणि दिसायला थोडी तशीच (पण तरी भूतानला मी जाणारच). 

स्पिती,  लोकं थन्डित म्हणजे बर्फात करतात किव्हा उन्हाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर आम्ही तस केलं. साधारण एक आठ दिवसात आम्ही मुंबई - चंडगढ -नरकांडा (मुक्काम) - चिटकूळ (मुक्काम) -कल्पा (मुक्काम) -नाको -गुये - ताबो (मुक्काम) -धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) -कोमिक -हिक्कीम -लान्गझा -काझा (मुक्काम) -कि -चेचम -चंद्रताल (मुक्काम) - मनाली (मुक्काम) ते चंदिगढ -मुंबई .... इतकी पायपीट केली (इंनोवा मधून). 

मी समुद्र सपाटी वरचा माणूस आणि माझं निम्म्या हुन अधीक आयुष्य तळ मजल्यावर गेलं, फार तर रायगड सर केलाय , पण इथे रायगड पेक्षा सहा पट उंच डोंगर (सहा पट हे का म्हंटलं ते चतुर लोकांना समजलं असेलच)आणि तो पाहून टोपी पडली कि मागे आणिक एक उंच डोंगर , (इथूनच पांडवांनी स्वर्गात जायचं नियोजन का केलं हे मला कळलं ) म्हणजे उंचच  ऊंचं. परत आता झालंय कसं कि आपल्याला ऑक्सिजन लेवल वगैरे असते हे कोविड  नि शिकवलंय त्या मुळे पंचाईत होते तिथे ऑक्सिजन लेवल ७५ वगैरे होते म्हणे . म्हणजे मी बुटाची लेस बांधायला वाकलो आणि धाप लागली, फाटली ना हो. एरवी मी धावतो माझा stamina बराय हा गुरुर त्या डोंगराने (त्याच्या) बुटा खाली तुडवला (म्हणून डोंगराशी मस्ती नाही).  

नारकाण्डा ला आम्ही चंदिगढ हुन शिमला मार्गे साधारण ५ च्या सुमारास पोहोचलो अंतर फार नसलं तरी खूप घाट रस्ता खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच , गाडी लागणारा माणूस असेल तर त्याला अशक्य आहे (तिथे राहून गाडी लागते असं म्हणणारा माणूस अशक्य). आणि थंडी पण बरीच होती म्हणजे दोन दोन स्वेटर , तरी हा उन्हाळा म्हणून बरं एरवी बर्फा खाली असतं सगळं. इथे मला वाटतं निम्याहून अधिक हिमाचल हे आठ महिने बर्फ़ा मुळे बाकीच्या निम्म्या राज्या पासून तुटलेलं असतं. रस्ता नसतोच सगळं बर्फ़ा खाली जाणार कसं?

हिमाचल ला देव भूमी म्हणतात, का ते तिथे गेल्यावर कळतं. आहो सगळंच इतकं अफाट आणि निसरगावर अवलंबून असतं कि माणूस अगदीच थिटा वाटतो. पण अफाट हे सुंदर असू शकतं हे हेचि देही हेचि डोळा पाहून पटतं. आम्ही जेव्हा  नारकाण्डा ते चिटकल हा प्रवास केला तेव्हा मध्ये मोठी गावं तालुके आणि काही ठिकाणी तर मध्येच घरं बांधली असं वाटलं, आमचा ड्राइवर (जो स्वतः  दोन बस आणि ३ गाड्यांचा मालक आणि एकदम हिरो टाईप्स होता) म्हणाला,  कि आत डोंगरात अजून घरं आहेत , म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही कि गावं असतील म्हणून इतक्या आत दरीत. मध्ये रामपूर नावाचं मोठं गाव लागलं, तालुका आहे म्हणून कळलं . पण एकदम छान होत, कुठे दारिद्य नाही दिसलं, जवळचं  स्टेशन म्हणजे शिमला ते हो १४ तास , बाकी सगळं बस , त्या शिवाय पर्याय नाही. इतकं चार लोकांन पासून दूर आहे म्हणून मला वाटतं ते छान आहे . 

आम्ही इतक्या उंच गेलो तेव्हा तिथे सपाट पठार लागलं आणि इतकं सपाट कि तिथे शेती करतात लोक , इथे ना सगळी कडे डोंगर  आहेत म्हणजे बघा हा कि आपण समुद्रात जातोय अथांग समुद्र आणि मध्येच एखादं बेत लागलं छोटं तर लोक तिथे राहायला लागतील तसं काहीसं .... नुसते उंच डोंगर तो चढून गेलात कि पुन्हा नवीन मोठा डोंगर आणि त्या मध्ये एक छोटं खानी प्लेन जमीन , मग लोकांनी काय केलं कि थोडी सपाट जमीन दिसेल तिथे घर बांधली आणि मग आणिक लोकं येऊन त्यांनी गाव केलं आणि मग असं सगळं राज्यच बनलं. आम्हाला वाटेत बरेचदा बकरी, म्हणजे मेंढ्या (लोकर असते ती कोण हो? त्याच ) चारणारे लागले , आमचा ड्राइवर म्हणाला कि हेच खरे तर Original explorer अश्या मेंढ्या गाई म्हशी घेऊन फिरायचं छानशी जाग लागली कि तिथेच थांबून घर करायचं मग शेती वैगेरे करायची, जागा भरली कि पुढे जायचं आणि दुसरं गाव ... काय काय नवीन शिकायला मिळतं.  

चिटकुल चा वर चढताना रस्ता थोडा खराब आहे आणि काही ठिकाणी तर एकच गाडी जाऊ शकते.  सामोरा समोर गाड्या आल्या तर एक गाडी कड्याच्या जितकं कडेला म्हणून जाता येईल, तितकं जाऊन ती थांबते,  पूर्वीच्या काळी कडेलोट कश्याला म्हणत असतील त्याचा अनुभव घेतला आणि मला पुढे पुढे गेल्यावर असं कळलं कि हा रस्ता सगळ्यात OK आहे आगे आगे देखो असं म्हंटला ड्राइवर . 

सहा आठ महिने हा रस्ता बंद असतो म्हणजे वरची लोक वरतीच राहतात. बंद का असतो तर सगळा बर्फ, रस्ता करणार कधी आणि कसा? 

वरची गम्मत मी खाली म्हणजे पुढच्या भागात  सांगतो.